रूपेश मारणेला नऊ महिन्यांनी अटक
पुणे, ता. २८ : कुख्यात गुंड गजानन मारणे टोळीचा सक्रिय सदस्य रूपेश मारणे याला कोथरूड पोलिसांनी आज पहाटे मुळशी तालुक्यातील आंदगाव येथून एका बंगल्यातून अटक केली. गेल्या नऊ महिन्यांपासून तो फरार होता. त्याच्यावर खंडणी, मारहाण, हत्येचा प्रयत्न आणि संघटित गुन्हेगारी (मकोका) कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल आहेत.
रूपेश कृष्णराव मारणे (वय ४०, रा. शास्त्रीनगर, पौड रस्ता, कोथरूड) हा टोळीतील महत्त्वाचा सदस्य असून टोळी प्रमुख गजा मारणेशी त्याचा थेट संपर्क होता. फरार असतानाही तो टोळीच्या अनेक बेकायदेशीर व्यवहारांचे नियोजन करीत होता. कोथरूडमध्ये आयटी अभियंता देवेंद्र जोग यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात गजा मारणे टोळीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गजा मारणे व त्याची टोळी चित्रपट पाहून कोथरूडकडे परत जात होती. त्यावेळी मिरवणुकीमुळे वाहतूक कोंडी झाली होती. त्यातून या टोळीने जोग याला मारहाण केली होती. त्यात गजा मारणेसह अनेकांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर मकोका कारवाई केली आहे. तेव्हापासून रूपेश फरार होता. कोथरूड पोलिस तसेच गुन्हे शाखेचे पथक त्याचा शोध घेत होते.
अशी केली अटक
आंदगावमधील एका मोठ्या बंगल्यात रूपेश लपून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिस पथकाने पहाटेच्या सुमारास या बंगल्याला वेढा घातला. त्यानंतर त्यांनी दरवाजा वाजविला. त्यावेळी महिलेने दार उघडल्यावर पोलिसांनी रूपेशला ताब्यात घेतले, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.
यापूर्वीही मुळशीतून अटक
रूपेशवर यापूर्वी खुनाचा प्रयत्न करणे, व्यावसायिकाचे अपहरण करणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. व्यावसायिकाचे अपहरण करून चार कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी तीन वर्षांपूर्वी गजा व रूपेश मारणेसह १५ जणांवर मकोकानुसार कारवाई झाली होती. त्यावेळीही रूपेश अनेक महिने फरार होता. तेव्हाही त्याला मुळशीतून अटक केली होती. या गुन्ह्यातही त्याला मुळशीत अटक केली आहे.
तीन दिवस मकोका कोठडी
रूपेश मारणेला विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात मंगळवारी दुपारी हजर केले होते. रूपेशने संगणक अभियंता तरुणाला मारहाण करण्यासाठी चिथावणी दिली असून, सीसीटीव्ही चित्रीकरणात त्याचा गुन्ह्यात सहभाग दिसून येतो. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार होता. त्याच्यावर २० गुन्हे दाखल आहेत. मारणे टोळीचे वर्चस्व व दहशत राखण्यासाठी हा गुन्हा केला असून, त्याबाबत आरोपीकडे तपास करायचा आहे. त्यासाठी त्याला मकोका कोठडीची मागणी विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केली. ती मान्य करत रूपेशला तीन दिवस मकोका कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

