

पुणे, ता. १६ : ‘‘पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल सादर करा. धोकादायक इमारतींची तपासणी करण्यासह धरणांतून होणाऱ्या विसर्गाच्या आधी नदीपात्रालगत राहणाऱ्या नागरिकांना सावध करावे. समन्वय साधून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवा,’’ अशा स्पष्ट शब्दांत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनाला निर्देश दिले.
पुणे महापालिकेत सोमवारी (ता. १६) पावसाळ्यापूर्वीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. गोऱ्हे होत्या. या वेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त बी. पी. पृथ्वीराज, एम. जे. प्रदीप चंद्रन, ओमप्रकाश दिवटे, नगर अभियंता प्रशांत वाघमारे, आरोग्य प्रमुख नीना बोर्डे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘मॉन्सूनने यंदा लवकर हजेरी लावली असून, शहरातील अनेक भागांत पावसाळ्यापूर्वीची कामे अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने ही कामे तातडीने पूर्ण करून संभाव्य आपत्तीपासून नागरिकांचे संरक्षण करावे. शहरातील जुने वाडे व इमारती धोकादायक स्थितीत असल्यास संबंधित मालकांना सूचना देऊन आवश्यक डागडुजी करावी. सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने करून अहवाल सादर करण्यात यावा.’’
‘‘आपत्ती व्यवस्थापन अधिनियमात शहरी भागासाठी महापालिका आयुक्त हे प्रमुख अधिकारी असावेत, अशी सुधारणा केंद्र सरकारने सुचवली आहे. राज्य सरकारने त्याबाबत लवकरच अधिसूचना काढावी, यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहे,’’ असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.