दिवाळी अंक २

दिवाळी अंक २

Published on

१) फिरकी

कौटुंबिक विनोदी वार्षिक अशी ओळख असलेला ‘फिरकी’ हा दिवाळी अंक मुखपृष्ठापासूनच लक्ष वेधून घेतो. विनोदी कथा, कविता, चुटके, वात्रटिकांनी हा अंक सजला आहे. डॉ. मोनाली हर्षे यांचा ‘आपुले मरण पाहिले म्या डोळा’, हॅपी जर्नी-सोनाली करमरकर, योगायोग-सचिन बेंडभर, भेळेचा झटका-श्वेता सुनील कुलकर्णी, येस येस बॉस-अनुजा कुलकर्णी, बंड्या शाळेत जातो-श्रीपाद टेंबे, एक वजनी समस्या-प्रा. चंद्रसेन टिळेकर आदींच्या लेखांचा समावेश आहे. कविता विभागात शब्बीर दाऊद, सोनल फलटणे, बाळकृष्ण बाचल, प्रा. देवबा पाटील आदींच्या रचना प्रकाशित झाल्या आहेत. या सोबतच महादेव साने, दत्तात्रेय म्हेतर, प्रकाश वर्मा, प्रभाकर दिघेवार, जया सुधाकर, अशोक मंत्री, अरविंद गाडेकर यांनी व्यंगचित्रे रेखाटली आहेत.
- संपादक : गौरव कुलकर्णी, पाने : २०८, किंमत : २००
------------
२) कुंभश्री
समाज प्रबोधनास वाहिलेले मासिक असलेल्या ‘कुंभश्री’ने यंदा आपला ३२ वा दिवाळी अंक प्रकाशित केला आहे. समाजातील प्रमुख घटनांचा मागोवा अंकात घेण्यात आला आहे. मानसीच्या आईबाबांचे माहेरपण-चंद्रकांत नवले, मौनातील घुसमट-अंजली राठोड-श्रीवास्तव, कस्तुरीचा गंध-अनुजा कुलकर्णी, सुख आले दारी-रश्‍मी पटवर्धन आदींनी कथा लिहिल्या आहेत. तर, चैतन्य कुंभार, सलिल चौधरी, डॉ. दिलीप गरुड, श्रीपाद कुलकर्णी, रत्नाकर वाणी, जयश्री क्षीरसागर, श्रद्धा बोरसे, शैलजा कुंभार यांनी विविध विषयांवर लेख लिहिले आहेत. शिवाय, काही लेखांतून आरोग्यविषयक जागृती करण्यात आली आहे. हुंडाबळी, स्त्री दाक्षिण्य, महाराष्ट्रातील महिलांचे वर्ष या विषयावरील लेख मार्गदर्शक ठरणारे आहेत.
- संपादक : संजय पांडुरंग राजे, पाने : ४००, किंमत : ३०० रुपये

३) आरोग्यदीप
या अंकात वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर बालके, स्त्रिया, पुरुष, ज्येष्ठ व्यक्ती या सर्वांच्या आरोग्य संवर्धनासाठी उपयुक्त लेख नामवंत आणि तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यांनी लिहिलेले आहेत. व्याधी प्राथमिक अवस्थेतच कशी ओळखावी, त्यासाठी काय उपचार घ्यावेत, याबद्दलचेही मार्गदर्शन या अंकामध्ये आहे. आयुर्वेद, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आहारशास्त्र, पर्यावरणाशी संबंधित समस्या यावर मार्गदर्शन करणारा घरातील प्रत्येकाला काहींना काही उपयुक्त टीप मिळणारा असा हा अंक आहे. या अंकात वैद्य अनंत धर्माधिकारी, वैद्य स्वराली शेंड्ये, डॉ. सुप्रिया गुगळे, डॉ. प्रज्ञा आपटीकर, डॉ. मंदार परांजपे, डॉ. मिहीर हजरनवीस, डॉ. प्रज्ञा अक्कलकोटकर, डॉ. अरविंद लिमये, डॉ. प्रणिता अशोक आदींचे लेख आहेत. तसेच शब्दकोडे, रुचकर आणि आरोग्यदायी पाककृती अन् आरोग्य भविष्य असा अनोखा फराळही या अंकात आहेत.

