‘खबऱ्यां’चे जाळे कमकुवत

‘खबऱ्यां’चे जाळे कमकुवत

Published on

पुणे, ता. ३१ : पुण्यातील पोलिस दलाची यंत्रणा गेल्या काही वर्षांत वेगाने ‘स्मार्ट पोलिसिंग’कडे वळली आहे. सीसीटीव्ही नेटवर्क, सायबर ट्रॅकिंग, माहितीचे विश्‍लेषण आणि डिजिटल मॉनिटरिंग या तांत्रिक बाबींच्या मदतीने गुन्‍हे उघडकीस आणण्‍याचे प्रमाण वाढले असले, तरी या प्रक्रियेत पोलिसांचा खासकरून पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, बीट अंमलदार यांचा त्‍यांच्‍या भागातील सामाजिक कार्यकर्ते, सर्वसामान्‍य नागरिक, खबरी यांच्‍यासोबतचा असलेला संवादही हरवत आहे. परिणामी, गुन्‍हा घडण्‍याआधी खबर मिळत नसल्‍याने त्‍या गुन्ह्याला प्रतिबंध होत नाही. तसेच पोलिस सर्वसामान्‍यांमध्‍ये मिसळत नसल्‍याने आपोआप न कळत होणारे पोलिसिंगही कमी झाल्‍याचे दिसून येत आहे.
पूर्वी गुन्‍हा घडल्‍यानंतर पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती काढावी लागायची. पोलिसांचे परिसरातील दुकानदार, रिक्षाचालक, चहावाले किंवा त्‍या भागातील प्रभावी व्यक्ती यांच्याशी सतत संवाद असायचा. पोलिसांना त्यांच्या मार्फत गुन्हेगारांच्‍या मुसक्‍या आवळण्‍यासाठी किंवा ती होण्‍याआधी प्रतिबंध करण्यासाठी माहिती मिळायची. आता मात्र हे खबऱ्यांचे जाळे कमकुवत झाले आहे. इतकेच नव्‍हे तर त्‍या भागातील नामचीन गुन्‍हेगारांसोबतही संपर्क व त्‍यावर दबदबा असायचा. जर एखाद्या भागातील गुन्‍हेगार, अल्‍पवयीन विधिसंघर्षित बालके गुन्हेगारीच्या माध्‍यमातून डोके वर काढत असतील तर पोलिसांनी त्‍‍या भागातील या गुन्‍हेगारांच्‍या नामचीन भाईला तंबी दिली तरी तो त्‍या गुन्‍हेगारांना किंवा अल्‍पवयीनांना शांत करत असे. कारण हे नवीन उदयाला येणारे गुन्‍हेगार त्‍याला मानत असतात. त्‍यामुळे, आपोआप गुन्‍हेगारीवर नियंत्रण येण्‍यास मदत होत असे. परंतु, पोलिसांचा हा पारंपरिक गुन्‍हेगारी रोखण्‍याचा ‘पॅटर्न’ ही हरवत चालला असल्‍याची माहिती माजी पोलिस अधिकारी देतात.

...म्हणून हालचाली समजण्यात अडचणी
आता शहरातील खबऱ्यांची जागा सार्वजनिक ठिकाणी, चौकातील सुमारे अडीच हजार सीसीटीव्ही कॅमेरे यांनी घेतली आहे. सोबत, ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’ कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर विश्‍लेषण करणारी प्रयोगशाळा यांच्‍या मदतीने गुन्हे शोधले जातात. गुन्‍हे उघडकीस आणण्‍यासाठी तांत्रिक विश्लेषण हे जमेची बाजू ठरत असले तरी एखाद्या ठिकाणी खुनासारखा गंभीर गुन्‍हा घडणार असल्‍यास त्‍याची माहिती ही यंत्रणा देऊ शकत नाहीत. ती माहिती खबऱ्यांद्वारेच मिळू शकते. परंतु, आजकाल या सर्व सुविधांमुळे पोलिस त्‍यावर अवलंबून राहत आहेत. तांत्रिक विश्लेषणावर अधिक अवलंबून राहिल्याने पोलिसांना गुन्हेगारांची मानसिकता व स्थानिक पातळीवरील हालचाली समजण्यात अडचणी निर्माण होत आहेत, अशी माहिती माजी सहाय्यक पोलिस आयुक्‍त मिलिंद गायकवाड यांनी दिली.

आम्‍ही पूर्वी पोलिस निरीक्षक असताना नागरिकांसोबत संपर्क राहावा, यासाठी विविध कट्टे, स्‍वयंसेवी संस्‍था, व्‍यायाम मंडळे, गणेश मंडळे, ढोल-ताशा पथके यांच्‍यामध्‍ये जायचो. त्‍यातून ग्राउंडवरील संपर्क वाढतो. हे केवळ निरीक्षकांनी नव्‍हे तर त्‍या चौकीचा पोलिस उपनिरीक्षक, त्‍याच्‍ अंतर्गत असलेले बीट अंमलदार यांनी करणे आवश्यक आहे. सर्वसामान्‍यांमध्‍ये गेल्‍याने जनतेत विश्‍वासाचे वातावरण निर्माण होते, वर्दीवरील पोलिसांना पाहून लहान मुलांनाही प्रेरणा मिळते. तो भाईपेक्षा पोलिसांकडे जास्‍त आकर्षित होतो. मात्र, आजकाल पोलिसांचा हा संपर्क किंवा फूट पेट्रोलिंग कमी झाल्‍याचे दिसून येत आहे. तंत्रज्ञान कितीही अद्ययावत झाले असले तरी खबऱ्यांचे जाळे (ह्यूमन इंटेलिजंस) ला पर्याय ठरू शकत नाही.
- भानुप्रताप बर्गे, माजी सहाय्यक पोलिस आयुक्‍त, पुणे
...............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com