अंगणवाडी सेविकांना अपुरा भत्ता

अंगणवाडी सेविकांना अपुरा भत्ता
Published on

पुणे, ता. १८ : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी महिलांचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांसह इतरांना प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी पुणे जिल्ह्यातून चार कोटी ४४ लाख ४७ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. शासनाने केवळ त्यातील अर्धाच म्हणजे दोन कोटी ४२ लाख ८८ हजार ४५० रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे हा अपुरा निधी अंगणवाडी सेविकांना कसा वितरित करायचा असा पेच प्रशासनासमोर उभा राहिला आहे. संपूर्ण राज्यासाठी ३१ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने दिला आहे.

पुण्यामध्ये सर्वाधिक लाडक्या बहिणींनी अर्ज केले. त्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस, अंगणवाडी पर्यवेक्षिका, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचे (एनयुएलएम) समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख, शहर मिशन व्यवस्थापक, ग्रामसेवक, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्रांच्या माध्यमातून आठ लाख ८८ हजार ९४२ लाडक्या बहिणींचे अर्ज भरण्यात आले होते.

सरकारने प्रत्येक अर्जासाठी प्रोत्साहन भत्ता म्हणून पन्नास रुपये देण्याचे जाहीर केले होते, त्यानुसार चार कोटी ४४ लाख रुपयांची मागणी केली होती. परंतु, शासनाकडून अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर एकूण पात्र लाभार्थ्यांच्या अर्जाचा निकष लावून अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांनी भरलेल्या चार लाख ८५ हजार ७६९ पात्र ठरलेल्या अर्जांसाठी दोन कोटी ४२ लाख रुपयांचा निधी वितरित केला आहे. उर्वरित निधीबाबत जिल्हा प्रशासनाला कुठल्याही सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे इतर अर्जांसाठीचे पैसे कुठून देणार, असा प्रसंग सध्या प्रशासनासमोर उभा राहिला आहे. दरम्यान, प्रत्येक जिल्ह्याकडून पाठविण्यात आलेल्या प्रस्‍तावाला शासनस्तरावर कात्री लावली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

निधी मिळण्यासाठी लागले सात महिने
विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रत्येक पात्र लाभार्थी महिलेला ‘लाडकी बहिण’ योजनेचा लाभ मिळण्यासाठी अंगणवाडी सेविकांसह इतरांना प्रोत्साहन भत्ता देण्याचे सरकारने जाहीर केले. ग्रामीण भागात अर्ज भरताना अंगणवाडी सेविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अनेकदा ऑफलाइन माहिती घेऊन रात्री उशिरा किंवा पहाटे ऑनलाइन माहिती भरण्याचे काम सेविकांनी केले. लाडक्या बहिणींना ऑगस्टपासून लाभ वाटप सुरू करण्यात आला असून, अंगणवाडी सेविकांना कामाचे पैसे मिळण्यास सात महिने लागले असल्याची खंत काही सेविका व्यक्त करत आहेत.

विभागनिहाय मिळालेला निधी (आकडे कोटींमध्ये)
विभाग अंगणवाडी सेविका मुख्यसेविका/पर्यवेक्षिका एकूण
नागपूर -- २,८७,०७,४५० -- ९३,५०० -- २,८८,००,९५०
नाशिक -- ६,३८,९५,७५० -- ७५,००० --६,३९,७०,७५०
पुणे -- ७,५२,१६,६५० -- १,८८,४५० -- ७,५४,०५,१००
कोकण -- ६,४७,३५,५०० -- ५४,६५० -- ६,४७,९०,१५०
अमरावती -- ३,२१,५०,७०० -- ९९,८५० -- ३,२२,५०,५५०
छत्रपती संभाजीनगर -- ४,८०,४४,८५० -- ३७,६५० -- ४,८०,८२,५००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com