फॅशनच्या स्पर्धेसाठी हातमाग क्षेत्र सज्ज
जोधपूर, ता. ४ : ‘‘फॅशन उद्योग झपाट्याने पुढे जात असताना, पारंपरिक हातमाग उद्योगही त्याच गतीने पावले टाकत आहे. पुढच्या पिढीतील तरुण विणकरांना आधुनिक प्रशिक्षण देत जोधपूर येथील भारतीय हातमाग तंत्रज्ञान संस्था (आयआयएचटी) हे काम पुढे नेत आहे. भारतामध्ये फॅशन इंडस्ट्री वेगाने वाढत आहे आणि हातमाग क्षेत्रालाही या शर्यतीत आपले स्थान कायम ठेवण्यासाठी नव्या पिढीला तयार करावे लागेल,’’ असे मत ‘आयआयएचटी’ जोधपूरचे संचालक डॉ. शिवग्नानम के. जे. यांनी जोधपूर येथील दौऱ्यात मांडले.
‘पीआयबी’ मुंबईतर्फे आयोजित पत्रकार दौऱ्याच्या निमित्ताने जोधपूर येथील भारतीय हातमाग तंत्रज्ञान संस्था येथे भेट देण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘हातमाग व्यवसाय हा पिढ्यान्पिढ्या चालत आलेला आहे. याला अधिक बळ देणे गरजेचे आहे.’’
एक हजाराहून अधिक विद्यार्थी घडवले
संस्थेने स्थापनेपासून आत्तापर्यंत १,०६२ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले असून, त्यापैकी अनेक आज विविध वस्त्रोद्योगांत कार्यरत आहेत, तर काहींनी उद्योजकतेचा मार्ग अवलंबला आहे. पंजाब, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये ‘आयआयएचटी’चे विद्यार्थी रोजगाराच्या संधी प्राप्त करत आहेत.
डॉ. शिवग्नानम म्हणाले, ‘‘संस्थेचा मुख्य उद्देश म्हणजे सध्याच्या विणकर कुटुंबातील पुढील पिढीनेही हा व्यवसाय सुरू ठेवावा, यासाठी संस्थेत विणकर समाजातील विद्यार्थ्यांसाठी २० टक्के आरक्षण ठेवले आहे. तसेच, या समाजातील तरुणांना हातमाग शिक्षणाकडे आकर्षित करण्यासाठी विशेष जनजागृती कार्यक्रमही राबवले जात आहेत.’’
ग्रामीण विणकरांपर्यंत पोहोचणे आव्हान
जोधपूर शहरापासून १० किमी अंतरावर असलेले ‘आयआयएचटी’चा आवारात आधुनिक वसतिगृह सुविधांसह देशभरातील विद्यार्थ्यांना आकर्षित करत आहे. मात्र, भारतात सध्या २८ लाखांहून अधिक विणकर कार्यरत असून, त्यापैकी ८५ टक्के ग्रामीण भागांत असल्यामुळे या क्षेत्रापर्यंत पोहोचणे हे मोठे आव्हान असल्याचे डॉ. शिवग्नानम यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘‘आयआयएचटीमध्ये केवळ विणकाम प्रशिक्षणच नव्हे तर बाजारपेठेतील जोडण्या, डिझाइन ट्रेंड्स आणि रंगांची मागणी यांचे भान देणारे प्रशिक्षण दिले जाते. हातमाग उद्योग हा फॅशन जगताचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आगामी सहा महिन्यांच्या ट्रेंड्सनुसार विणकाम करणे आवश्यक आहे. आमचा उद्देश केवळ प्रशिक्षण देणे नाही, तर विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करणे हा आहे.’’

