गुन्हे वृत्त
पुणे, ता. १६ : बंदुकीचा धाक दाखवून हॉटेलमध्ये काम करणाऱ्या शेफचा मोबाईल हिसकावून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी चोरट्यांना अटक केली आहे.
याबाबत महम्मद मन्सुरी (वय २२, रा. साळुंके विहार रस्ता, मूळ रा. बिहार) या तरुणाने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तबरेज ऊर्फ परवेझ मुनीर शेख (वय २२, रा. जे. के. पार्क, कोंढवा), रमझान अब्बास पटेल (वय २४, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) अशी अटक केलेल्या सराइतांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण हा एनआयबीएम रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये शेफ आहे. तो शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कामावर निघाला होता. त्यावेळी चोरट्यांनी तरुणाला बंदुकीचा धाक दाखवून मोबाईल हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून चोरट्यांना अटक केली.
-----
दागिने हिसकावणारा
चोरटा गजाआड
पुणे, ता. १६ : धुणी-भांडी करणाऱ्या ज्येष्ठ महिलेची एक लाख रुपयांची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावून नेल्याची घटना नदीपात्रातील रस्त्यावर घडली. डेक्कन पोलिसांनी तातडीने तपास करून चोरट्यास अटक केली. अक्षय अनिरुद्ध ओक (वय २७, रा. पेपर गल्ली, शनिवार पेठ) असे चोरट्याचे नाव आहे. अक्षय हा एका लाँड्रीमध्ये कामास आहे. याबाबत दत्तवाडी भागातील एका ६५ वर्षीय महिलेने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही ज्येष्ठ महिला धुणी-भांड्याचे काम करते. ही महिला शनिवारी (ता. १५) सकाळी डेक्कन जिमखान्याजवळ नदीपात्रातील रस्त्याने निघाली होती. वीटभट्टीजवळ दुचाकीवर आलेल्या चोरट्याने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेला अडवून सोनसाखळी हिसकावून नेली. याबाबत महिलेने तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या मदतीने डेक्कन पोलिसांनी चोरट्यास अटक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीषा निंबाळकर आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद राऊत यांच्या सूचनेनुसार पोलिस उपनिरीक्षक अजय भोसले यांच्या पथकाने ही कारवाई केली.
-------
गणेशखिंड रस्त्यावर
दुचाकीस्वार ठार
पुणे, ता. १६ : मेट्रोचे साहित्य वाहतूक करणारा ट्रेलर आणि पीएमपी बसवर आदळल्याने एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. विकास देविदास कांबळे (वय २७, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत सहाय्यक निरीक्षक सचिन कारंडे यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार कांबळे हा चार फेब्रुवारी रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास गणेशखिंड रस्त्याने निघाला होता. कॉसमॉस बँकेसमोर दुचाकीस्वार तरुणाचे नियंत्रण सुटल्याने तो सिमेंटचे साहित्य वाहतूक करणाऱ्या ट्रेलर आणि पीएमपी बसवर आदळला. या अपघातात ट्रेलरच्या चाकाखाली सापडून त्याचा मृत्यू झाला. याबाबत तपासानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
---------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

