निगराणी प्रयोगशाळा आता नव्या जागेत
पुणे, ता. १४ : आजारांची माहिती आधीच मिळावी व त्यानुसार उपाययोजना करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे बाणेर येथील नायडू रुग्णालयात अत्याधुनिक निगराणी प्रयोगशाळा (मेट्रोपोलिटन सर्व्हेलन्स युनिट) उभारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तीन वर्षे उलटूनही जागेच्या नियमांअभावी तेथे प्रयोगशाळा उभी राहू शकली नाही. तीच प्रयोगशाळा आता कसबा पेठ, कुंभारवाड्याजवळील महापालिकेच्या कै. तुकाराम जावळे भवन इमारतीमध्ये उभी राहणार आहे.
पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य सुविधा मिशनअंतर्गत कोरोना काळात अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यासाठी देशातील दहा महानगरांची निवड करण्यात आली. यामध्ये पुण्याला प्राधान्य देण्यात आले. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय रोग निवारण केंद्रने (एनसीडीसी) ही प्रयोगशाळा डॉ. नायडू रुग्णालयात स्थापन करण्याबाबतचे नियोजन केले होते. त्यासाठी बाणेर येथील डॉ. नायडू रुग्णालयातील सहाव्या मजल्यावरील पाच हजार चौरस फूट जागेची निवड करण्यात आली होती. प्रयोगशाळा उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. मात्र, डॉ. नायडू रुग्णालयात या प्रयोगशाळेसाठी जागा अपुरी पडते. त्याची पाहणी ‘एनसीडीसी’च्या पथकाने केल्यावर त्यांनी या प्रयोशाळेला आक्षेप घेतला व प्रयोगशाळा न उभारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आरोग्य विभागाने त्यांना महापालिकेच्या कसबा पेठेतील जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाच्या कै. तुकाराम जावळे भवन येथे ही प्रयोगशाळा उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून जून महिन्यात तज्ज्ञांच्या पदभरतीसाठी आणि त्यानंतर वैद्यकीय उपकरणांसाठी निधी येणार आहे.
प्रयोगशाळेचा उपयोग कसा होइल?
शहरातील रोगनियंत्रण यंत्रणा बळकट करणे, खासगी व शासकीय आरोग्य संस्थांशी संपर्क, आरोग्य व्यवस्थेचे आपत्कालीन व्यवस्थापन, माहितीचे विश्लेषण, आजारांचा मागोवा, पूर्वानुमान व इशारे तसेच नमुना संकलन करण्यात येईल. त्याचबरोबर जलजन्य, किटकजन्य व प्राणिजन्य आजारांवरील नमुने प्रयोगशाळा चाचण्या व तपासणी होईल.
कोणत्या तपासण्या होणार?
प्रयोगशाळेमध्ये कोरोनासह स्वाईन फ्लू, चिकुनगुनिया, डेंगी, झिका, मंकीपॉक्स, क्षयरोग यांसह विविध संसर्गजन्य आजारांच्या तपासणी केल्या जातील. त्यामुळे राष्ट्रीय विषाणू विज्ञान प्रयोगशाळेवरील (एनआयव्ही) ताणही कमी होईल. त्याचप्रमाणे जनुकीय क्रमनिर्धारणची (जिनोम सिक्वेन्सिंग) यंत्रणाही येथे उभारली जाणार आहे.
कोरोनाच्या धर्तीवर रोगकारक सूक्ष्मजीवांवर संशोधन करणारी ही प्रयोगशाळा असून त्याद्वारे शहरात कोणत्या प्रकारचे रुग्ण वाढत आहेत याचा शोध घेता येईल. शहराच्या एखाद्या भागात विशिष्ट आजारांचे रुग्ण वाढत आहेत का, त्याचे कारणे शोधून तातडीने उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारकडून नऊ कोटी ६२ लाखांचा निधीद्वारे ही प्रयोगशाळा जावळे भवन येथे उभी करण्यात येईल.
- डॉ. वैशाली जाधव, सहाय्यक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.