सिग्नल यंत्रणेत सुधारणा
पुणे, ता. ८ ः पुणे महापालिकेने स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरातील १२५ चौकांत अॅडॅप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (एटीएमएस) या प्रणालीचा वापर करून सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली आहे. सुरुवातीच्या काळात या प्रणालीच्या अनेक तक्रारी होत्या, पण आता स्मार्ट सिटी, महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या समन्वयातून सुधारणा केल्या जात आहेत. सिग्नलची वेळ आणि वाहतूक कोंडी यांच्यात समन्वय साधला जात असल्याने एकापाठोपाठ एक सिग्नल मिळत असल्याने प्रत्येक सिग्नलला थांबण्याची वेळ येत नाही. शिवाय वाहतूक कोंडीही काही प्रमाणात कमी झाली आहे.
पुणे महापालिकेने २०२२ मध्ये शहरातील १२५ चौकांमध्ये ‘एटीएमएस’ प्रणालीचा वापर करून सिग्नल यंत्रणा अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये वाहतूक कोंडी कमी करणे, गर्दीनुसार सिग्नलची वेळ आपोआप कमी-जास्त होणे, सिग्नल किती सेकंदाचा आहे, हे वाहनचालकांना कळणे, नियंत्रण कक्षातून शहराला वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे यांसह अन्य कारणांसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरला होता. यामध्ये जवळपास १३३ कोटी रुपये हे ‘एटीएमएस’ प्रणालीनुसार सिग्नल बसविणे, त्याचे नेटवर्क तयार करणे यासाठी खर्च करण्यात आले, तर ५२ कोटी रुपयांचा खर्च हा देखभाल दुरुस्तीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये प्रत्येक चौकात सिग्नलसोबत कॅमेरेही बसविण्यात आल्याने वाहनांची नोंद होत आहे. या प्रणालीमुळे वाहतूक व्यवस्थेत काय बदल झाले? सुधारणा काय झाल्या, रोज सिग्नल किती सुरू असतात याचा अहवाल महापालिकेला देणे बंधनकारक आहे. त्यामुळे महापालिकेलाही वाहतूक नियोजनाचा अभ्यास करून सुधारणा करणे शक्य होते. सुरुवातीच्या काळात ही माहिती मिळत नसल्याने महापालिकेच्या विद्युत विभागाला स्मार्ट सिटीला पत्र पाठवून त्यासाठी पाठपुरावा करावा लागत होता.
‘एटीएमएस’च्या कार्यपद्धतीत महापालिका, पोलिसांचे आक्षेप असल्याने यासाठी अधिकाऱ्यांच्या अनेकदा बैठका झाल्या आहेत. तसेच सुधारणा करण्यात आल्या आहेत. महापालिकेने गेल्या वर्षी जवळपास ३० कोटी रुपयेही संबंधित ठेकेदाराला दिले आहेत. त्यानंतर अनेक ठिकाणच्या सिग्नल यंत्रणेत सुधारणा झाल्या आहेत. त्याचा फायदा थेट वाहनचालकांना मिळत आहेत.
असा होतो फायदा
उदा ः लक्ष्मी रस्त्यावरून दांडेकर पुलाकडे जाताना टिळक चौकातील सिग्नल सुटल्यानंतर शास्त्री रस्त्यावरील अन्य सिग्नलचे दिवे हिरवे झाल्याने प्रवासात फारसे अडथळे येत नाहीत. एकामागे एक सिग्नल सुटल्याचा फायदा वाहनचालकांना होतो. असाच काहीसा अनुभव अन्य रस्त्यांवर येतो. पण स्थानिक परिस्थिती किंवा अचानक वाहनांची संख्या वाढल्यास अडथळा येतो.
सुधारणा झाल्याचा फायदा
- प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सुमारे १५ टक्के कमी
- वाहनांच्या सरासरी वेगात १० टक्के वाढ
- जवळपास ७० टक्के वाहनांना न थांबता हिरवा सिग्नल मिळतो
- सिग्नलवर गाड्या थांबत नसल्याने प्रदूषण कमी होते, इंधनाची बचत
पावसाळ्यात नियोजन बिघडते
सिग्नल यंत्रणेत सुधारणा होत असल्या तरी पावसाळ्यामध्ये सिग्नलचे नियोजन काही प्रमाणात बिघडत आहे. पाऊस झाल्यानंतर रस्त्यावर चारचाकी संख्या वाढते, वाहनांचा वेग कमी होतो, त्यामुळे सिग्नलची वेळ कमी पडून अनेक वाहनांना हिरवा सिग्नल मिळत नाही. कोंडी वाढल्यानंतर वाहतूक पोलिसांना कसरत करावी लागते.
गुगल मॅपचा वापर व्हावा
‘एटीएमएस’ प्रणालीमध्ये चौकातील कॅमेरे त्यांच्या क्षमतेनुसार वाहतूक कोंडीचे विश्लेषण करून सिग्नलची वेळ कमी-जास्त होते. पण एटीएमएस प्रणालीमध्ये गुगल मॅपचा वापर केल्यास चौकाऐवजी संपूर्ण रस्त्यावरची काय स्थिती आहे हे लक्षात येईल व सिग्नलच्या वेळा बदल होऊ शकतो. हे तंत्रज्ञान अद्ययावत केल्यास आणखी चांगली सेवा पुणेकरांना मिळू शकेल, असे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.
‘एटीएमएस’च्या कामातील त्रुटीमुळे अनेक तक्रारी होत्या, त्याचा परिणाम शहरातील वाहतुकीवर होत होता. पण आता स्मार्ट सिटी, महापालिका व वाहतूक पोलिस या अधिकाऱ्यांनी समन्वयासाठी ग्रुप केला आहे. त्यावर तक्रार आली, की ती लगेच सोडविली जाते. त्यामुळे शहरातील वाहतूक सुधारणा झाल्याचे, सलग हिरवा सिग्नल मिळण्याचे प्रमाण वाढले आहे. ठेकेदाराचे बिलही देण्यात आल्याने त्यांच्या अडचणी कमी झाल्या आहेत. भविष्यात आणखी सुधारणा करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
- पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त, महापालिका
..............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.