मोफत उपचारापासून गरजू वंचित

मोफत उपचारापासून गरजू वंचित

Published on

पुणे, ता. १८ ः पुण्यातील तीन प्रसिद्ध खासगी रुग्णालयांमध्ये रोज १९ खाटा गरजवंत रुग्णांसाठी उपलब्ध करून देता येणे शक्य आहे; पण पुणे महापालिकेकडून या राखीव खाटांबाबत जनजागृती केली जात नसल्याने त्यांना लाभ मिळत नाही. गेल्या तीन वर्षांत २० हजार ८०५ रुग्णांवर मोफत उपचार होऊ शकले असते, पण केवळ २२७ जणांवरच उपचार झाले आहेत. महापालिकेने याबाबत जनजागृती करून नागरिकांना लाभ दिला पाहिजे, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केली आहे.
रुबी हॉल, कर्वे रस्त्यावरील सह्याद्री रुग्णालय आणि के. के. आय इन्स्टिट्यूट या तीन खासगी रुग्णालयांना पुणे महापालिकेने अतिरिक्त एफएसआय अर्धा टक्का दिला आहे. त्याच्या बदल्यात या रुग्णालयांनी दररोज १९ मोफत खाटा महापालिकेने शिफारस केलेल्या रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे बंधनकारक आहे. यामध्ये रुबी हॉलमध्ये १२, सह्याद्रीमध्ये पाच आणि के. के. आय. इन्स्टिट्यूटने दोन खाटा मोफत ठेवल्या जातात. शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी असते, तर खासगी रुग्णालयातील उपचार सर्वसामान्य नागरिकांना परवडत नाहीत. अशा स्थितीत महापालिकेची ही योजना लाभदायी ठरणारी आहे. २०२२ ते २०२५ या तीन वर्षांत हे रुग्णालय फारच थोड्या रुग्णांवर मोफत उपचार करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय, औंधच्या एम्स रुग्णालयानेही १० टक्के खाटा महापालिकेच्या रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचा करार २०१३ मध्ये केला होता, पण तिथेही फारच मर्यादित रुग्णांना लाभ मिळाला. महापालिका आयुक्तांनी यामध्ये लक्ष घालून या योजनेची योग्य प्रसिद्धी करावी, गरजू रुग्णांसाठी उत्पन्न मर्यादा वाढवावी आणि यंत्रणा सक्षम करावी, अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.

रुग्णालय - तीन वर्षांतील लाभार्थी
रुबी हॉल - ७२
सह्याद्री - ७९
के. के. आय इन्स्टिट्यूट - ७५

अशी आहे स्थिती
- पुण्यातील तीन प्रमुख रुग्णालयांना अतिरिक्त एफएसआयच्या बदल्यात दररोज १९ मोफत खाटा द्याव्या लागतात
- गेल्या तीन वर्षांत या रुग्णालयांनी केवळ २२७ रुग्णांवरच मोफत उपचार केले; अपेक्षित आकडा २०,८०५ होता
- औंध एम्स रुग्णालयात १० टक्के खाटा मोफत ठेवण्याच्या कराराचाही पुरेसा फायदा रुग्णांना झाला नाही
- योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहचत नसल्याने अनेक गरजू रुग्ण लाभ घेऊ शकलेले नाहीत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com