अदानींना वाचविण्यात पंतप्रधान मोदी व्यस्त
पुणे, ता. १६ ः ‘‘देशातील युवकांमध्ये गेल्या दहा वर्षांत बेरोजगारी व व्यसनाधीनता या दोन समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र त्यांचे मित्र अदानीला वाचविण्यात व्यस्त आहेत. तसाच थोडा प्रयत्न देशातील युवकांना रोजगार देण्यासाठी करावा,’’ अशी टीका युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानु चिब यांनी केली.
काँग्रेस भवनात रविवारी आयोजित युवा काँग्रेसच्या ‘हल्ला बोल’ आंदोलनावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी महाराष्ट्र युवा काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत, महाराष्ट्र प्रभारी अजय चिकारा, सहप्रभारी एहसान खान, कार्याध्यक्ष शिवराज मोरे, ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हास पवार, अभय छाजेड, शहराध्यक्ष सौरभ आमराळे, कुमार रोहित, प्रदेश प्रभारी अजय चिकारा आदी उपस्थित होते. युवक काँग्रेसकडून देशभरात ‘नोकरी द्या....व्यसने नको,’ ही देशव्यापी मोहीम पुण्यातून सुरू केल्याची घोषणाही त्यांनी या वेळी केली.
चिब म्हणाले, ‘आपण आज पुण्यात भारत मातेच्या रक्षणासाठी जमलो आहोत. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप महायुती सरकारने दोन हजार घरे पाडून लोकांना बेरोजगार केले आहे.’’ राऊत म्हणाले, ‘बोगस मतदान करून राज्यात काँग्रेसला हरविण्यात आले आहे.’ सौरभ आमराळे म्हणाले, ‘पुण्यात अमली पदार्थ तस्करी सर्वाधिक होत आहे.’
सुरक्षा पथकाला का हटविले?
गुजरातमधील अदानी ग्रुपकडून चालवण्यात येणाऱ्या मुंद्रा पोर्ट येथून दोन हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ पकडले, त्याचे पुढे काय झाले? असा प्रश्न उपस्थित करत असे कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ देशात येत आहेत. विशेष म्हणजे तेथील अमली पदार्थांचा धंदा चालावा, यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा पथक हटविले असून, खासगी सुरक्षा व्यवस्था तैनात केल्याबाबतही त्यांनी आक्षेप व्यक्त केला.
‘रास्ता रोको’चा प्रयत्न, कार्यकर्ते ताब्यात
युवक काँग्रेसच्या नेतृत्वाखालील हा मोर्चा काँग्रेस भवन येथून डेक्कनच्या दिशेने जाताना बालगंधर्व चौकात पोलिस प्रशासनाने मोर्चा अडवून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण झाला. त्यांनी बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आक्रमक होत आंदोलकांना ताब्यात घेतले. यामुळे काही वेळासाठी वातावरण तणावपूर्ण झाले होते.
PNE25U90550
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

