...आणि मी झाले लोकांसाठी ‘पद्मश्री मंजम्मा’

...आणि मी झाले लोकांसाठी ‘पद्मश्री मंजम्मा’

Published on

पुणे, ता. २५ ः ‘‘मला फोन आला. समोरील व्यक्तीने तुम्हाला ‘पद्मश्री’ मिळाल्याचे सांगितले. मला विश्वास बसला नाही. मी सरळ चुकीचा नंबर असल्याचे सांगून फोन ठेवला; पण नंतर पद्मश्री मलाच मिळाल्याची खात्री पटली. मला प्रश्न पडला होता, ना मी कुलगुरू आहे, ना चित्रपटांमधील कलाकार. किताब मिळाल्यापासून मी लोकांसाठी पद्मश्री मंजम्मा झाले.’’ हे सांगत होत्या कर्नाटकातील ज्येष्ठ लोककलावंत मंजम्मा जोगती. त्यांनी त्यांचा जीवनप्रवास मंगळवारी मुलाखतीतून मांडला.
ललित कला केंद्र, महाराष्ट्र कला संस्कृती मंच आणि पद्मगंधा प्रकाशन यांच्याकडून लोकसाहित्य आणि लोककलांचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांच्या ‘लोकरंगनायिका’ पुस्तकाचे प्रकाशन मंजम्मा यांच्या हस्ते मंगळवारी (ता. २५) झाले. डॉ. मदन महाराज गोसावी अध्यक्षस्थानी होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, लावणी कलावंत राजश्री नगरकर, बाळासाहेब काशीद, ‘पद्मगंधा’चे अभिषेक जाखडे उपस्थित होते. डॉ. एम. व्यंकटेश आणि प्रा. प्रवीण भोळे यांनी मंजम्मा यांची मुलाखत घेतली.
मंजम्मा म्हणाल्या, ‘‘काही काळ इडली विकत असल्याने पद्मश्री स्वीकारण्यासाठी दिल्लीला जाताना बंगळूरच्या विमानतळावर मी २८० रुपयांना इडली विकत घेतली होती. तेव्हा कोणतीच गोष्ट कायमस्वरूपी नसते, ही भावना माझ्या मनात आली आणि स्वतःचा प्रवास डोळ्यांपुढून गेला. स्वतःमधील बदल जाणवू लागला तेव्हा घरातून बाहेर पडावे लागले. शाळाही सुटली. मी बाहेर जीवन जगू लागले. आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, पण एका वडील आणि मुलीचे रस्त्यावरील नृत्य पाहून माझा आत्मविश्वास वाढला. मग त्यांनी मला नृत्य शिकवले. पुढे मंदिरात देवदासींच्या नृत्यात सहभागी झाले. हे आपले क्षेत्र नाही हे ओळखून मी एक रुपयाला चार इडल्या विकू लागले. त्यानंतर मी पुन्हा लोककलाक्षेत्रात आले. कर्नाटक जनपद अकादमीची मी पहिली तृतीयपंथी अध्यक्ष झाले.’’ मंजम्मा यांनी कन्नड भाषेत दिलेल्या उत्तरांना उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

नव्या दृष्टीने बघायला पाहिजे ः ढेरे
लोककलावंतांना आपण श्रेय द्यायचे विसरून गेलेलो आहोत. अलीकडच्या काळामध्ये ही दृष्टी बदलून आज यांनापण पद्मश्री, पद्मभूषण देऊन आपण आत्ता जागे झालो आहोत. अभिजन कलांचे स्रोत बहुजनांच्या कलेत आहे. आपण गरज लागली की बहुजन कला-संस्कृतीकडे वळतो. अशा लोककलेला प्रतिष्ठा देण्याची जाण दुर्गाबाई भागवत यांनी दिली. लोककलावंतींचे संघर्षमय असे आयुष्य त्यांच्या सुख-दुःखाच्या कहाण्या या पुस्तकांमधून आपल्यासमोर आल्या आहेत. या कलावंतिणींच्या जीवनाकडे नव्या दृष्टीने बघायला हवे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com