कर्णकर्कश उद्‍घोषणांमुळे रहिवाशांची उडाली झोप

कर्णकर्कश उद्‍घोषणांमुळे रहिवाशांची उडाली झोप
Published on

राधिका वळसे पाटील ः सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. ३० : वाकडेवाडी एसटी बसस्थानक आवारात प्रवाशांना ध्वनिक्षेपकावरून २४ तास देण्यात येणाऱ्या सूचनांच्या आवाजामुळे परिसरातील सोसायट्यांत राहणाऱ्या नागरिकांची झोप उडाली आहे. विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांनाही कर्णकर्कश आवाजाचा त्रास होत असल्यामुळे ते त्रस्त आहेत. तसेच स्थानकाबाहेर वाहतूक कोंडी, अनधिकृत पार्किंग, खाद्यपदार्थांच्या टपऱ्या आणि अस्वच्छता याचाही उपद्रव रहिवाशांना होत आहे.
शिवाजीनगर बसस्थानक नूतनीकरणासाठी तात्पुरते वाकडेवाडीत स्थलांतरित केले होते. मात्र सहा वर्षे उलटली तरी हे बसस्थानक मूळ ठिकाणी स्थलांतरित झालेले नाही. हे बसस्थानक कार्यान्वित झाल्यावर परिसरातील गोंधळ, ध्वनी प्रदूषण आणि वाहतूक कोंडीमुळे निसर्गरम्य आणि शांत असलेल्या या परिसराची शांतता हरवली असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. स्थानकाच्या परिसरात दीडशेहून अधिक गृहरचना सोसायट्या आहेत. त्यात सुमारे दोन हजारांहून अधिक रहिवासी आहेत. या स्थानकातून दररोज सुमारे सातशे बसची वाहतूक होते. सुमारे १५ हजारांहून अधिक प्रवासी ये-जा करतात. त्यांच्यासाठी एसटीचे अधिकारी ध्वनिक्षेपकावरून सूचना देतात. त्या रात्रभर दिल्या जातात. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना त्याचा त्रास होतो. याबाबत महापालिका, एसटी स्थानक प्रशासन, पोलिस यांच्याकडे तक्रार केली तरी काहीही फरक पडत नसल्याचे रहिवाशांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

रहिवाशांना भेडसावणाऱ्या समस्या
- स्थानकात ध्वनिक्षेपकावरून दिल्या जाणाऱ्या सूचना
- स्थानकाबाहेरील सेवा रस्त्यावरील खाद्यपदार्थ, फळविक्रेत्यांची अतिक्रमणे
- खासगी प्रवासी बस, कॅब, रिक्षा यांचे अनधिकृत पार्किंग
- स्थानकालगतच्या सोसायट्यांच्या प्रवेशद्वारासमोर उभ्या राहणाऱ्या एसटी
- पदपथावर लघुशंका

वाकडेवाडीमध्ये सहा ते सात वर्षांपूर्वी पूर्ण शांतता होती. पर्यावरणपूरक वातावरण, शांतता असे वातावरण येथे होते; पण आता रात्रंदिवस नुसता कलकलाट, जोरजोरात उद्‍घोषणा, आरडाओरड कानी पडतो. त्या आवाजामुळे दिवसा आणि रात्रीचीही झोपमोड होते.
- मोहन बागलाणे, स्थानिक रहिवासी

एसटी बस स्थानकावर होणारे गैरवर्तन मनस्ताप देणारे आहे. सहसा यावर कारवाई होत नाही. दुचाकी वाहने उचलली जातात; पण चारचाकी गाड्यांना कोणी हात लावत नाही. रेशीम उद्योग केंद्रापासून ते बजाज शोरूमपर्यंतचा परिसर खासगी बसच्या पार्किंगने ताब्यात घेतला आहे.
- बिपीनचंद्र चौगुले, स्थानिक रहिवासी

स्थानिक रहिवाशांना बसस्थानकावर उद्‍घोषणांचा त्रास होत असेल तर त्याचा आवाज विशेषतः रात्रीच्या वेळी कमी केला जाईल. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू आहेत. यात वाहतूक पोलिसांचीदेखील मदत घेतली जाईल.
- अरुण सिया, विभाग नियंत्रक राज्य परिवहन मंडळ, पुणे विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com