मराठी रंगभूमीवर नव्या नाटकांची नांदी
पुणे, ता. ३० ः गेल्या काही महिन्यांपासून सुवर्णकाळ अनुभवत असलेल्या मराठी रंगभूमीवर अनेक नव्या नाटकांची नांदी होत आहे. दिवाळीची सुटी आणि नोव्हेंबर-डिसेंबर या मोसमाचा मुहूर्त साधून १२ ते १५ नवी नाटके रंगभूमीवर येत आहेत. यात ‘सखाराम बाइंडर’, ‘हिमालयाची सावली’ अशा काही जुन्या नाटकांसह ‘ठरलंय forever’, ‘करुणाष्टके’, ‘शंकर जयकिशन’ अशा नव्याकोऱ्या नाटकांचाही समावेश आहे.
मराठी रंगभूमीवरील बहुतांश नाटकांना सध्या रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. जवळपास प्रत्येक नाटक बहुतांश प्रयोगांना ‘हाऊसफुल्ल’चा फलक अनुभवत आहे. रंगभूमीसाठी अशी सुचिन्हे असतानाच अनेक नव्या नाटकांची नांदी झाली आहे. नोव्हेंबर-डिसेंबर हा नव्या नाटकांच्या मुहूर्ताचा मोसम असतो. यंदाही या मोसमात नव्या नाटकांच्या प्रयोगांची घोषणा झाली.
लेखक-दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांच्या ‘संगीत देवबाभळी’ नाटकाच्या अभूतपूर्व यशानंतर त्यांच्या नव्या कलाकृतीची रसिकांना प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षा संपली असून भद्रकाली प्रॉडक्शनतर्फेच त्यांचे ‘करुणाष्टके’ हे नवे नाटक रंगभूमीवर आले आहे. गीतांजली कुलकर्णी, पर्ण पेठे, कल्याणी मुळे अशा अनेक सशक्त अभिनेत्रींची भूमिका असलेल्या या नाटकाबद्दल उत्सुकता आहे. ‘भद्रकाली’तर्फेच ‘अफलातून’ हे नाटक ४० वर्षांनंतर पुनरुज्जीवित करण्यात येत असून लवकरच त्याच्या प्रयोगांचा शुभारंभ होणार आहे.
प्रा. वसंत कानेटकर लिखित ‘हिमालयाची सावली’ आणि विजय तेंडुलकर लिखित ‘सखाराम बाइंडर’ या दोन अजरामर नाटकांचेही नव्या संचात प्रयोग सुरू झाले आहेत. शरद पोंक्षे आणि सयाजी शिंदे हे दोन अनुभवी अभिनेते या नाटकात प्रमुख भूमिकेत आहेत. महेश मांजरेकर आणि भरत जाधव यांच्या अभिनयाची पर्वणी अनुभवण्याची अनोखी संधी ‘शंकर जयकिशन’ या नाटकातून मिळणार आहे. विराजस कुलकर्णी लिखित, सूरज पारसनीस दिग्दर्शित या नाटकात शिवारी रांगोळी हिचीही भूमिका आहे. पुण्यातील ‘वाइड विंग्ज मीडिया’ या संस्थेने ‘ठरलंय forever’ हे आगळेवेगळे नाटक आणले असून हृता दुर्गुळे हिची प्रमुख भूमिका असलेल्या या नाटकात एलईडी स्क्रीनसह अनेक नवे प्रयोग पाहायला मिळणार आहेत. यासह ‘नवा गडी नवं राज्य’, ‘कुणीतरी आहे तिथं’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘कालचक्र’, ‘एकदा पाहावं करून’ आदी नाटकांच्याही घोषणा करण्यात आल्या आहेत.
पुण्यातील कलाकारांचे ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’
पुण्यातील युवा कलाकार विनोद रत्ना लिखित-दिग्दर्शित ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ ही एकांकिका यावर्षी अनेक स्पर्धांमध्ये गाजली. ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनीही एका स्पर्धेत ही एकांकिका पाहिली आणि ती ‘जिगीषा’ संस्थेतर्फे व्यावसायिक रंगभूमीवर आणायचे त्यांनी ठरवले. विशेष म्हणजे, एकांकिकेत भूमिका करणारे श्रेयस जोशी, वैभव रंधवे, समृद्धी कुलकर्णी हेच कलाकार दोन अंकी नाटकात काम करणार असून विनोद रत्ना यांनीच लेखन-दिग्दर्शन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

