दिवाळी अंक स्वागत
स्वागत दिवाळी अंकाचे
------------------------
१) ऋतुरंग
ज्येष्ठ गीतकार, पटकथाकार गुलजार, नवाजुद्दीन सिद्दीकी, मारुती चितमपल्ली, शबाना आझमी, बोमन इराणी यांच्यासह मान्यवरांच्या लेख, अनुभवांनी सजलेला हा अंक खरोखरच साहित्याची अनोखी मेजवानी देत आहे. भरगच्च साहित्याचा फराळ वाचकांसमोर ठेवला आहे. ‘त्यांना काही सांगायचं’, ‘अनुभवाची पटकथा’, ‘मला उमजलेला माणूस’, ‘सांगण्यासारखे’ या वेगवेगळ्या विभागातून मान्यवरांनी लिखाण केले आहे. यामध्ये हरिहरन, उषा उत्थप, अंबरीष मिश्र, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, तौफिक कुरेशी यांचा समावेश आहे. सांस्कृतिक, सामाजिक यासह राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्यांचा धांडोळा घेतला आहे. अंकाचे मुखपृष्ठ वेगळेपणा सिद्ध करते.
संपादक ः अरुण शेवते, पाने ः ३६२, किंमत ः ३०० रुपये
--------
२) द इनसाइट
नावापासूनच ‘द इनसाइट’ अंकाचा वेगळेपण जाणवतो. युवा पिढीसमोरील प्रश्नांची उत्तरे विविध माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न अंकातून केला आहे. नव्या पिढीला गृहित अथवा मोडीत न काढता त्यांच्याशी थेट संवाद साधून अंकाची मांडणी केली आहे. नवी जेन झी खरंच ‘जनरेशन झिंगाट’ आहे. त्यांच्यापुढे जाऊन जेन अल्फाच्या प्रश्नांचा वेध घेतला आहे. आसपासचं जग वेगाने बदलत आहे, या बदलाची सूचक नोंद अंकातून घेतली आहे. अंकाचे मुखपृष्ठ खूपच मार्मिक आहे. महात्मा गांधींच्या तीन माकडांची आधुनिक आवृत्ती या मुखपृष्ठावर मांडली आहे. पुढील पिढीचा अचूक वेध अंकातून मांडला आहे. यामध्ये युवक नेमका काय विचार करतात, याच्या पाहणीचे निष्कर्ष वाचनीय आणि दखलपात्र आहेत.
संपादक ः सचिन परब, पाने ः १६४, किंमत ः ३०० रुपये
---------
३) पुरुष उवाच
विविध विषयांची या दिवाळी अंकात अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. सध्याच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा बोलबाला आहे. यातून अनेकविध प्रश्न निर्माण होणार आहेत. यावरचे विवेचन या क्षेत्रातील तज्ज्ञ चिन्मय गवाणकर यांचा लेख वाचनीय आहे. संवेदनशील लेखक, दिग्दर्शक वरुण सुखराज यांचा लेख अंकाचे प्रवेशद्वार आहे. याशिवाय गौरव कल्याणी, सौरभ पांडकर, ॲड. सौरभ बागडे, धीरज लोंढे, शांतिसागर संगीता विजयकुमार आदींच्या लेखातून पुरुषभान चळवळ अधोरेखित होते. यशवंत मनोहर, डॉ. अरुण गद्रे, डॉ. अनंत फडके, जगमोहन मेनन, चंद्रशेखर पुरंदरे, गजानन खातू, सलिल चिंचोरे यांचे लेख वाचनीय आहेत. पुरुष कोंडी होण्यामागची अभ्यासपूर्ण मांडणी या लेखांतून केली आहे.
संपादक ः डॉ. गीताली वि. म./मुकुंद किर्दत, पाने ः ३५२, किंमत ः २५० रुपये
-----
४) मुक्तशब्द
वेगळ्या विषयांना वाहिलेला ‘मुक्तशब्द’चा दिवाळी अंक आहे. खिद्रापूर येथील शिल्पकलांची राधिका टिपरे यांचा लेख अभ्यासपूर्ण आहे. श्रीनगर ते लेह अशा सायकल प्रवासाचा अंकुश आवारे यांचा अनुभव वाचनीय आहे. याशिवाय वासंती फडके, जयप्रकाश सावंत, सुकन्या आगाशे, वंदना भागवत यांचे लेख वाचनीय आहेत. कथा विभागात शाहीन इंदुलकर, अशोक राणे, कृष्णात खोत यांच्या कथा वाचनीय आहेत. वेगळे विषय घेऊन लेखांची मांडणी केलेली आहे. हारूकी मुराकामी यांची कथा हे अंकाचे वेगळेपण आहे.
