पहिलीची पुस्तके कृती अन् भाषेवर भर देणारी

पहिलीची पुस्तके कृती अन् भाषेवर भर देणारी
Published on

मीनाक्षी गुरव : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ११ : इयत्ता पहिलीच्या ‘सीबीएसई पॅटर्न’वर आधारित नव्या पाठ्यपुस्तकात कृती, खेळ आणि भाषेवर भर देत विद्यार्थ्यांना संकल्पना समजून सांगण्याला प्राधान्य दिले आहे. अभ्यासक्रमाच्या तिन्ही पाठ्यपुस्तकांमधून विद्यार्थ्यांच्या जवळपास ६८ क्षमता विकसित होण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. ‘सीबीएसई’च्या धर्तीवर अभ्यासक्रमाचा स्तर उंचाविण्याचा प्रयत्न केला आहे. भाषा विषयाच्या पाठ्यपुस्तकात गेल्या वर्षीच्या तुलनेत फारसा फरक नसला, तरीही भाषा समृद्धीवर लक्ष केंद्रित केले आहे.
‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’नुसार राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी), केंद्र व राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार इयत्ता पहिलीचा अभ्यासक्रम तयार केला आहे. ‘सीबीएसई पॅटर्न’वर आधारित नवीन पाठ्यपुस्तकांबाबत अभ्यासकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. पाठ्यपुस्तके तयार करताना बालकांच्या भावविश्वांचा, त्यांच्या आवडीनिवडींवर पुरेपुर विचार केल्याचे दिसून येते. इयत्ता पहिलीसाठी (मराठी माध्यम) मराठी, गणित आणि इंग्रजी अशी तीन पाठ्यपुस्तके आहेत. मराठीच्या पाठ्यपुस्तकात नऊ कवितांसह गोष्टी, चित्रकथा, अक्षरे, स्वरचिन्हे, वाचन पाठ, भाषिक कोडी, भाषिक खेळ आणि कृती या गोष्टी नव्याने शिकायला मिळणार आहेत. तर, गणिताच्या पाठ्यपुस्तकात संकल्पना सोप्या भाषेत स्पष्ट केल्या आहेत. पाठ्यपुस्तकातील आशय हा शिक्षणाची लक्ष्ये, अभ्यासक्रमाची ध्येय, क्षमता व अध्ययन निष्पत्ती यांच्याशी सुसंगत आहे. पाठ्यपुस्तकात कृती, खेळ, गोष्टी आणि गाण्यांचा अंतर्भाव केला आहे.

मुलांच्या ६८ क्षमता विकसनावर भर
जिल्हा परिषद शाळा सिद्धेवाडी (ता. तासगाव, जि. सांगली) येथील प्राथमिक शिक्षक आणि इयत्ता पहिली अभ्यासक्रम प्रशिक्षणातील राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक अजय काळे म्हणाले, ‘‘इयत्ता पहिलीच्या तिन्ही पाठ्यपुस्तकांमधून मुलांच्या ६८ क्षमता विकसित होण्यावर भर दिला आहे. पाठ्यपुस्तके कृतींवर भर देणारी असून मातृभाषेचा आधार घेत स्थानिक परिस्थितीला अनुसरून संदर्भ असणारी आहेत. कृती करण्यासाठी स्वतंत्र जागा दिली आहे. भारतीय ज्ञानप्रणालीचा आधारही घेतला आहे. बालकांच्या दृष्टिकोनातून ‘कसे शिकायचे?’ याला प्राधान्य दिले आहे. विशेषत: गणित विषयात काठिण्य पातळी वाढविली आहे.’’


इयत्ता पहिलीची पाठ्यपुस्तके सीबीएसईच्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न केला आहे. एनसीईआरटीच्या मार्गदर्शक सूचनांची प्रभावी अंमलबजावणी अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके तयार करताना केला आहे. विद्यार्थ्यांच्या कृतीवर, अनुभवावर आधारित शिक्षणाला महत्त्व दिले आहे. आगामी काळात येणाऱ्या आव्हानात्मक परिस्थितीला आणि विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांची तयारी प्राथमिक स्तरापासून करण्याचा प्रयत्न नवीन पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीतून झाल्याचे प्रकर्षाने दिसते.
- महेंद्र गणपुले,
माजी उपाध्यक्ष, राज्य मुख्याध्यापक महामंडळ

नवीन पाठ्यपुस्तकांची वैशिष्ट्ये...
१) अभिव्यक्त होण्याला मिळणार स्थान
२) संवादकौशल्यात होणार वाढ
३) भारतीय ज्ञान प्रणालीची ओळख
४) मातृभाषेतून संकल्पना समजण्यावर भर
५) संदर्भ म्हणून स्थानिक परिस्थितीचा आधार
६) सोप्या भाषेत गणितीय संकल्पना शिकता येणार
७) भाषा समृद्धीसाठी विशेष प्रयत्न

दप्तराचे ओझे कमी होणार....
पाठ्यपुस्तक : पानांची संख्या : पाठ्यपुस्तकांची किंमत : अंदाजे वजन
मराठी बालभारती : ८० : ६१ रुपये : २१२ ग्रॅम
गणित : १०४ : ७२ रुपये : २५८ ग्रॅम
माय इंग्लिश बुक : ७६ : ५६ रुपये : २०४ ग्रॅम
एकूण वजन : --- : --- : ६७४ ग्रॅम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com