

पुणे, ता. ११ : ‘‘पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची पावसामुळे गैरसोय टाळण्यासाठी यंदा पहिल्यांदाच जर्मन हॅंगर (मंडप) उभा करण्यात येणार आहेत. पालखीमार्गावर १२ ठिकाणी हे मंडप असतील. यासह स्वच्छता, तात्पुरते स्वच्छतागृह, आरोग्य सुविधा, हिरकणी कक्षाची व्यवस्था केली आहे. विशेषतः वारकऱ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी काटेकोर नियोजन केले आहे,’’ अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी बुधवारी दिली.
श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बुधवारी (ता. १८) तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा गुरुवारी (ता. १९) प्रस्थान ठेवणार आहे. यांसह इतर पालखी सोहळ्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अप्पासाहेब गुजर आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ‘‘पालखी सोहळ्याच्या मुक्कामांच्या ठिकाणी आवश्यक सुविधांचे नियोजन केले आहे. काही ठिकाणी कामे सुरू असून, ते तातडीने पूर्ण केले जातील. मुक्कामाच्या ठिकाणी ग्रामपंचायतींना स्वच्छता आणि आरोग्यासाठी देण्यात येणाऱ्या निधीमध्ये वाढ केली आहे. तीन लाखांहून आता पाच लाख रुपये निधी केला आहे, तर दुपारच्या विसाव्यासाठी दोन लाख आणि लहान विसाव्यासाठी ग्रामपंचायतींना एक लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे. शासनाकडे आपण २५ कोटी ८४ लाख रुपयांच्या निधीची मागणी केली होती. त्यापैकी जवळपास ७० टक्के निधी मिळाला आहे. त्याचे ग्रामपंचायतींना वितरण आजच सुरू होईल. जिल्हा परिषदेकडून दिंडीप्रमुखांना तीन हजार औषधांचे किट वाटप करण्यात येईल, ज्यामध्ये १३ प्रकारचे औषधे आणि ती वापरण्यासाठी माहितीपत्रक दिले जाणार आहे. सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर २५० कामगारांकडून साफसफाईचे काम हाती घेण्यात येईल.’’
नागरिकांकडून २१ हजार स्वच्छतागृहे
पालखी मार्गावरील गावांमध्ये जिल्हा परिषदेकडून एक सर्वेक्षण करण्यात आले. ज्यामध्ये कुटुंबाचे स्वतःचे स्वच्छतागृह वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देऊ शकतात, याची माहिती घेतली. त्यामध्ये २१ हजार ४३८ खासगी स्वच्छतागृहे उपलब्ध झाली आहेत. ही स्वच्छतागृह गावांमधील कुटुंबांचे, सार्वजनिक स्वच्छतागृह, समाजमंदिर, मंगल कार्यालय, हॉटेलमध्ये उपलब्ध झाल्याचे पाटील यांनी सांगितले. वारकऱ्यांना समजण्यासाठी या स्वच्छतागृहांवर पांढरे निशाण लावले जाणार आहे.
या ठिकाणी असेल जर्मन हॅंगर
जर्मन हॅंगर म्हणजे पाऊस अन् उन्हापासून संरक्षण देणारा मंडप. सध्या विविध सभा, समारंभांसाठी तो मोठ्या प्रमाणात वापरला जातो. हे जर्मन हॅंगर तुकोबांच्या पालखी सोहळ्यात कदमवाकवस्ती आणि यवतमध्ये प्रत्येकी दोन, वरवंड, उंडवडी, खराडेवाडी, सणसर, निमगाव केतकी, सराटी येथे प्रत्येकी एक, तर माउलींच्या सोहळ्यात वाल्हे येथे दोन ठिकाणी उभे केले जाणार आहेत.
असे आहे नियोजन....
स्वच्छतागृहांची व्यवस्था
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा - १,८०० (जाताना) - ३०० (येताना)
श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा - १,२०० (जाताना) - २०० (येताना)
श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळा - ३०० (जाताना)
इतर पालखी सोहळे - २५०
एकूण - ४,०५०
इतर सुविधा
५८
- हिरकणी कक्ष
२००
- पिण्याचे पाणी टॅंकर
९८
- टँकरभरणा केंद्र
१० टक्के आयसीयू खाटा राखीव
- आरोग्य केंद्र, उपकेंद्र, खासगी रुग्णालय
१७१
- रुग्णवाहिका
१,३३५
- तपासणीसाठी पाठविलेले पाणी स्रोतांचे नमुने
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.