पुणे, ता. १६ : उन्हाळ्याची सुट्टी संपवून नव्या कोऱ्या वह्या-पाठ्यपुस्तके, कडक इस्त्री केलेला गणवेश आणि नवे बूट, खांद्यावर नवे दफ्तर घेत लाखो विद्यार्थ्यांनी शाळेत पुन्हा पाऊल टाकले. ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण, औक्षण करत शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
शाळांमध्ये विविध उपक्रमांद्वारे प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. विदर्भ वगळता संपूर्ण राज्यातील शालेय शिक्षणाचे २०२५-२६ हे शैक्षणिक वर्ष सोमवारपासून सुरू झाले. शालेय शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार शाळांमध्ये प्रवेशोत्सव जल्लोषात करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांमध्ये फुलांची आणि फुग्यांची सजावट, रांगोळीच्या पायघड्या, विविध वेशभूषा केलेले कलाकार अशी जय्यत तयारी करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी, त्यांचा शाळेचा पहिला दिवस कायम आठवणीत राहावा, म्हणून प्रत्येक शाळेने वेगवेगळे उपक्रम राबवीत प्रवेशोत्सव साजरा केला.
बिबवेवाडीतील पुणे महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ‘शाळा प्रवेशोत्सव’ साजरा करण्यात आला. यावेळी सहाय्यक शिक्षणप्रमुख सुभाष रावत, जयेश शेंडकर, पर्यवेक्षिका शोभा घोडे, मुख्याध्यापिका आरती पोळ आदी उपस्थित होते. मिसाळ म्हणाल्या, ‘‘राज्यातील शाळांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे. त्यानुसार पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षणात क्रांतिकारी बदल होत आहेत. केवळ पाठांतरावर भर न देता, अनुभवावर आधारित शिक्षण दिले जाणार आहे. खेळ, गाणी, गोष्टी, कोडी, नाटक, चित्रकला, प्रकल्प यांचा शिक्षणात समावेश असेल. त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत.’’
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मुरलीधर लोहिया मातृमंदिर शाळेत शिक्षकांनी ढोल, लेझीमचा गजर करत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी शाळेतील काही मुलांनी महापुरुषांच्या वेशभूषा केली होती. प्रत्येक विद्यार्थ्याचे औक्षण करण्यात आले. शाळेच्या अध्यक्षा राजश्री ठकार, मुख्याध्यापिका माधुरी बर्वे, शिक्षिका निशा जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.