सोनसाखळी चोरट्यांकडून ज्येष्ठ महिला लक्ष्य

सोनसाखळी चोरट्यांकडून ज्येष्ठ महिला लक्ष्य

Published on

पुणे, ता. १८ : शहरात दुचाकीस्वार सोनसाखळी चोरट्यांकडून पादचारी ज्येष्ठ महिलांना लक्ष्य केले जात आहे. चोरट्यांनी भवानी पेठ, एरंडवणे, औंध आणि वारजे परिसरात चार ज्येष्ठ महिलांचे पाच लाख रुपयांचे दागिने हिसकावून नेले. तर, एरंडवणे परिसरात शस्त्राचा धाक दाखवून तरुणास लुटण्याचा प्रयत्न केला.
तक्रारदार ६५ वर्षीय महिला भवानी पेठेतील पालखी विठोबा चौकात वास्तव्यास आहेत. त्या पतीसमवेत शनिवारी (ता. १५) भवानी पेठेतील लोखंड गल्लीतून निघाल्या होत्या. रात्री साडेनऊच्या सुमारास त्या खेमचंद दुकानासमोर आल्या. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे दीड लाखांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. याबाबत महिलेने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
एरंडवणे परिसरातील सेवासदन सभागृहासमोर ज्येष्ठ महिला रिक्षाची वाट पाहत थांबली होती. दुचाकीस्वार चोरट्यांनी या ज्येष्ठ महिलेची ५० हजारांची सोनसाखळी हिसकावून नेली. ही घटना रविवारी (ता. १६) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत धनकवडीतील बालाजीनगर परिसरातील ६५ वर्षीय महिलेने अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
औंध भागात क्वीन्स टॉवर को-ऑप. सोसायटीच्या परिसरात ज्येष्ठ महिलेची दीड लाखांची सोनसाखळी चोरट्यांनी हिसका मारून नेली. ही घटना शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत महिलेच्या मुलाने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार क्वीन्स टॉवर सोसायटीत वास्तव्यास आहेत. त्यांची आई सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ मेडीपॉइंट हॉस्पिटलसमोर थांबली होती. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी महिलेचे एक लाख ६० हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेली.
वारजे येथील अतुलनगर परिसरात दुचाकीस्वार चोरट्यांनी रविवारी (ता. १६) सायंकाळी साडेसातच्या सुमारास ज्येष्ठ महिलेचे दीड लाखांचे मंगळसूत्र चोरून नेले. याबाबत एका ७० वर्षीय ज्येष्ठ महिलेने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला वारजे येथील राहुल पार्क सोसायटीत राहतात. त्या विनायक हॉस्पिटलसमोर पतीसोबत रिक्षाची वाट पाहत थांबल्या होत्या. त्यावेळी महिलेचे मंगळसूत्र हिसकावून चोरटे दुचाकीवरून पसार झाले.

शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न
एरंडवणे परिसरात चोरट्यांनी तरुणाला शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. याबाबत शनिवार पेठेतील एका २४ वर्षीय तरुणाने अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तो पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास धावण्याचा सराव करीत होता. त्यावेळी डीपी रस्त्यावरील पुणेरी मिसळसमोर तिघा चोरट्यांनी तरुणाला अडवून लुटण्याचा प्रयत्न केला. परंतु या वेळी झालेल्या झटापटीनंतर चोरटे पसार झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com