संपादक ः डॉ. श्रीकांत वाघ, पाने ः ९६, किंमत ः २००
--------------
४) ग्रहबोली
------------
कल्पनाशक्ती आणि सामाजिक-वैचारिक चिंतन यांचा संगम म्हणून ‘ग्रहबोली’च्या दिवाळी अंकाकडे पहावे लागेल. या अंकात ज्योतिष, गूढविद्या, अध्यात्म, आरोग्य, अर्थ आणि पर्यटन आदी क्षेत्रांतील लेखांचा समावेश आहे. या अंकासाठी डॉ. वा. ल. मंजुळ, मीना महागावकर, न. म. जोशी, श्याम भुर्के, अमरेंद्र धनेश्वर, रमणलाल शहा, सुमती सामंत, नाडीतज्ज्ञ ईश्वरन, शैला दातार, दिलीप ठाकूर, वैद्य मोहन तांबे, पद्माकर पाठकजी, चंद्रकला जोशी, समीर लेले, प्रदीप पंडित, अरविंद चांदेकर, सेनगुप्ता सुत्रावे, जयश्री देशपांडे, अग्निहोत्री, विश्वास वसेकर, व्यंगचित्रकार विवेक म्हेत्रे आदींचे योगदान आहे.
संपादक ः सुहास डोंगरे, पाने ः १६०, किंमत ः ३०० रुपये
-------------------------------
५) युवावार्ता
अंकात विनोदी कथा, लेख, व्यंगचित्रे, कविता यांचा समावेश आहे. युवकांनी महाराष्ट्र धर्म वाढवावा, हा प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर यांचा लेख अभ्यासपूर्ण आहे. इंग्रज काळातील अनगड वाटेवरुन रतनगड ते हरिश्चंद्रगडाची सफर श्रीकांत कासट यांनी उत्तमरीत्या घडवली आहे. सु. ल. खुटवड यांची विनोदी कथा आहे. मॉरिस फ्रायडमन यांच्या विविध पैलूंचे दर्शन अमोल साळे यांनी घडवले आहे. महिला
क्रिकेटचे विश्व गायत्री चंदावरकर यांनी उत्तमरीत्या उलगडून दाखवले आहे. स्पर्धा परीक्षेच्या वास्तवावर सोपान आरोटे यांनी नेमके बोट ठेवले आहे. फोक आख्यानाचे मर्म सुदीप हासे यांनी उलगडून दाखवले आहे. त्याचबरोबर मुरारी देशपांडे, प्रा. डॉ. शेषराव पठाडे, मकरंद जोशी, एन. बी. धुमाळ, डॉ. योगेंद्र सचदेव, डॉ. गिरीश सावंत, विजय डाके आदींचे लेख आहेत. अरविंद गाडेकर यांची व्यंगचित्रे आहेत.
संपादक ः किसन हासे, पाने ः १७७, किंमत ः २५० रुपये

६) चित्रांगण
पहिलाच दिवाळी अंक असूनही या अंकात अनेक मान्यवरांनी ‘आठवणीतील सिनेमा’ ‘आयुष्यातील प्रकाशाचा किरण’ आणि ‘आयुष्यातील गोड अपघात’ या तीन विभागात आपले अनुभव मांडले आहेत. मराठी चित्रपटातील माईलस्टोन असलेला ‘पिंजरा’, ‘तुकाराम’ ‘बरान’, ‘द डार्क नाईट’, द रेल्वे मॅन’ यांसारखे वेगवेगळ्या भाषेतील सिनेमे आणि त्याबद्दलच्या आठवणी या अंकात आहेत. डॉ. पराग काळकर, तेजस्वी सातपुते, अमृता देसर्डा, समीर सामंत, शैलेश गोजमुंगडे, वर्षा घुगे, यांनी मांडलेले विविध अनुभव वाचनीय आहेत. विजू माने यांचा ईश्वरीय चैतन्याचा अनुभव देणारा लेख आहे. नीलम शिर्के-सामंत यांचा लेख ‘आयुष्यातील गोड अपघात’ या विभागातला लेखही अनुभव समृद्ध करणारा आहे. ‘हेच तर हवं होतं’ या नावाची कथा तेजस्वी आमले यांनी लिहिली आहे. हेमराज बागुल यांची ‘पैंजणी पायांचं भय’ ही कविता विशेष उल्लेखनीय आहे.

संपादक : अश्विनी धायगुडे- कोळेकर, पाने : ९४; किंमत : २०० रुपये.

७) समाजमन
‘परंपरा संस्कृतीची’ या विषयावर आधारित हा दिवाळी अंक असून, त्यात विविध मान्यवरांनी आशयसंपन्न लेखन केले आहे. वारसा, परंपरा, संस्कृती, आशय आणि विषय या विविध विषयांवर आधारित विचारांना चालना देणारे लेख आहेत. राजकीय, शैक्षणिक, व्यावसायिक, सांस्कृतिक, कला आणि क्रीडा या विविध पातळींवर काम करणाऱ्या मान्यवरांनी या अंकात योगदान दिले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नात्याविषयी लिहिलेला ‘अनोखे बाप-लेक’ हा वंदना कोर्टीकर यांनी लिहिलेला लेख विशेष उल्लेखनीय आहे. उमेश झिरपे, अर्चना मिरजकर, मिलिंद देशपांडे, निवेदिता एकबोटे, अमृता देसर्डा, मंगेश कुलकर्णी, केशव साठये, संजय चाकणे, नूतन कुलकर्णी, विकासनाना फाटे, अमोघ वैद्य, निवेदिता एकबोटे आदी मान्यवरांनी या अंकात आपले अनुभव मांडले आहेत.
संपादक : वंदना कोर्टीकर, पाने : १०२, किंमत : २५० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com