सौंदर्यामागे दडलाय पर्यावरणाचा शत्रू
पुणे, ता. ३१ : शहरातील तळजाई टेकडीसह अनेक भागांत सध्या पिवळ्या कॉसमॉस फुलांचा मनमोहक बहर दिसत आहे. छायाचित्रांसाठी नागरिक या फुलांजवळ गर्दी करतात. सोशल मीडियावर या फुलांच्या पार्श्वभूमीवर घेतलेली छायाचित्रे टाकली जातात. मात्र, दिसायला आकर्षक असलेली ही फुले प्रत्यक्षात परदेशी आक्रमक वनस्पती असून, स्थानिक जैवविविधतेवर आणि पशुधनाच्या खाद्यासाठी एक गंभीर धोका निर्माण करत आहेत.  
कॉसमॉस ही मूळ मेक्सिकोतील वनस्पती असून ती सूर्यफूल (ॲस्टेरेसी) कुटुंबातील सदस्य आहे. तिची वाढ अत्यंत झपाट्याने होते आणि वाऱ्याद्वारे किंवा इतर माध्यमांतून बियाणे सहजपणे पसरतात. त्यामुळे अल्पावधीत ती मोठ्या क्षेत्रावर फैलावते. परिणामी स्थानिक गवत, झुडपे आणि फुलझाडांना ती स्पर्धा करते आणि त्यांच्या वाढीस अडथळा निर्माण करून त्यांचे अस्तित्व कमी करते. त्यामुळे स्थानिक जैवविविधतेचा समतोल बिघडतो आणि गुरेढोरे तसेच वन्य शाकाहारी प्राण्यांसाठी आवश्यक असणारा नैसर्गिक चारा कमी होतो.  
याविषयी वनस्पतीतज्ज्ञ डॉ. सचिन पुणेकर म्हणाले, ‘‘कॉसमॉससारख्या आक्रमक वनस्पती आपल्या हिरव्या क्षेत्रांचा ऱ्हास करत आहेत. या झाडांची फुले येण्यापूर्वीच निर्मूलन करणे गरजेचे आहे, कारण त्यानंतर त्यांची बियाणे मोठ्या प्रमाणावर पसरतात. लोकसहभागाशिवाय या समस्येवर उपाय शक्य नाही. याच पार्श्वभूमीवर डॉ. पुणेकर यांनी ‘जैविक आक्रमणाविरुद्ध चळवळ ‘(माबी - मूव्हमेंट अगेन्स बायोलॉजिकल इन्वेंशन)’ ही सार्वजनिक चळवळ सुरू केली आहे. या उपक्रमाद्वारे पर्यावरणवादी, शासकीय अधिकारी, संशोधक, शेतकरी आणि शैक्षणिक संस्था एकत्र येऊन स्थानिक जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.’’ 
चाऱ्याचा प्रश्न गंभीर
पूर्वी ही वनस्पती केवळ रेल्वे ट्रॅकच्या बाजूने दिसायची; पण गेल्या काही वर्षांत ती शहरातील टेकड्या, घाट आणि खुल्या जागांवर मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. स्थानिक गवतांची संख्या घटल्याने चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. तळजाईसारख्या जैवविविधतेने समृद्ध असलेल्या भागात या तणाचा विस्तार परिसंस्थेच्या स्थैर्यासाठी धोकादायक ठरू शकतो, अशी चिंता पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.  
पर्यावरणतज्ज्ञ म्हणतात...
१) कॉसमॉस फुलांचा दुष्परिणाम म्हणजे मधमाश्या, फुलपाखरे आणि बीटल्स या फुलांकडे आकर्षित होतात, ज्यामुळे स्थानिक फुलझाडांच्या परागीकरण प्रक्रियेवर परिणाम होतो
२) दीर्घकाळात यामुळे संपूर्ण जैवसाखळीवर विपरीत परिणाम होऊ शकतो
३) या आक्रमक तणांचा प्रसार रोखण्यासाठी सरकार, स्थानिक स्वराज संस्था आणि ग्रामपातळीवरील जैवविविधता समित्यांनी एकत्र येणे गरजेचे 
४) नागरिकांनी सौंदर्याच्या मोहात न पडता या वनस्पतींचा धोका ओळखून त्यांचे निर्मूलन करण्यासाठी पुढाकार घ्यावा
५) लोकसहभागातून ‘कॉसमॉस मुक्त पुणे’ संकल्पना वास्तवात उतरू शकते
कॉसमॉस फुले जरी दिसायला मनोहारी असली, तरी ती आपल्या पर्यावरणासाठी आणि जैवविविधतेसाठी हानिकारक आहेत. निसर्गाच्या सौंदर्यामागे दडलेला हा धोका आता ओळखण्याची आणि एकत्रित प्रयत्नांद्वारे तो थोपविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या वनस्पतीच्या उच्चाटनासाठी सरकारने याविषयी एक धोरण निर्माण करण्याची गरज आहे. 
- डॉ. सचिन पुणेकर, वनस्पतीतज्ज्ञ 
साधारण ३० वर्षांपूर्वी कॉसमॉसच्या तणांची वाढ कमी होती. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये बदलत्या वातावरणामुळे प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे स्थानिक, दुर्मीळ आणि छोट्या वनस्पतींचा नैसर्गिक अधिवास कमी होत आहे. स्थानिक जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी त्वरित आणि नियोजनबद्ध उपक्रम हाती घेणे आता अत्यावश्यक आहे.
- डॉ. श्रीनाथ कवडे, वनस्पतीतज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

