कायदा काय सांगतो ?
कायदा काय सांगतो ? - ॲड. जान्हवी भोसले
-प्रश्न : आम्हाला सोलर लाइट पॅनल सोसायटीच्या टेरेसवर बसवायचे आहेत. त्यासाठी सोसायटी परवानगी देत नाही, तर आम्ही काय करावे?
-उत्तर : सध्या सर्व सोसायट्यांमध्ये वादाचा मुद्दा निर्माण झाला आहे, तो म्हणजे सौरऊर्जेची यंत्रणा बसवणे व त्यासाठी जागा उपलब्ध करून देणे; परंतु राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे ज्या सभासदांना सोलर एनर्जी इलेक्ट्रिकल सिस्टीम वापरायची आहे, त्यांच्यासाठी बाकी सभासदांनी जागा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे सोसायटीवरदेखील बंधनकारक आहे की, सोसायटीच्या जागेमध्ये सभासदांना सोलर एनर्जी इलेक्ट्रिक सिस्टीम वापरण्यासाठी परवानगी देणे. हा नियम सोसायटीमधील सर्व सभासदांसाठी सारखाच लागू आहे.
-प्रश्न : माझ्या लग्नाला तीन महिने झाले आहेत. माझी पत्नी आई-वडिलांसोबत राहायला तयार नाही व ती भाड्याचे घर घेऊन राहत आहे. मला आई-वडिलांना सोडून वेगळे राहायचे नाही. ती मला धमकी देते की, माझ्याबरोबर राहायला नाही आलास तर मी न्यायालयात खटला दाखल करेन, मी काय करावे?
- उत्तर : आई-वडिलांपासून वेगळे राहायला लावणे, वेगळे राहण्यासाठी जबरदस्ती करणे, यावरून तुम्ही स्वतः घटस्फोट दाखल करू शकता. तुम्ही एकुलते एक असाल तर तुमची पत्नी तुम्हाला आई-वडिलांपासून वेगळं राहण्यास जबरदस्ती करू शकत नाही. यामध्ये तुम्हाला एक वर्ष थांबून मग दावा दाखल करण्याची गरज नाही, तूर्तास तुम्ही दावा दाखल करू शकता.
-प्रश्न : माझे वय ६० वर्ष आहे. माझी मुलगी डॉक्टर आहे व ती तिच्या मित्रासोबत राहत आहे. ते दोघं माझ्याकडे सतत मोठमोठ्या रकमेची मागणी करत राहतात, अवास्तव मागण्या पूर्ण करणे मला शक्य नाही. या सर्वांचा माझ्या मानसिकतेवर परिणाम होत आहे, मी काय करावे?
-उत्तर : मुलगी सज्ञान असेल तर आपण तिला पैसे दिले नाहीत तरीही चालणार आहे. या मागण्या थांबवण्यासाठी आपण ज्येष्ठ नागरिकत्व कायद्याअंतर्गत दावा दाखल करू शकता, त्याचप्रमाणे आयुक्त कार्यालयामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विभागामध्येदेखील अर्ज करू शकता. तेथे आपल्या मुलीला बोलावून समुपदेशन केले जाईल व योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. सज्ञान मुलीने कुणाबरोबर राहावे, याच्यावर तुम्ही बंधन घालू शकत नाही.
-प्रश्न : माझी आई माझ्या बहिणीसोबत राहत आहे. आईने व बहिणीने माझ्यावर पोटगीचा दावा दाखल केला आहे. ज्यामध्ये माझ्या पगारातील साधारण ७० टक्के रक्कम पोटगी म्हणून मला आईला द्यावी लागत आहे. मी माझ्या वडिलांनादेखील सांभाळतो. ३० टक्क्यांमध्ये राहणे अशक्य आहे, मी काय करावे?
उत्तर : तुम्ही या दाव्यामध्ये अपील करू शकता. सर्वोच्च न्यायालयाने अनेक दाव्यांमध्ये सांगितले आहे की, आई-वडिलांना सांभाळणे हे सर्व मुलांचे समान कर्तव्य आहे, तसेच पोटगी ही मुलाच्या/नवऱ्याच्या उत्पन्नाच्या २५ टक्केपेक्षा जास्त नसावी. तुम्ही तुमच्या वरच्या जबाबदाऱ्या दाखवून पोटगी कमी करून घेऊ शकता.
-प्रश्न : मला व माझ्या पतीला सहमतीने घटस्फोट घ्यायचा आहे. मला परदेशात जाण्याची संधी मिळत आहे व यासाठी मला लवकरात लवकर घटस्फोट मिळणे गरजेचे आहे.
-उत्तर : सहमतीने होणाऱ्या घटस्फोटासाठी सहा महिन्यांचा कालावधी बंधनकारक आहे; परंतु तुम्ही जर १८ महिने वेगळे राहिले असाल तर हा सहा महिन्यांचा कालावधी न्यायालयाला विनंती करून रद्द करून घेता येतो व घटस्फोट हा लवकरात लवकर होतो.
-प्रश्न : माझ्या पत्नीने माझ्यावर अनेक दावे दाखल केलेल्या आहेत. घटस्फोटासाठी, कौटुंबिक हिंसाचाराची, पोटगीची गेले ६ वर्ष कोर्ट कचेरी चालू आहे. मी पोटगीदेखील भरत होतो, सध्या माझी नोकरी गेली आहे म्हणून मी पोटगी देऊ शकत नाही. पत्नी आता घरी यायचे आहे, असे म्हणत आहे. आम्हाला भीती आहे ती घरी येऊन अजून काही करेल.
-उत्तर : तुम्हाला नसेल एकत्र राहायचे तर तसे तुम्ही कोर्टात सांगू शकता. जबरदस्ती पत्नी तुमच्या घरात येऊ शकत नाही आणि पत्नीसमोर अट ठेवा की, यायचे असल्यास सर्व दावे काढून घ्यायच्या व पोटगीचा हक्क कायमस्वरूपी सोडून द्यायचा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

