कर्जाचे ओझे असूनही सरकारची उधळपट्टी ः रंगनाथन

कर्जाचे ओझे असूनही सरकारची उधळपट्टी ः रंगनाथन
Published on

पुणे, ता. ३० : ‘महाराष्‍ट्रावर आजमितीला सुमारे आठ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. दुसरीकडे मते मिळवण्‍यासाठी राज्‍यकर्ते वेगवेगळ्या मोफत योजनांवर करदात्‍यांच्या पैशाची उधळपट्टी करीत आहेत,’ अशी टीका वैज्ञानिक, लेखक तसेच आणि राजकीय विश्लेषक आनंद रंगनाथन यांनी केली.
भारत इतिहास संशोधक मंडळाच्‍या नूतनीकरण केलेल्‍या वास्‍तूचे तसेच वि. का. राजवाडे सभागृहाचे रंगनाथन यांच्‍या हस्‍ते गुढीपाडव्‍याच्‍या मुहूर्तावर रविवारी उद््घाटन झाले. त्यावेळी ‘विकसित भारत २०४७ ः संधी व आव्‍हाने’ या विषयावर त्‍यांनी विचार व्‍यक्‍त केले. मंडळाचे अध्‍यक्ष प्रदीप रावत, सचिव पांडुरंग बलकवडे, उपाध्‍यक्ष बी. डी. कुलकर्णी, कोषाध्‍यक्ष नंदकुमार निकम, मायदेश फाउंडेशनचे अरुण जोशी आदी यावेळी उपस्थित होते.
रंगनाथन यांनी भारताचा इतिहास, न्‍यायव्‍यवस्‍थेतील अनास्‍था, बेरोजगारी, नोकरशाहीतील भ्रष्‍टाचार, बदलते आरोग्‍य, राजकीय धोरणे व त्‍याचे समाजावरील परिणाम, शेती व शेतकऱ्यांची दुरवस्था तसेच गेल्‍या दहा वर्षांतील विकास व चुकलेले धोरणे या अनुषंगाने भाष्य केले. ते म्‍हणाले, ‘‘इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्‍ट्रीयीकरण केले. याच बँका राज्‍यकर्ते सतत नफा मिळवून देणाऱ्या संस्था म्‍हणून वापरत आहेत. त्यामुळे बँकांच्या थकीत कर्जाचा आकडा कोट्यवधी रुपयांच्या घरात गेला आहे.’’
न्‍यायव्‍यवस्‍थेबाबत त्यांनी सांगितले की, ‘देशात इतके खटले प्रलंबित आहेत की त्‍यांचा निवाडा करण्‍यासाठी ३३ वर्षे लागतील. न्‍यायव्यवस्‍थेतील भ्रष्‍टाचारही उघड झाला आहे. १० टक्‍क्‍यांचा अपवाद सोडला तर इतर न्यायाधीश त्‍यांची संपत्‍ती जाहीर करीत नाहीत.’
‘कल्‍याणकारी, आरोग्‍यदायी धोरणे अवलंबणे ही राज्‍यांची भूमिका आहे. आपल्‍याकडील धोरणे आर्थिकदृष्‍टया कल्‍याणकारी वाटत असली तरी सामाजिकदृष्ट्या कल्‍याणकारी नसल्‍याचे दिसते. आजही ३४ टक्‍के बालके कुपोषित आहेत. २० टक्‍क्यांचे लसीकरण होऊ शकत नाही. ४४ टक्‍के लोकसंख्‍या शेतीत राबते, परंतु त्‍यांचा विचार केला जात नाही. शेतकऱ्यांचा माल साठवण्‍यासाठी पुरेशी गोदामे नाहीत. गेल्‍या दहा वर्षांत १ लाख १२ हजार शेतकऱ्यांनी आत्‍महत्‍या केल्‍या, पण त्‍याविषयी कोणी काही बोलत नाही. दुसरीकडे एका आयटी कर्मचाऱ्याने आत्‍महत्‍या केली तरी त्‍यावर चर्चा झडतात,’ असेही रंगनाथन यांनी सांगितले.
संसर्गजन्‍य आजारांचे प्रमाण ३० वर्षांपूर्वी ७० टक्‍के, तर असंसर्गजन्‍य आजारांचे प्रमाण ३० टक्‍के होते. ते आता उलट झाले असल्‍याचा मुद्दा त्‍यांनी अधोरेखित केला.
पांडुरंग बलकवडे यांनी मंडळाच्या भविष्‍यातील उपक्रमांविषयी माहिती दिली. रावत यांनी प्रास्‍ताविक केले. नव्‍या पिढीत इतिहासाची आवड निर्माण व्हावी म्हणून मंडळाने निर्माण केलेल्या सुविधांबाबत त्यांनी माहिती दिली. मंडळाच्‍या वास्‍तूचा जीर्णोद्धार करण्‍यासाठी चार कोटी रुपयांची देणगी देणारे उद्योजक तसेच मायदेश फाउंडेशनचे अरुण जोशी तसेच त्‍यामध्‍ये योगदान दिलेल्या व्यक्तींचा सत्‍कार करण्‍यात आला. नंदकुमार निकम यांनी सूत्रसंचालन केले.
...............
सरकारकडून जाहिरातींवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. हा सगळा करदात्यांचा म्हणजे आपलाच पैसा आहे. तो अशा कारणांसाठी खर्च करण्‍याऐवजी कल्‍याणकारी योजनांसाठी खर्च करायला हवा. तरच भारत विकसित होण्‍याच्‍या मार्गावर वाटचाल करू शकतो.
आनंद रंगनाथन, लेखक तसेच राजकीय विश्लेषक
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com