

प्रसाद कानडे: सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ३० ः रोज सुमारे १३ लाख प्रवाशांना आपल्या निर्धारित ठिकाणी पोहचविणाऱ्या ‘पीएमपी’चे बस थांब्यांविषयी असलेल्या अनास्थेमुळे यंदाही प्रवाशांना उन्हातच थांबण्याची शिक्षा मिळाली आहे. जाहिरातदाराने वर्षात ३०० बस थांबे बांधून देण्याची हमी दिली, मात्र गेल्या पावणे दोन वर्षांत केवळ १०० थांबे बांधून दिले. त्याला नोटीस देण्यापलीकडे ‘पीएमपी’ प्रशासनाने काही केले नाही. जाहिरातदारावर कारवाई न करता प्रवाशांना मात्र उघड्यावर सोडले. परिणामी प्रवाशांना तळपत्या उन्हात घामाघूम होऊनच प्रवास करावा लागत आहे.
‘पीएमपी’ प्रशासनाकडे बसथांबा बांधण्यासाठी आवश्यक निधी नाही. त्यामुळे बीओटी तत्त्वावर ‘सिद्धी’ एडीव्हीटी ही कंपनी स्टेनलेस स्टीलचे थांबे बांधून देणार असे ठरले. जुलै २०२३ मध्ये ‘पीएमपी’ व ‘सिद्धी’ यांच्यात करार झाला. ३०० दिवसांत ३०० थांबे बांधून देण्याचे ठरले. मात्र आजतागायत केवळ १०० थांबे बांधून झाले असल्याचे ‘पीएमपी’ प्रशासनाने सांगितले.
गरज ९००० बसथांब्याची, प्रत्यक्षात ११८५
पुणे, पिंपरी चिंचवड व पीएमआरडीए असे तिन्ही क्षेत्र मिळून तसेच येणाऱ्या व जाणाऱ्या अशा दोन्ही मार्गांचा विचार करून ‘पीएमपी’कडे सुमारे नऊ हजार बसथांब्याची नोंद आहे. पैकी केवळ ११८५ थांब्यावरच छत आहेत. त्यातच ‘बीआरटी’च्या १२० थांब्यांचा समावेश आहे. थांब्यासारखी प्राथमिक सुविधा देण्यातच ‘पीएमपी’ला अपयश येत आहे. निधीची कमतरता सांगत जाहिरातदाराकडे बोट दाखविले जाते.
शेड नसल्याने...
१) प्रवाशांना तळपत्या उन्हातच उभे राहावे लागते
२) पावसाळ्यात देखील प्रचंड गैरसोय होते
३) ज्येष्ठ, महिला, लहान मुलांना बसायला जागाच नाही
४) महिलांना, लहान मुलांना कडेवर घेऊनच तासनतास बसची वाट पाहावी लागते
दृष्टिक्षेपात
एकूण बस संख्या : १६५०
प्रवासी संख्या : सुमारे १३ लाख
एकूण बस थांबे : ९०००
शेड असलेले थांबे : ११८५
बीआरटी मार्गावर थांबे : १२०
एक कव्हर्ड थांब्याचा खर्च : सुमारे ४ लाख
बस थांब्यावर छताची सोय असणे आवश्यक आहे. छत असलेल्या थांब्याची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जाहिरातदाराने काम अपूर्ण केल्याने त्याला नोटीस देण्यात आली आहे.
- दीपा मुधोळ -मुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे
मी ‘पीएमपी’ची नियमित प्रवासी आहे. कामानिमित्त मला हडपसर ते कात्रज तसेच अन्य मार्गांवर प्रवास करावा लागतो. काही मोजके थांबे सोडले तर थांब्यावर छतच नाही. आडोसा घेऊन कुठे थांबले तर बस त्या ठिकाणी थांबत नाही. त्यामुळे उन्हात थांबूनच बसचा प्रवास करावा लागत आहे.
- गौरी देशमुख, प्रवासी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.