पुणे विमानतळावर प्रवाशांची ‘कोंडी’ एरोमॉलच्या बाहेर पडण्यासाठी तासभर प्रतीक्षा, मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे अधिकच विलंब
पुणे, ता. ३ ः देशांतर्गत विमानाने प्रवास करून प्रवासी तास ते दीड तासांत पुणे विमानतळावर दाखल होतात. मात्र, विमानतळावरून एरोमॉल येथे जाण्यासाठी व एरोमॉल येथून बाहेर पडण्यासाठी त्यांना पुन्हा तेवढाच वेळ खर्ची पडत आहे. मंत्र्यांचे दौरे असल्यावर पोलिसांकडून एरोमॉलचे दोन्ही गेट बंद केले जातात. परिणामी प्रवासी एरोमॉलच्या ‘कोंडीत’ अडकून पडत आहेत. 
 पुणे विमानतळासमोरील रस्त्यावर सतत होणारी वाहतूक कोंडी, वाहनांचे बेकायदेशीर पार्किंग यामुळे कॅबचे बुकिंग केलेल्या प्रवाशांना एरोमॉल येथे जाण्यासाठी किमान १५ ते २० मिनिटांचा अवधी लागतो. एरोमॉल मधील जिन्यावर देखील कधी कधी कोंडी होते. त्यात कॅबचे बुकिंग होऊन संबंधित कॅबमधून बाहेर पडण्यासाठी प्रवाशांना ३० मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागत आहे. याबाबत अनेक प्रवाशांनी समाजमाध्यमांवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. एरोमॉल प्रशासन याबाबत तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र प्रवाशांना कोंडीचा फटका सहन करावाच लागत आहे. 
-----------------  
‘व्हीआयपी’ दौऱ्याने अडचणीत भर  
पुणे विमानतळावर सतत वरिष्ठ मंत्री, नेते, अधिकारी यांची ये - जा असते. वरिष्ठ मंत्री येताना अथवा जाताना वाहतूक पोलिस एरोमॉलच्या बाहेर पडणारे दोन्ही गेट सुरक्षेच्या कारणास्तव बंद करतात. परिणामी कॅबच्या माध्यमातून बाहेर पडणारे प्रवासी ‘एरोमॉल’मध्येच अडकून पडतात. प्रवाशांना किमान ३० ते ४० मिनिटे थांबायला लागत आहे. परिणामी प्रवाशांचा वेळ वाया जात आहे.  
---------------     
पुणे विमानतळ : 
दैनंदिन विमानांची वाहतूक : २०० 
आगमन : १०० विमाने 
निर्गमन : १०० विमाने 
एकूण प्रवासी संख्या : सुमारे ३५ हजार (दैनंदिन)
कॅबची वाहतूक : ५ हजार 
कॅबद्वारे प्रवासी वाहतूक : सुमारे ७ हजार   
-------------- 
‘‘रस्त्यांवरील वाहतूक कोंडीचा व ‘एरोमॉल’चे गेट बंद केल्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. प्रवाशांची अडवणूक होऊ नये, यासाठी पोलिसांनी दोन्हींपैकी एक गेट खुले करावे, अशी आमची मागणी आहे. 
- युवराजसिंग रजपूत, उपाध्यक्ष, एरोमॉल, पुणे विमानतळ.    
---------- 
‘‘विमानतळाहून एरोमॉल येथे जाण्यासाठी प्रशासनाने बस व कार्टची सोय केली पण अनेकदा ती वेळेवर उपलब्ध होत नाही. परिणामी प्रवाशांना चालतच जावे लागते. ‘एरोमॉल’मध्ये कॅब बुकिंगसाठी वेळ लागतो. यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो.   
-सुनील कुलकर्णी, प्रवासी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

