मध्यवर्ती पुणे अडकले कोंडीत

मध्यवर्ती पुणे अडकले कोंडीत

Published on

पुणे, ता. १४ ः मुलांसाठी शालेयपयोगी साहित्याची खरेदी करण्यासाठी व संकष्टीी चतुर्थीनिमित्त दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केल्याने शनिवारी शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्याचे चित्र दुपारी होते. वाहतूक कोंडीमुळे नागरिक व वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले.
उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर आता सोमवारपासून (ता. १६) शाळा सुरू होत आहेत. त्यामुळे मुलांना कपडे, शालेयोपयोगी साहित्य, बूट खरेदी करण्यासाठी नागरिकांनी शनिवारी सकाळी अकरा वाजल्यापासूनच मध्यवर्ती भागात गर्दी केली होती. त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठीही भाविकांची पावले सकाळपासूनच छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याकडे वळली होती. त्यातच दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे व शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे नागरिकांनी चारचाकी वाहने घेऊन शहरात येणे पसंत केले. नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने शहराच्या मध्यवर्ती भागात सकाळी अकरा वाजल्यापासूनच वाहतूक कोंडी होण्यास सुरवात झाली.

अशी होती स्थिती
- छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर महापालिका भवनापर्यंत तर बाजीराव रस्त्यावर महाराणा प्रताप बागेपर्यंत वाहनांच्या रांगा
- लक्ष्मी रस्त्यावरदेखील गणेश पेठ-नाना पेठेपर्यंत वाहनांची कोंडी
- मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडीचा ताण नेहरू रस्ता, टिळक रस्ता, काँग्रेस भवन रस्ता या रस्त्यांवर पडला
- शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांनी शनिवार नारायण पेठेतील नदीकाठचा रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावरून मध्यवर्ती भागांत पोचण्याचा प्रयत्न केला
- अनेक नागरिकांनी महापालिका भवन, नदीकाठच्या रस्त्यासह मध्यवर्ती भागातील रस्त्यांवरच वाहने पार्किंग केल्याने वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडली
- त्यामुळे खरेदी व दर्शनासाठी आलेल्या नागरिकांचा चांगलाच हिरमोड झाला
- वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना एक-दोन किलोमीटर लांब वाहने पार्किंग करून खरेदीसाठी रिक्षाने किंवा पायी मध्यवर्ती भागात यावे लागले
- दुपारनंतर रस्त्यांवर गर्दी वाढल्याने नागरिकांना पायी चालणेही मुश्कील


पोलिसांचे ढिसाळ नियोजन
खरेदी व दर्शनासाठी नागरिकांची शनिवारी व रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्‍यता होती. त्यादृष्टीने वाहतुकीचे नियोजन होणे आवश्‍यक होते. नियोजन नसल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा फटका बसला. अंतर्गत रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात कोंडी झाल्याने शनिवारी शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र होते.

मुलांच्या शाळा सोमवारपासून सुरू होत आहेत. त्यामुळे कपडे, वाह्या-पुस्तके खरेदी करण्यासाठी आलो. वाहन जंगली महाराज रस्त्याला पार्किंग करून तेथून रिक्षाने अप्पा बळवंत चौकात यावे लागले. खरेदीनंतर रिक्षाही मिळत नसल्याने पुन्हा पायी जंगली महाराज रस्त्यापर्यंत जाण्याची वेळ आली आहे.
- किशोर माने, नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com