स्वागत दिवाळी अंकांचे
स्वागत दिवाळी अंकाचे
----------------
१) महा अनुभव
वैचारिक लेखांसह कथावाचनाचा आनंद यंदाच्या दिवाळी अंकातून मिळतो. सुहास पळशीकर यांनी ‘ज्ञानव्यवहारांवरील आक्रमण’ या लेखातून सामाजिक बदलाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. युरोपीय देशांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाल्यानंतरही आफ्रिकी देशांना नववसाहतवाद विळखा कायम होता. पण आता ही भावना झुगारून लावण्याचे धाडस अनेक देश दाखवू लागले आहेत. त्याचे वर्णन ‘आफ्रिकाः क्रांतीच्या दिशेने पावलं?’ मधून मोहन द्रविड यांनी केले आहे. भारती कोण आहेत? याचे उत्तर ‘अर्ली इंडियन्स’ या पुस्तकातून देणारे लेखक ज्येष्ठ पत्रकार टोनी जोसेफ यांची मुलाखत माहितीपूर्ण आणि विविध शंकांचे निरसन करणारी आहे. आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर आणि अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी अन्नग्रहणाबद्दलच्या विरोधाभासाबद्दल मते व्यक्त केली आहेत. याशिवाय ‘नवेगाव बांधच्या डोंगरवार पाटलांची गोष्ट’ तून रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी प्राणाहून प्रिय असणाऱ्या दिवंगत माधवराव डोंगरवार पाटलांचे व्यक्तीमत्त्व उलगडले आहे. या लेखांशिवाय सुभाष अवचट यांच्या ‘स्टुडिओतल्या कविता’ आणि मेघश्री दळवी यांच्या भविष्यवेध कथा वैशिष्टपूर्ण आहेत.
संपादक ः सुहास कुलकर्णी, पाने ः २०४, किंमत ः २५० रुपये
--------
२) मेहता मराठी ग्रंथजगत
‘मेहता मराठी ग्रंथजगत’च्या यंदाच्या दिवाळी अंकाचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ या प्रसिद्ध प्रकाशन संस्थेच्या गृहपत्रिकेचा हा दिवाळी अंक. ‘ऑपरेशन सिंदूर’निमित्त हा अंक सैन्यदलास समर्पित केला आहे. त्यात लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस, मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी, कर्नल संजोग शिंदे, सदानंद कदम, अभिषेक कुंभार, भाग्येश शिंदे यांचे लेख आहेत. डॉ. संजय ढोले यांची कथा, फारुक काझी, एकनाथ गायकवाड यांच्या बालकथा आणि दिवंगत प्रख्यात साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या कादंबऱ्यांच्या अनुवादिका उमा कुलकर्णी यांनी भैरप्पांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. डॉ. जयसिंगराव पवार यांचा ‘पंचगंगेच्या तीरावरून’ या आत्मचरित्रातील अंशही या अंकात आहे. याशिवाय आनंद यादव यांची ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ ही कविता, सुशांत सैनी यांच्या अनुवादित कथेचाही यात समावेश आहे.
संपादक : अखिल मेहता, पाने : १४४, किंमत : १०० रुपये
३) पद्मगंधा
‘पद्मगंधा’ या प्रसिद्ध प्रकाशन संस्थेच्या या दिवाळी अंकाचे हे ३८ वे वर्ष. ‘भारताबाहेरचा भारत’ असा यंदाच्या अंकाचा मध्यवर्ती विषय आहे. आपल्या आसपासच्या देशांतून भारतीय संस्कृती कधीपासून अन् कशी पसरत गेली, याची रंजक माहिती त्याअंतर्गत विविध लेखकांनी दिली आहे. त्यात ‘गेली रामकथा दूरदेशी’ हा डॉ. अरुणा ढेरे यांचा वाचनीय लेख आहे. आशियाभर बौद्ध धर्म (डॉ. मंजिरी भालेराव), ‘तीर्थक्षेत्र’ पाकिस्तान (दीपाली पाटवदकर), डॉ. राहुल देशपांडे, डॉ. अंबरीष खरे, नीलांबरी जोशी, डॉ. संप्रसाद विनोद, मेधा गोविलकर आदी लेखकांचे लेख या विभागात आहेत. याशिवाय अरुण जाखडे, शशिकांत हिंगोणेकर यांच्या कविता, मानसी होळेहोन्नूर, रवींद्र दामोदर लाखे, रश्मी कशेळकर, लक्ष्मीकांत देशमुख, श्रीनिवास शारंगपाणी यांच्या कथा, भारत सासणे, मृणाल कुलकर्णी, समीर गायकवाड, अवंती कुलकर्णी यांचे ललित लेख आहेत. स्त्री-पुरुष विषयावर डॉ. मुक्ता कम्प्लिकर, इब्राहिम अफगाण यांचे लेख आहेत. याशिवाय डॉ. राधा मंगेशकर, अभिषेक जाखडे, डॉ. आशुतोष जावडेकर यांची प्रवासवर्णने आहेत. रवींद्र तांबोळी यांचा विनोदी लेखही आहे.
