‘आयसीएमआर’कडून मलेरियाविरोधी लस देशातील पहिली लस ः तंत्रज्ञान हस्तांतरासाठी कंपन्यांना आवाहन
पुणे, ता. ९ ः भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेली जैविक-वैद्यकीय संस्था ‘भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे’ने (आयसीएमआर) मलेरियाविरोधी ‘रिकॉम्बिनंट काइमेरिक मल्टी-स्टेज मलेरिया लस’(अॅडफॅल्सिवॅक्स) ही नवी लस विकसित केली आहे. मलेरिया परजीवीवर त्याच्या जीवनचक्रातील विविध टप्प्यांवर एकाच वेळी आघात करणारी व जनुकीय तंत्रज्ञान वापरून तयार केलेली प्रगत लस असून, या लसीचे उत्पादन करण्यासाठी इच्छुक कंपन्या व उत्पादकांना पुढे येण्याचे ‘आयसीएमआर’ने आवाहन केले आहे. त्यामुळे लवकरच भारताला मलेरियावरील लस मिळू शकणार आहे.
मलेरिया हा डासांमार्फत पसरणारा जीवघेणा आजार आहे. हा प्रामुख्याने ‘प्लॅझ्मोडियम फॅल्सिपरम’ आणि ‘प्लॅझ्मोडियम विवॅक्स’ या परजीवींमुळे होतो. संसर्गित अॅनाफिलीस डासांची मादी चावल्यावर हा आजार पसरतो. साधारणपणे डास चावल्यानंतर १० ते १५ दिवसांनी ताप, थंडी वाजणे, डोकेदुखी, अंगदुखी, मळमळ, उलट्या अशी लक्षणे दिसतात. गंभीर प्रकरणांमध्ये अशक्तपणा, श्वास घेण्यास त्रास, मेंदूवर परिणाम किंवा मृत्यूही होऊ शकतो.
मलेरियावर सध्या भारतात लस उपलब्ध नाही. दरवर्षी मलेरियाने देशात सरासरी २० लाख रुग्ण आढळतात व ७० ते ८० मृत्यू होतात. त्यावर लस आल्यास याचा प्रसार होणार नाही. खास करून महाराष्ट्रात गडचिरोली येथे या रुग्णांची संख्या जास्त आहे. ही लस उत्पादित करण्यासाठीचे तंत्रज्ञान हस्तांतरण करार करण्यास ‘आयसीएमआर’ इच्छुक असून, त्यासाठी उत्पादकांनी याबाबत संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये ही लस तयार करण्याची पद्धत, लागणारे घटक, उत्पादनाची पायरी-पायरीची माहिती, गुणवत्ता तपासणीचे नियम आणि उत्पादनासाठी लागणारा आराखडा हे सर्व संबंधित लस निर्मिती करणाऱ्या कंपनीला दिले जातील.
ही लस ‘आयसीएमआर’च्या भुवनेश्वर येथील प्रयोगशाळेत विकसित करण्यात आली आहे. सध्या या लसीची प्राथमिक चाचणी पूर्ण झाली असून, पुढील टप्प्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि विक्रीसाठी तंत्रज्ञान हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू केली गेली आहे. भारतामध्ये मलेरियाचे १९४७ पासून दरवर्षी सुमारे ७.५ कोटी रुग्ण आणि ८ लाख मृत्यू व्हायचे. परंतु, उपचारांच्या प्रगतीमुळे २०२३ मध्ये ही संख्या घटून सुमारे २० लाख रुग्ण आणि ८३ मृत्यू अशी आकडेवारी झाली आहे.
..............
राज्यातील मलेरियाची रुग्णसंख्या आणि मृत्यू
वर्ष – रुग्णसंख्या – मृत्यू
२०२० : १२,९०९ – १२
२०२१ : १९,३०३ – १४
२०२२ : १५,४५१ – २६
२०२३ : १६,१५९ – १९
२०२४ ः २१,०७८ – २४
२०२५ ः (जूनपर्यंत) – ००
..........
‘‘या लसीच्या प्राथमिक चाचण्या झाल्या असून, लसीचे उत्पादन झाल्यावर त्याच्या पुढील वैद्यकीय चाचण्या करता येतील व पुढे ती देशात व देशाबाहेरही वितरित करता येईल. परंतु यासाठी वेळ लागेल. लस उत्पादनाचा करार करण्याबाबत इच्छुक कंपन्या १७ ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतात.
– डॉ. सुशील सिंग, शास्त्रज्ञ, जैवसंशोधन व विकास विभाग, भुवनेश्वर
.................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.