बालगंधर्व रंगमंदिराची ‘अग्नि’परीक्षा

बालगंधर्व रंगमंदिराची ‘अग्नि’परीक्षा

Published on

महिमा ठोंबरे : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ४ : शहरातील सर्वात महत्त्वाचे आणि सर्वाधिक वर्दळीचे नाट्यगृह असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारातील बहुतांश अग्निशामक उपकरणे गायब आहेत. बालगंधर्वमधील एसी प्लांटमधील शॉर्ट सर्किटमुळे धूर पसरल्याची घटना ताजी असताना अग्निशामन यंत्रणेकडील दुर्लक्ष, हे हजारो प्रेक्षकांच्या आणि कलाकारांच्या जिवावर बेतण्याची शक्यता आहे. प्रशासनाचा हा गलथानपणा नाट्यगृहाचीच जणू ‘अग्निपरीक्षा’ घेत आहे.

गतवर्षी कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागण्याची भीषण घटना घडली होती. त्या पार्श्वभूमीवर शहरातील महापालिकेच्या मालकीच्या १४ नाट्यगृहांचे ‘फायर ऑडिट’ केले होते. याअंतर्गत प्रत्येक नाट्यगृहातील अग्निशमन यंत्रणा कार्यरत आहे अथवा नाही, हे तपासले होते. त्यावेळी बालगंधर्व रंगमंदिरातील अग्निशामन यंत्रणा व्यवस्थित असल्याचे सांगण्यात आले होते.
त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच नाट्यगृहातील बाल्कनीजवळील एसी प्लांटमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे प्रेक्षागृहात मोठ्या प्रमाणावर धूर पसरला होता. सुदैवाने ही घटना कर्मचाऱ्यांच्या तत्काळ लक्षात आल्यामुळे आणि त्यावेळी प्रेक्षागृहात प्रेक्षक नसल्यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही. या पार्श्वभूमीवर मंगळवारी ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत नाट्यगृहातील अग्निशामक उपकरणे जागेवर नसल्याचे दिसून आले.

काय दिसल्या त्रुटी
१) नाट्यगृहाच्या दर्शनी भागातील काही बॉक्समधील उपकरणे जागेवर
२) उर्वरित बॉक्स उपकरणांविना रिकामे
३) अनेक बॉक्सच्या काचा तुटलेल्या
४) यातील उपकरणे चोरीला गेली आहेत अथवा ती उपकरणे बसवण्यातच आली नव्हती
५) नाट्यगृहात अग्निशामन सिलिंडर आहेत, मात्र ती वेळच्या वेळी भरली जात नसल्याचे एका कर्मचाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले

प्रशासनाचा गलथानपणा
बालगंधर्व रंगमंदिर हे शहरातील सर्वाधिक वर्दळीचे नाट्यगृह आहे. ऐतिहासिक वारसा लाभल्यामुळे आणि मध्यवर्ती भागातील नाट्यगृह असल्यामुळे नाट्यप्रयोगांसाठी, तसेच कार्यक्रमांसाठी याच नाट्यगृहाला सर्वाधिक मागणी असते. एकूण ९९० आसनक्षमता असलेल्या या नाट्यगृहात आठवड्यातील प्रत्येक दिवशी सरासरी दोन-तीन कार्यक्रम व नाट्यप्रयोग होतात. तसेच, आवारात असलेल्या कलादालनातही नियमित प्रदर्शने होत असतात. त्यासाठी दररोज किमान दोन ते तीन हजार प्रेक्षक, कलाकार, कर्मचाऱ्यांचा येथे राबता असतो. अशावेळी येथे मोठी दुर्घटना घडल्यास प्रशासनाचा हा गलथानपणा अनेकांच्या जिवावर बेतण्याची शक्यता आहे.

‘रंगपंढरी’ची सुरक्षा वाऱ्यावर
शहरात महापालिकेच्या मालकीची १४ नाट्यगृहे असली तरी त्यांच्या देखभालीकडे होणारे दुर्लक्ष नित्याचेच आहे. १४ पैकी सात ते आठ नाट्यगृहे योग्य ती देखभाल आणि प्रतिसादाअभावी धूळ खात आहेत. नियमित नाट्यप्रयोग होत असलेल्या अन्य नाट्यगृहांमध्येही स्वच्छता व अन्य सुविधांबाबत सातत्याने विविध तक्रारी केल्या जातात. बुधवारी (ता. ५) जागतिक रंगभूमी दिन साजरा होत असताना ‘रंगपंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाट्यगृहांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बालगंधर्व रंगमंदिरातील अग्निशामन उपकरणे जागेवर नसतील, तर ही अतिशय गंभीर बाब आहे. यातून मोठा धोका संभवतो. प्रेक्षक आणि कलाकारांच्या जिवाशी हा खेळ आहे. प्रशासनाने याची तत्काळ दखल घेऊन उपकरणे बसवावीत, तसेच अग्निशामन यंत्रणेची वेळोवेळी तपासणी करावी.
- प्रशांत दामले,
ज्येष्ठ अभिनेते-निर्माते आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष


तुमचे मत मांडा...
पुण्यातील नाट्यगृहांची दुरवस्था अन् अग्निशामन उपकरणांबाबत योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे. मात्र त्याकडे कानाडोळा केला जातो. असाच अनुभव तुम्हालाही आला आहे का? याबाबत आपले मत मांडा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com