संपादक : अभिषेक जाखडे, संतोष शेणई, पाने : २९२, किंमत : ४०० रुपये
फोटो ः 61961, 61960
------------------------------------------
४) छात्र प्रबोधन
ज्ञानप्रबोधिनीतर्फे कुमारांसाठी प्रसिद्ध होणाऱ्या ‘छात्र प्रबोधन’चा
४०० अंक हा दीपावली विशेषांक आहे. त्यासह त्यांनी ग्रामीण
विद्यार्थ्यांसाठी सुबोध दिवाळी अंकही प्रकाशित केला आहे. कथा, कविता, ललित, माहितीपर लेखांबरोबरच ‘माझी बंडखोरी’ ही विशेष लेखमाला आहे. यात भीमराव गस्ती, सीमंतिनी खोत, आबा महाजन आणि सुधा कोठारी यांचे प्रोत्साहनात्मक लिखाण आहे. ४०० व्या अंकानिमित्त अनेकांनी छात्र प्रबोधिनीच्या आठवणी जागविल्या आहेत. या अंकात आकाशकंदीलाची खास भेटही बालकुमारांसाठी दिली आहे. ग्रामीण भागातील मुलांसाठी प्रसिद्ध केलेल्या सुबोध दिवाळी विशेषांकाच्या मुखपृष्ठातून गावांमधील घरातील दिवाळीची लगबग सुबकपणे चितारली आहे. चुकीच्या गोष्टींत बदल घडविण्यासाठी झटणारे पोलिस अधीक्षक प्रवीण इंगवले, शालेय प्रशासनाविरोधात बंड करणारे कलाशिक्षक जयंत टोले, आंतरराष्ट्रीय पातळीवर फुटबॉल खेळण्यासाठी कुटुंबाशी, समाजाशी बंड पुकारलेली अंजू तुंबरेकर यांच्या प्रेरणादायी कथा यात आहेत. विविध विषयांची माहिती देणारे लेख, पराक्रमाच्या कथा व कविता, कल्पक कोडी, विज्ञानप्रयोगांनी अंक सजला आहे.
छात्र प्रबोधन
संपादक ः महेंद्र सेठिया, पाने ः १३६, किंमत ः १२० रुपये
५) छात्र प्रबोधन (सुबोध ग्रामीण अंक)
संपादक ः महेंद्र सेठिया, पाने ः ४८, किंमत ः ६० रुपये
---
६) समतोल
़‘ऋण’ या शब्दाला अनेक अर्थ आहेत. एखाद्याकडे मागितलेले आर्थिक साह्य म्हणजे ऋण कर्जरूपात असते. जीवनात आईवडील, शिक्षक यांनी घडविलेले संस्कार, मित्रपरिवाराने सुसह्य केलेले जगणे आणि आयुष्यात वेळोवेळी विविध व्यक्तींकडून मिळालेली मदत हेही ऋणच असते. ‘समतोल’चा दिवाळी अंक ‘ऋण’ याच सूत्रावर आधारित आहे. गिरीश श्री बापट यांनी ‘विज्ञानाची माझ्यावरील आठ ऋणे’, मेजर (निवृत्त) मोहिनी गर्गे-कुलकर्णी यांचे ‘देशऋण’ गुरुदास नूलकरांचे ‘निसर्गऋण- संकल्पना की नैतिक जबाबदारी’ असे लेख आहेत. डॉ. शुभंकर कुलकर्णी, आरती देगांवकर, डॉ. राधिका टिपरे, शोभना बेरी यांच्या कवितांसह ललित विभागात विविध विषयांवरील लेख आहेत.
संपादक ः डॉ. अनघा लवळेकर, पाने ः १००, किंमत ः १८० रुपये
----------------
७) अक्षरलिपी
अक्षरलिपी या दिवाळी अंकाची रिपोर्ताज ही वाचकांच्या पसंतीस उतरलेली लक्षवेधी ओळख आहे. प्रत्यक्ष सातपुड्यातल्या दुर्गम प्रदेशात शिक्षणवाटा चालणाऱ्या लेकरांचा यशस्वी संघर्ष, कोलकत्याच्या सोनागाछीमध्ये उमटणारे प्रेम आणि मातृत्वाचे तरंग, हिंसेने पोळलेल्या मुस्लिम महिलांच्या मनाची उलथापालथ रिपोर्ताजमधून उलगडते. नवख्या लेखकाच्या कादंबरीचा अंश आणि एका थक्क करणाऱ्या अनुवादित कादंबरीचा भाग कुतूहल वाढविणारा आहे. याशिवाय वैविध्यपूर्ण विषयांवरील लेख, अनुभव, ललित लेख, रूढ चौकटी मोडणाऱ्या कथा आणि जगण्याचा तळ शोधणाऱ्या कविता अंकाच्या देखणेपणात भर टाकत आहेत. या अंकात रेणुका कल्पना, भरत दौंडकर, अक्षय शेलार, सुकल्प कारंजेकर, हिनाकौसर खान, परिणिता दांडेकर, सौरभ शामराज, विशाल राठोड, स्वाती पाटील, ज्योतिराम कांदे आदींनी लेखन केले आहे. ऐश्वर्या रेवडकर यांची ‘बाईल आणि पाखरं’, वसीमबारी मणेर यांची ‘टेप’ तर योजना यादव यांची ‘व्हर्जिन ॲट ४५’ या कथा अंकात आहेत.
संपादक ः शर्मिष्ठा भोसले, पाने ः १८८, किंमत ः २५०
------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

