सांस्कृतिक विभागाची उदासीनता नाट्यगृहांसाठी मारक

सांस्कृतिक विभागाची उदासीनता नाट्यगृहांसाठी मारक

Published on

पुणे, ता. १० : नाट्यगृहांच्या दुरवस्थेसाठी महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाची उदासीनता कारणीभूत ठरत असून, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे नियमित देखभालीकडे होणारे दुर्लक्ष मारक असल्याची भावना नाट्यक्षेत्रातील कलाकार, व्यवस्थापक व्यक्त करत आहेत. तसेच, सांस्कृतिक विभागाला प्रत्येक कामासाठी भवन किंवा विद्युत विभागावर अवलंबून राहावे लागते. त्यातून अनेक कामे रखडतात. हे टाळण्यासाठी सांस्कृतिक विभागाकडे याबाबतचे अधिकार वर्ग करण्याची मागणी केली जात आहे.
गेल्या आठवड्यात कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात एका प्रेक्षकाच्या कपड्यात उंदीर शिरल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर पुन्हा एकदा शहरातील नाट्यगृहांच्या दुरवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाचे स्वच्छतेकडे झालेले दुर्लक्ष या प्रसंगातून उघड झाले. त्यानंतरही या प्रकाराला जबाबदार असणाऱ्या कोणावरही कारवाई करण्यात आली नसून केवळ पेस्ट कंट्रोल करून वेळ मारून नेली जात आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेवर कलाकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
‘‘महापालिकेतील अन्य विभागांप्रमाणे सांस्कृतिक विभागाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. बहुतांश वेळा या विभागाचे अधिकारी, नाट्यगृहांचे अधीक्षक हे आपल्या केबिनमध्येच असतात. प्रत्यक्ष नाट्यगृहांमधील परिस्थितीची त्यांना पुरेशी माहितीही नसते’’, अशा शब्दांत एका व्यवस्थापकाने आपली नाराजी नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केली.

नाट्यगृहांची परिस्थिती बदलण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या आणि ठेकेदारांच्या कामावरील देखरेख वाढविण्याची गरज आहे. कर्मचारी वेळेत येतात की नाही, नेमून दिलेले काम करतात की नाही, याची नोंद ठेवणे गरजेचे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही पाहणीसाठी नियमितपणे नाट्यगृहांमध्ये जावे.
- सुनील महाजन, व्यवस्थापक व कार्यक्रम संयोजक

तक्रारीसाठी अधिकारीच नसतात
बालगंधर्व रंगमंदिरात एका नाटकाचा प्रयोग असताना पुरुषांच्या मेकअप रुममधील स्वच्छतागृहात घूस आढळून आली होती. त्यावेळी एकही कर्मचारी उपलब्ध नव्हता. तसेच, तक्रार करण्यासाठी अधिकारीही उपलब्ध नव्हते, असा अनुभव एका कलाकाराने ‘सकाळ’ला सांगितला.

सांस्कृतिक विभागाकडून निविदा
सध्याच्या नियमांनुसार नाट्यगृहातील देखभाल-दुरुस्तीची कामे असल्यास सांस्कृतिक विभागाला ती विद्युत किंवा भवन विभागाकडून करून घ्यावी लागतात. त्यामुळे कोणतीही समस्या सोडविण्यासाठी विलंब होतो. हे टाळण्यासाठी नाट्यगृहातील देखभाल-दुरुस्तीच्या निविदा सांस्कृतिक विभागामार्फतच काढण्याचा विचार सुरू असल्याचे सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त सुनील बल्लाळ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com