झटपट परवानगी योजनेचा ४१६४ वीज ग्राहकांना लाभ महिनाभरात २२ मेगावॅट क्षमता वाढवली
पुणे, ता. ३० :  घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक अशा सर्व वीज ग्राहकांना गरजेनुसार वीजवापर वाढविण्यासाठी महावितरणने झटपट स्वयंचलित परवानगी योजना राबविल्यामुळे राज्यातील ४,१६४ वीज ग्राहकांनी सुमारे एक महिन्यात २२ मेगावॅट क्षमता वाढवून घेतली. यामध्ये २ हजार ४६० औद्योगिक वीज ग्राहकांचा समावेश आहे.
 वीज ग्राहकांना सहजपणे सेवा मिळण्यासाठी  ‘इज ऑफ लिव्हिंग’च्या सूत्रानुसार महावितरणने वीज ग्राहकांसाठी मंजूर भार वाढविण्यासाठी (लोड एनहान्समेंट) एक स्वयंचलित व्यवस्था सुरू केली आहे. या योजनेमध्ये ग्राहक घरबसल्या महावितरणच्या मोबाईल अॅप्लिकेशन किंवा वेबसाइटवर अर्ज सादर करून आणि योग्य शुल्क भरून आपला मंजूर भार वाढवून घेऊ शकतात. ग्राहकाने शुल्क भरल्यानंतर ४८ तासात त्याला परवानगी असलेला मंजूर भार वाढवून दिला जातो.
महावितरणने ही सुविधा २६ सप्टेंबर रोजी सुरू केली. महिनाभरात राज्यातील ४ हजार १६४ ग्राहकांनी नव्या सुविधेचा लाभ घेतला. त्यामध्ये सर्वाधिक २ हजार ४६० औद्योगिक वीज ग्राहक आहेत. घरगुती ग्राहकांची संख्या ९४२ असून, ५०९ व्यावसायिक ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घेतला. याखेरीज २५३ अन्य ग्राहकांनाही लाभ झाला, असे महावितरणकडून सांगण्यात आले
 वीज ग्राहकांना महावितरणकडून कनेक्शन देताना त्यांच्या मागणीनुसार वीज वापराबाबतची क्षमता निश्चित केली जाते. त्याला मंजूर भार म्हणतात. औद्योगिक ग्राहकांना उत्पादनात वाढ होत असेल किंवा अधिक क्षमतेची यंत्रसामग्री वापरायची असेल तर अधिक भार मंजूर करून घ्यावा लागतो. सामान्यतः घरगुती वीज ग्राहकांचा मंजूर भार दोन ते पाच किलोवॅट इतका असतो. ग्राहकांना एअर कंडिशनिंगसारख्या सुविधा बसविण्यासाठी भार वाढवून घ्यावा लागतो. महावितरणने सुरू केलेल्या नव्या सुविधेमुळे ग्राहकांना घरबसल्या ऑनलाइन सेवा उपलब्ध झाली आहे.
-------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

