प्रसूतिगृह बनले औषधांचा गोदाम

प्रसूतिगृह बनले औषधांचा गोदाम
Published on

पुणे, ता. ४ : महापालिकेचे शुक्रवार पेठेतील गाडीखाना दवाखाना व औषध भांडार येथे मालती काची प्रसूतिगृह आहे. मात्र, ते कोरोनाकाळापासून म्‍हणजे २०२० पासून बंद पडले आहे. आता त्‍याचा वापर औषधांचे गोदाम म्‍हणून केला जात आहे. त्‍यामुळे परिसरातील लोकवस्‍तीतील गर्भवतींना खासगी रुग्‍णालयात प्रसूती करावी लागते किंवा महापालिकेच्‍या इतर दूरच्या प्रसूतिगृहांमध्‍ये जावे लागते. हे प्रसूतिगृह सुरू करावे, अशी मागणी स्‍थानिक नागरिकांकडून होत आहे.

नाव प्रसूतिगृहाचे, आत औषधांचे खोके
मालती काची प्रसूतिगृह हे गाडीखाना दवाखान्‍यातील पहिल्‍या मजल्‍यावर आहे. तेथे प्रसूतीसाठी २५ खाटांची सुविधा आहे. त्‍यामध्‍ये जनरल वॉर्ड, शस्त्रक्रियागृह यांचा समावेश आहे. मात्र आता येथे औषधांचे खोके ठेवले गेले आहेत. तर, तळमजल्‍यावर बाह्यरुग्ण विभाग व आरोग्‍यवर्धिनी केंद्र आहे. येथे आलेल्‍या गर्भवतींना दुसरीकडे डॉक्‍टर पाठवतात.

१९ प्रसूती रुग्णालयांसाठी आठ स्त्रीरोग, सहा भूलतज्ज्ञ
प्रसूतिगृहांमध्‍ये मनुष्यबळाचा प्रचंड अभाव आहे. २१ प्रसूतिगृहांपैकी दोन रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रियागृह (ऑपरेशन थिएटर) नाही. तर उर्वरित १९ प्रसूतिगृहांसाठी केवळ ८ ते १० स्त्रीरोग तज्ज्ञ व लहान प्रसूती केंद्रांमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञाऐवजी केवळ ‘एमबीबीएस’ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असतो. स्‍त्रीरोगतज्‍ज्ञ प्रामुख्याने कमला नेहरू, सोनवणे आणि राजीव गांधी रुग्णालयात कार्यरत असतात. मालती काची प्रसूतिगृह का बंद आहे याबाबत वरिष्‍ठ स्‍तरावरूनच निर्णय होऊ शकतो, अशी माहिती प्रसूती केंद्रांच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लता त्रिंबके यांनी दिली.

सर्वेक्षण करून फायदा नाही
या प्रसूतिगृहाची आरोग्य विभागाने दोन वर्षांपूर्वी २०२३ मध्ये सर्वेक्षण व विश्‍लेषण (गॅप अ‍ॅनालिसिस) केले. त्यावेळी असे आढळले की, महापालिकेतील प्रसूतिगृहांसाठी विशेषज्ज्ञ डॉक्टर, अतिदक्षता विभागातील डॉक्‍टर आणि रक्तपेढींच्या कमतरतेमुळे ही केंद्रे गुंतागुंतीच्या रुग्णांना हाताळू शकत नाहीत. त्‍यामुळे प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना डॉक्टरांना तातडीने ससून रुग्‍णालयात किंवा दुसऱ्या खासगी रुग्णालयात हलविण्यात येते.

अशी आहे स्थिती
- पुणे महापालिकेची शहरात २१ प्रसूतिगृहे
- त्‍यापैकी मालती काची आणि हडपसर येथील मगर रुग्‍णालयातील प्रसूतिगृहात प्रसूती होत नसल्‍याने ते बंद
- उरलेला सर्व भार हा १९ प्रसूती केंद्रांवर
- त्‍यापैकी सहा ठिकाणी सिझेरियन
- कमला नेहरू रुग्‍णालय, भवानी पेठेतील चंदुमामा सोनावणे प्रसूतिगृह, येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालय व प्रसूतिगृह, आंबिल ओढ्यातील रमाबाई आंबेडकर प्रसूतिगृह येथे जास्‍त प्रसूती
- मालती काची प्रसूतिगृह कोरोनाच्‍या आधी सुरू
- त्‍याचा फायदा शुक्रवार पेठ व मंडई परिसरातील राहणाऱ्या नागरिकांना होत होता
- ते बंद झाल्‍याने बोजा मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्‍णालयावर पडला आहे

पाच ते सहा वर्षांपूर्वी हे प्रसूतिगृह सुरू होते. तेथे आमचे नातेवाईक असलेल्‍या महिलांच्‍या प्रसूती झालेल्‍या आहेत. अगदी लोहगावच्‍या महिलांची देखील येथे प्रसूती झालेली आहे. गर्भवतींना चांगल्‍या सुविधा मिळत होत्‍या. मात्र, आता ते बंद झाल्‍याने कमला नेहरू रुग्‍णालयात रुग्‍णांना पाठवले जाते. ते लवकरात लवकर पुन्‍हा सुरू करावे.
- लता कामठे, शाहू चौक, शुक्रवार पेठ

या ठिकाणी फार प्रसूती कमी होत होत्‍या. तसेच या प्रसूतिगृहाजवळच दीड किलोमीटरवर गुरुवार पेठेत सावित्रीबाई फुले प्रसूतिगृह आहे. तसेच मनुष्यबळाची कमतरता असल्‍याने दोन्‍ही ठिकाणी सेवा देणे जिकरीचे होते. तसेच या भागात एक प्रसूतिगृह पुरेसे आहे असे दिसून येते. महिन्‍याला सर्व प्रसूतिग्रहांमध्‍ये मिळून ३५० ते ४०० प्रसूती होतात.
- डॉ. नीना बोराडे, आरोग्‍यप्रमुख, पुणे महापालिका

दृष्टिक्षेपात
- महापालिकेचे प्रसूतिगृहे : २१
- बंद असलेले : २
- सिझेरियन सुविधा असलेले प्रसूतिगृहे : ६
- स्‍त्रीरोगतज्‍ज्ञ : ८ ते १०
- भूलतज्‍ज्ञ : ६
- परिचारिकांची संख्‍या : २५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com