गृहिणींनाही रोजगाराचे नवे दार खुले
मीनाक्षी गुरव : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ८ : तुमचे दहावी-बारावी किंवा पदविका शिक्षण झाले असेल किंवा तुम्ही आयटीआयचे प्रशिक्षणार्थी असाल, किंवा तुम्ही चक्क गृहिणी असाल, तरीही तुम्हाला तुमच्या जवळच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) अल्पमुदत अभ्यासक्रम करता येणार आहेत. होय, विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण मिळावे आणि रोजगारक्षमता वाढावी, यासाठी राज्यातील सर्व ‘आयटीआय’मध्ये अल्प मुदतीत नवीन कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.
राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि तांत्रिक विद्यालय केंद्रांमध्ये असणाऱ्या पायाभूत सुविधांचा अधिकाधिक उपयोग करून संस्थेच्या वेळेव्यतिरिक्त वेळेत अल्पमुदत अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय आयटीआय आणि शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकासाला चालना मिळावी, यासाठी या अभ्यासक्रमांची आखणी करण्यात आली आहे. या निर्णयानुसार राज्यातील प्रत्येक शासकीय आयटीआयमध्ये शुक्रवारपासून (ता. १०) नियमितपणे अल्पकालीन अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.
अल्पमुदत अभ्यासक्रमांबाबत....
- महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत क्षेत्रातील विद्यार्थ्यांकडून केवळ १०० रुपये नोंदणी शुल्क आकारावे
- तूर्तास कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारू नये
- आयटीआय प्रशिक्षणार्थी आणि संस्थेबाहेरील विद्यार्थ्यांना समान नोंदणी शुल्क असेल
- नियमितपणे अल्पमुदत अभ्यासक्रम प्रशिक्षण वर्ग येत्या शुक्रवारपासून सुरू करावे
- सुरूवातीला सैद्धांतिक प्रशिक्षण वर्ग सुरू होणार
- अभ्यासक्रमासाठी शासकीय आयटीआय/तांत्रिक विद्यालयात संपर्क साधावा
गृहिणींनाही घेता येणार प्रवेश
जास्तीत जास्त युवा आणि गृहिणींना सवलतीच्या शुल्कात चालविण्यात येणाऱ्या या अल्पकालीन अभ्यासक्रमांसाठी नोंदणी करावी, यासाठी सर्व सहसंचालक, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आणि प्राचार्य यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या संचालक माधवी सरदेशमुख यांनी केले आहे.
अल्पमुदत अभ्यासक्रमासाठी पात्रता
- दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका, पीएच.डीधारक
औंधमधील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अल्पमुदत अभ्यासक्रम
अल्पकालीन अभ्यासक्रम : प्रवेश क्षमता
- सेल्फ एम्ल्पॉईड टेलर : ३०
- ॲटोमोटिव्ह सीएनसी मॅचिंग टेक्निशियन : ३०
- टू व्हीलर सर्व्हिस टेक्निशियन : ३०
- योगा इन्स्ट्रक्टर : ३०
- मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग : ३०
- सीएनसी टर्निंग ऑपरेटर : ३०
- सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन टेक्निशियन : ३०
- सोलर पीव्ही इस्टॉलर : ३०
अल्पमुदत अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये
- प्रगत कौशल्यावर आधारित रोजगारक्षम प्रशिक्षण
- रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन
- अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण मंडळातर्फे मिळणार प्रमाणपत्र
- तज्ज्ञ आणि कुशल प्रशिक्षणाद्वारे प्रशिक्षण आणि कार्यशाळा
औंधमधील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १५ अल्पमुदत अभ्यासक्रम निवडण्यात आले आहेत.
पहिल्या टप्प्यात त्यातील आठ अल्पमुदत अभ्यासक्रम शुक्रवारपासून (ता.१०) सुरू होत आहेत. यासाठी २४० जागा उपलब्ध असून आतापर्यंत २२० इच्छुकांचे प्रवेश अर्ज आले आहेत.
- सचिन धुमाळ,
उपसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, पुणे प्रादेशिक कार्यालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.