कृषी विभागाच्या हट्टीपणापुढे टेकले हात - थेट अपर मुख्य सचिवांना पत्र लिहून मागितली परवानगी
पुणे, ता. २४ ः सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी कृषी विद्यापीठाची ३० गुंठे जागा महापालिकेला ताब्यात मिळावी, यासाठी गेल्या पाच-सहा वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. वारंवार पाठपुरावा करून ही जागा ताब्यात देण्याचे आदेश महापालिकेने आणले. त्यानंतरही जागा ताब्यात मिळत नसल्याने महापालिका प्रशासनाने हात टेकले आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी आता थेट कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांना पत्र पाठवून या जागेवर काम सुरू करण्यासाठी परवानगी द्या, काम सुरू होत नसल्याने केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने महापालिकेवर नाराजी व्यक्त केली आहे, असे पत्रात नमूद केले आहे.
मुळा-मुठा नदी शुद्धीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने जपानमधील जायका कंपनीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन मार्च २०२२ मध्ये झाले आहे. शहरात ११ ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे, त्यांचे बहुतांश काम पूर्ण होत आले आहेत, पण औंध येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बॉटेनिकल गार्डनच्या ३० गुंठे जागेतील १० एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रकल्प उभारण्याचे काम अद्याप सुरू होऊ शकलेले नाही. ही जागा जैवविविधता उद्यानासाठी आरक्षित असल्याने ती जागा ताब्यात देण्यास नकार देण्यात आला होता. त्यानंतर महापालिकेने दिल्ली, नागपूर येथील अनेक संस्थांशी पत्रव्यवहार करून त्यांची परवानगी मिळवली. राज्य सरकारने या जागेवरचे आरक्षणही उठवले, त्यानंतर ही जागा ताब्यात मिळेल असे वाटले होते, पण अजूनही जागा ताब्यात आलेली नाही.
-----------
‘जागेच्या बदल्यात जागा’
महापालिकेने या जागेचा मोबदला म्हणून कृषी विद्यापीठाला रक्कम देण्याची तयारी दर्शविली आहे, पण विद्यापीठाने ‘जागेच्या बदल्यात जागा’ अशी मागणी केली आहे. महापालिकेकडे ३० गुंठे जागा उपलब्ध नसल्याने त्यास नकार दर्शविला आहे. त्यानंतरही जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाच्या अपर मुख्य सचिवांना पत्र लिहून परवानगी मागितली आहे. या ठिकाणी काम सुरू झाल्यानंतर हे काम पूर्ण होण्यास किमान दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

