पुणे जिल्ह्यात १७ ठिकाणी रणधुमाळी

पुणे जिल्ह्यात १७ ठिकाणी रणधुमाळी

Published on

पुणे, ता. ४ : पुणे जिल्ह्यात १४ नगर परिषदा आणि ३ नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठीची आचारसंहिता मंगळवारपासून लागू झाली आहे. त्यामध्ये एक वर्षापूर्वी नव्याने स्थापन झालेल्या फुरसुंगी-उरुळी देवाची यासह मंचर आणि माळेगाव या तीन नगर परिषदांसाठी यंदा प्रथमच निवडणूक होणार आहे. तर या निवडणुकीतून नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी थेट नगराध्यक्षपदाची निवड होणार आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नगर परिषदांसाठी दोन आणि तीन सदस्यांचा मिळून एक प्रभाग या पद्धतीने निवडणूक होणार आहे; तर तीन नगरपंचायतींमधील एक सदस्य (वॉर्ड) या पद्धतीने निवडणूक होणार आहेत. बारामती, लोणावळा, चाकण, आळंदी आणि राजगुरुनगर या पाच ठिकाणी प्रत्येकी एक प्रभाग हा तीन सदस्यांचा मिळून एक प्रभाग असणार आहे. उर्वरित नऊ नगर परिषदांमध्ये दोन सदस्यांचा एक प्रभाग या पद्धतीने निवडणुका होणार आहेत. जिल्ह्यातील १४ नगर परिषदांमध्ये मिळून एकूण ३४७ प्रभाग संख्या असून, तीन नगरपंचायतींची प्रभाग संख्या ५१ एवढी असणार आहे.
नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ या अर्हता दिनांकावरील मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. त्यानुसार १४ नगर परिषदांसाठी ५ लाख ७९ हजार १९९ एवढे मतदार असणार आहेत, तर तीन नगरपंचायतींसाठी ५५ हजार ७४१ एवढी मतदारसंख्या असणार आहे. जिल्ह्यातील १४ नगर परिषदांसाठी एकूण ६६०, तर नगरपंचायतीसाठी ७० असे एकूण ७३० मतदान केंद्र असणार आहेत. प्रत्येक केंद्रावर ९०० ते १००० मतदारांसाठी एक केंद्र असणार आहे. नगरपंचायतीसाठी मात्र १००० ते ११०० मतदारांमागे एक केंद्र असणार आहे. या निवडणुकीसाठी ३१ ऑक्टोबर रोजी मतदार यादी अंतिम असणार आहे, तर मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी सात नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे, असेही डुडी म्हणाले.

या १४ नगर परिषदांपैकी बारामती ही ‘अ’ वर्ग नगर परिषद आहे, तर लोणावळा, दौंड, चाकण, तळेगाव दाभाडे व फुरसुंगी उरुळी देवाची या पाच नगर परिषदा ‘ब’ वर्गामध्ये आहेत. उर्वरित नगर परिषदा या ‘क’ वर्गात मोडतात. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण सहा उपजिल्हाधिकारी यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे; तर ‘क’ वर्ग नगर परिषदांसाठी आणि नगरपंचायतीसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे ११ तहसीलदार यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक नगर परिषद व नगरपंचायतीकरिता मुख्याधिकारी यांची साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. फुरसुंगी उरुळी देवाची नगरपालिकेसाठी दोन सदस्यांचा एक प्रभाग या पद्धतीने निवडणूक होणार असून, एकूण प्रभाग संख्या ही १६ असणार आहे; तर नगरसेवकांची ३२ संख्या असणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार या निवडणुकीची आचारसंहिता ही केवळ नगर परिषद आणि नगरपंचायत क्षेत्रासाठी लागू असणार आहे. या निवडणुकीसाठी या क्षेत्रात सुमारे ६ लाख ३४ मतदार असून, त्यातील १७ हजार ७४४ मतदार दुबार आणि तिबार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मतदारांना राज्य आयोगाच्या निकषानुसार एकाच ठिकाणी मतदान करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
- जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com