

पुणे, ता. ३० ः ‘प्रत्येक पिढीचा दृष्टिकोन एकच असेल असे नाही. तो वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. त्याकडे एका चष्म्यातून न पाहता त्याचा आदर व कौतुक करता आले पाहिजे,’ असे आग्रही मत ज्येष्ठ मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी व्यक्त केले.
‘इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ’च्या (आयपीएच) वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘पिढयापिढयांमधील वाद-संवाद-सुसंवाद’ या विषयावर आधारित ‘सोबतीने सुखासुखी’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमास यावेळी मानसशास्त्रज्ञ डॉ. शिरीषा साठे, लेखिका व चित्रकार डॉ. उमा कुलकर्णी, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. आशिष बाभूळकर, उद्योजिका सायली मराठे, शिक्षक तसेच समुपदेशक निरंजन पंडित व लेखिका तसेच विद्यार्थिनी आभा आमला अभिजित यांनी विविध पिढ्यांचे प्रतिनिधित्व करीत आपले अनुभवकथन केले. डॉ. सुवर्णा बोबडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
डॉ. नाडकर्णी म्हणाले, ‘‘बौद्धिक प्रगतीसाठी वाद आणि विवाद गरजेचा आहे. कुणाशी बोलताना त्या व्यक्तीबद्दलचा आदर महत्त्वाचा असतो. त्यातून सुसंवाद घडतो. इतरांविषयी मत न बनविणारी माणसे नसतात. नवीन पिढी पटकन व्यक्त होते. जे वयाने मोठे आहे त्यांनी पटकन मत बनवू नये. नव्या पिढीच्या रागाचा, मते बनवण्याचा माझ्या कर्तव्यावर परिणाम होऊ द्यायचा नाही. ज्या प्रतिक्रिया येतात त्याचा कसा सामना करायचा हे लक्षात ठेवायला हवे. प्रत्येक मतप्रदर्शनावर लगेच प्रतिक्रिया द्यायची गरज नसते.’’
डॉ. साठे म्हणाल्या, ‘‘पूर्वी पहिल्या पिढीचा विचार दुसरी पिढी पुढे घेऊन जायची. आताची पिढी त्या विचारांचे ‘बॅटन’ पुढे घेऊन जायला नाही म्हणते. पूर्वीच्या नात्यात आपलेपण होता. कर्तव्यावर निष्ठा आणि उपकृत झाल्याची भावना होती. आताचे नाते हे मी व माझ्याभोवती फिरते. पूर्वी पिढ्या एकाच ठिकाणी वाढायच्या. आता त्यांची जडणघडण वेगवेगळ्या ठिकाणी होते. त्यावेळी आधीच्या पिढीचा अनुभव नंतरच्या पिढीला लागू पडेलच असे नाही.’’
उमा कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘जेव्हा तरुण मुलाशी संवाद साधता तेव्हा त्यांचे ऐकून घ्या. त्यांना स्वप्न किंवा भूतकाळ न विचारता सध्याचे विचारा.’’ यावेळी इतर वक्त्यांनीही त्यांचे मते व्यक्त केली.
---
‘सुपरहिरो ते कोण...?’
नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारी आभा आमला अभिजित म्हणाली, ‘‘लहानपणी ‘आईबाबा ‘सुपरहिरो’ वाटतात. किशोरवयात कोण आहेत ही माणसे, असाही प्रश्न पडतो. बावीशीमध्ये कळायला लागते की हे लोक सुद्धा चुकतात. म्हणून आम्हाला देखील चुका करण्याची संधी द्या. जडणघडणीसाठी ही संधी मिळणे महत्त्वाचे असते.’’
...........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.