कायदा काय सांगतो?
- ॲड. जान्हवी भोसले
प्रश्न : सासरच्यांनी दिवाळीसाठी मला माहेरी सोडले होते, परंतु आता मला सासरच्या घरात येण्यास बंदी घालत आहेत. तसेच मला वकिलामार्फत घटस्फोटाची नोटीस पाठवलेली आहे. मला घटस्फोट द्यायचा नाही. मला फसवून माहेरी आणून सोडले आहे आणि मला नांदायची इच्छा आहे. तर मी काय करावे?
उत्तर : तुम्हाला पाठवलेल्या नोटिशीला उत्तर देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तुम्ही न्यायालयामध्ये नांदायला घेऊन जाण्यासाठी अर्ज, म्हणजेच ‘रेस्टिट्यूशन ऑफ काँजुगल राईट्स’ अंतर्गत केस दाखल करू शकता. या प्रकरणात तुम्हाला फसवून माहेरी सोडल्याचे, तसेच तुम्ही जर काही ‘मेसेजे’स केले असतील किंवा फोन कॉलचे रेकॉर्डिंग असेल, तर तेही पुरावे म्हणून वापरले जाऊ शकतात. कोणत्याही कारणाशिवाय पती-पत्नीने वेगळे राहणे कायदेशीर नाही. तुमच्या पतीला तुम्हाला का नांदवायचे नाही हे न्यायालयात सिद्ध करावे लागेल आणि पुरावे द्यावे लागतील. जर त्याने योग्य कारण दाखवले नाही, तर न्यायालय त्याला तुम्हाला नांदायला घेऊन जाण्याचा आदेश देईल.
प्रश्न : दिवाळी दरम्यान फटाके उडवत असताना सोसायटीतील काही मुलांकडून आमच्या घरामध्ये फटाके आले आणि यामुळे घरातील पडदा, बेड आणि एक रूम पूर्णपणे जळाली. यामध्ये आमचे भरपूर आर्थिक नुकसान झाले आहे. तर आम्ही काय करू शकतो?
उत्तर : फटाके उडवताना झालेली घटना ही अपघात असू शकते. परंतु जर हे वारंवार होत असेल किंवा मुद्दामहून केले गेल्याचा संशय असेल, तर तुम्ही जवळच्या पोलिस ठाण्यामध्ये तक्रारीचा अर्ज देऊ शकता आणि त्या मुलांच्या विरुद्ध कारवाईची मागणी करू शकता. तसेच तुम्ही नुकसानभरपाईचा दावा कोर्टामध्ये दाखल करून तुमचे नुकसान परत मिळवू शकता.
प्रश्न : मी एका खासगी कंपनीमध्ये नोकरीला आहे, जेथे दिवाळीची आम्हाला चार दिवसांची सुट्टी होती. दिवाळी दरम्यान गावी गेलो होतो, परंतु काही कारणाने गाडी न मिळाल्याने मी कामावर तीन दिवस उशिरा आलो. त्यानंतर मला कोणतीही नोटीस पिरियड न देता कामावरून काढून टाकले आहे. मी काय करू शकतो?
उत्तर : तुमच्या कंपनीबरोबर झालेल्या करारनाम्यामध्ये (कॉन्ट्रॅक्ट किंवा जॉइनिंगच्या टर्म्समध्ये) काय लिहिले आहे हे तपासणे गरजेचे आहे. जर त्यामध्ये कंपनीला अधिकार दिलेले असतील की, नोटीस न देता कोणत्याही व्यक्तीला कारण न दाखवता काढून टाकता येईल, तर तुमचे टर्मिनेशन कायदेशीर ठरू शकते. परंतु, जर असा क्लॉज नसेल, तर नोटीस पिरियड देणे आवश्यक होते. ते न दिल्यामुळे तुम्ही कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवू शकता, तसेच नुकसानभरपाईचा दावा दाखल करू शकता.
प्रश्न ः मी १९९० मध्ये बंगला विकत घेतला होता. त्यात मी माझ्या बहिणीला पहिल्या मजल्यावर राहण्यासाठी (त्यांची सोय म्हणून) जागा दिली होती; परंतु त्याची कुठलीही लेखी कागदपत्रे नाहीत. बहिणीचा नवरा आणि मुलगा तिथे राहत होते. बहिणीच्या निधनानंतर मी माझे घर परत मागितले असता बहिणीचा मुलगा ते देत नाही आणि मला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतो, ‘घर देणार नाही, तुला काय करायचे ते कर’ अशी धमकी देखील देतो. तर मी काय करू शकतो?
उत्तर ः सर्वप्रथम वकीलाद्वारे कायदेशीर नोटीस पाठवून त्यांना घर रिकामे करण्याचा शासकीय, कायद्याच्या रीतीने आदेश द्या. नोटीसमध्ये तुम्ही मालकी दाखवणारी सर्व कागदपत्रे जोडावीत.
नोटीसनुसार ते न गेले तर सिव्हिल कोर्टात ताबा व निर्गमनासाठी दावा दाखल करा. कारण तुम्ही मालक आहात आणि त्यांनी परवानगीवर राहिल्यामुळे त्यांचे स्वतंत्र मालकीचे अधिकार ठरत नाहीत. कोर्टात दाखल केल्यानंतर तुमचे तात्पुरते आदेश मिळू शकतात.
(दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्यांबाबत नागरिकांना काही शंका असतील तर त्यांनी law@esakal.com या ई-मेलवर विचाराव्यात. त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