संपादक ः यशोधन पाटील, पाने ः २६६, किंमत ः ३५० रुपये
-----
५) हंसा
परंपरा ही मध्यवर्ती संकल्पना घेऊन यंदाचा ‘हंसा’चा दिवाळी अंक सजला आहे. ‘दिवाळी अंकांची परंपरा’ या सदरात मान्यवर दिवाळी अंकांच्या संपादकांनी लिखाण केले आहे. यात भारतभूषण पाटकर, अभिराम अंतरकर, अरुण शेवते, हेमांगी नेरकर, किरण केंद्रे, आसावरी केळकर आदींनी लेखन केले आहे. त्याचबरोबर साहित्य, कला आणि संस्कृती या विभागात अनोख्या पद्धतीने आढावा घेण्यात आला आहे. दिवाळी अंकाच्या परंपरेविषयी प्रा. प्रतिभा सराफ यांनी लेखन केले आहे. ग. दि. माडगूळकर यांची नात कवयित्री लीनता माडगूळकर यांनी गदिमांच्या घराण्यातील लेखन परंपरेवर प्रकाशझोत टाकला आहे. हे या अंकाचे वैशिष्ट्य आहे. वारकरी परंपरेतील संत कवयित्रींवर या अंकात विशेष लिखाण आहे. दिलीप फलटणकर यांनी पंढरीची वारीचा आढावा घेतला आहे.
संपादक ः प्रिया बापट, पाने ः ३७८, किंमत ः ४५० रुपये
------------
६) बालकुमार
मनोरंजन आणि प्रबोधन या दोन्ही बाबी साधण्यासाठी अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार संस्था कार्यरत आहे. त्यातूनच
संस्थेकडून बालकुमार दिवाळी अंकाची निर्मिती करण्यात आली आहे. छोट्या दोस्तांना हलका फुलका वैचारिक आणि बौद्धिक फराळ या अंकातून दिला हे. या अंकात डॉ. न. म. जोशी, प्रा. प्रवीण दवणे, राजीव तांबे, इंद्रजित भालेराव, डॉ. मंदा खांडगे, विश्वास वसेकर, लीला शिंदे, डॉ. संगीता बर्वे, डॉ. नीलिमा गुंडी, एकनाथ आव्हाड, अंजली कुलकर्णी, आश्लेषा महाजन, डॉ. लता पोडकर आणि इतर लेखकांचे आशयघन आणि रंजकपर असे लेख आहेत. त्याच्या जोडीला, बालसाहित्यकारांच्या कवितांची पर्वणी आहे.
संपादक ः राजन लाखे, पाने ः ११२, किंमत ः २०० रुपये
-----------
७) प्रेमलहरी
हा अंक चार विभागांमध्ये आहे. पहिल्या विभागात श्री पंत महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त उत्सवसंबंधीचे पं. पू. लताआत्या जमखंडीकर आणि प. पू. दादासाहेब पंतबाळेकुंद्री यांचे लेख आहेत. दुसरा विभाग ‘एकाकी न रमते म्हणुनि’ प्रकाशित करण्यात आला आहे. यात आचार्य सुधीर वेडे, दीपक जोईल, विद्या तमखाने, ज्ञानदेव पुंगावकर, अवधूत बाबर, हेमंत काळे यांचे लेख आहेत. ‘भक्ती देई’ विभागात प. पू.अप्पासाहेब दड्डीकर, निकिता नाईक, प्रतापसिंह चव्हाण, राजश्री रेगे, सीमा कुलकर्णी, सुबोध खाडे, सुहास सातोस्कर, बाळासाहेब कसाळे यांचे लेख आहेत. चौथ्या ‘भक्तवत्सल’ विभागात श्री पंतमहाराजांचा बोध विषयावर डॉ. संजय भगत, सूर्याजी मोरे, उमेश कदम यांचे लेख आहेत.
संपादक : प्रदीप खेतमर, पाने : ११४, किंमत : २०० रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

