पाच औषधांचे रुग्णांवर प्रतिकूल परिणाम

पाच औषधांचे रुग्णांवर प्रतिकूल परिणाम
Published on

ज्ञानेश्‍वर भोंडे
सकाळ वृत्‍तसेवा
पुणे, ता. ३० ः वेदनाशामक, रक्त पातळ होणे, मधुमेह असताना रक्‍तातील साखर नियंत्रित करणे, बुरशीजन्‍य आजार अशा कारणांसाठी वापरल्या जाणाऱ्या पाच औषधे, प्रतिजैविकांचा रुग्‍णांवर प्रतिकूल परिणाम होत असल्‍याचे निदर्शनास आले आहे. याबाबत भारतीय औषध प्रणाली आयोगाने प्रकटन जारी करत देशभरातील डॉक्‍टरांना प्रतिकूल परिणामांची संकेतस्‍थळावर आणखी नोंद करण्‍याचे आवाहन केले आहे.
मेट्रोनिडाझोल, लुलिकोनाझोल, डेल्टापॅरिन, ग्लिक्लाझाईड व ट्रामाडोल ही या औषधांची नावे आहेत. कोणतेही औषध बाजारात आणण्‍याआधी त्‍याच्या प्राण्‍यांवर चाचण्‍या होतात. त्‍यात सुरक्षित आढळल्‍यास नंतर परिणामकारकतेच्‍या चाचण्‍या मानवावर होतात. औषध सुरक्षित व परिणामकारक आढळल्‍यास ते सर्व रुग्‍णांवर वापरासाठी प्रमाणित केले जाते. मोठया प्रमाणात वापर झाल्यास इतर काही प्रतिकूल परिणाम (ॲडव्‍हर्स इफेक्‍ट) होतात का, हे सुद्धा पाहिले जाते. ही प्रक्रिया निरंतर असते. इतरही प्रतिकूल परिणाम दिसले तर डॉक्‍टरांनी संबंधित संकेतस्‍थळावर नोंद करणे अपेक्षित असते. पुढे केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्‍था त्याचे विश्लेषण करते. तक्रारीच्‍या स्‍वरूपावरून औषधाचा वापर चालू ठेवायचा की बंद करायचा याचा निर्णय होतो.
रुग्‍णांना औषधे दिल्‍यावर जर त्‍यांना काही इतर त्रास होत असेल तर त्‍याची नोंद देशभरातील डॉक्‍टरांकडून ‘फार्माकोविजीलन्स’ प्रोग्रॅम अंतर्गत असलेल्‍या संकेतस्‍थळावर करण्यात येते. त्‍या तक्रारीनुसार औषधांबाबतचे प्रकटन जारी केले जाते.

येथे करा तक्रार
जर औषधांचे जर रुग्‍णांवर प्रतिकूल परिणाम आढळून आले तर त्‍याची नोंद डॉक्‍टर, रुग्ण, ग्राहकांनी http://www.ipc.gov.in या संकेतस्‍थळावर किंवा ADR PVPI या मोबाईल ॲपवर करावी असे आवाहन आयोगाने केले आहे. तसेच याबाबत १८००१८०३०२४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता.

क्र ः औषधाचे नाव ः कशासाठी वापर ः आढळलेले प्रतिकूल परिणाम
१. मेट्रोनिडाझोल ः जीवाणू, परजीवींमुळे होणाऱ्या संसर्गांवरील उपचारासाठी प्रतिजैविक ः लालसर पुरळ, छोटे फोड असणारा त्‍वचाविकार (एजीइपी)
२. लुलिकोनाझोल ः त्वचेवरील बुरशीजन्य (फंगल) संसर्गावरील उपचारासाठी प्रतिजैविक, क्रीम किंवा लोशन स्वरूपात उपलब्ध ः क्‍लोस्‍मा, मेलास्‍मा प्रकारच्या त्‍वचाविकारास कारणीभूत
३. डल्टापॅरिन ः रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ नयेत म्हणून ः स्नायू अचानक आकुंचित होऊन घट्ट होणे, वेदना होणे
४. ग्लिक्लाझाइड ः रक्तातील साखर नियंत्रित करणारे औषध ः एरिथेमा मल्टीफॉर्मे या त्वचेसंबंधी दाहक विकारास कारणीभूत
५. ट्रामाडोल ः मध्यम ते तीव्र वेदना कमी करण्यासाठी वेदनाशामक ः ‘फिक्‍स्‍ड ड्रग इरप्‍शन’ या औषधजन्य त्वचारोगास कारणीभूत
.............
रुग्‍णांच्‍या उपचार प्रकियेत ही औषधे गेल्‍या २५ ते ३० वर्षांपासून वापरात आहेत. काही औषधांचे थोडे सौम्‍य प्रतिकूल परिणाम असतात, जे डॉक्‍टरांना माहिती असतात. त्‍याची पुन्‍हा एकदा जाणीव करून देण्‍यासाठी हे प्रकटन आहे. औषधे गरजेपेक्षा जास्‍त दिवस किंवा त्रास नसताना दिल्यास तीव्र प्रतिकूल परिणाम होण्‍याची शक्‍यता जास्‍त असते. प्रतिकूल परिणामांची नोंद कोठे करायची याबाबतची माहिती प्रत्येक डॉक्‍टरांना देण्‍याची व्‍यवस्‍था करायला हवी.
- डॉ. अविनाश भोंडवे, माजी अध्‍यक्ष, आयएमम
..............

औषधांचे दुष्परिणाम दिसून येतात की नाही ही अखंडित अभ्यास प्रणाली आहे. त्यास ‘फार्माकोव्हीजीलन्स’ असे म्हणतात. त्यासाठी डॉक्टरांनी त्यांची निरीक्षणे या प्रणालीवर नोंदवायची असतात. प्रत्येक वेळी केसपेपर बनवणे व तो रुग्णांना पुढील उपचारासाठी दाखविणे सुद्धा महत्त्वाचे असते.
- डॉ. आत्‍माराम पवार, प्राचार्य, पूना कॉलेज ऑफ फार्मसी
..........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com