महापालिकेत सगळंच ‘नवल’
पुणे, ता. १३ ः पुणे महापालिकेचे मुख्य भवन असो की क्षेत्रीय कार्यालये या ठिकाणी कर्मचारी, अधिकाऱ्यांची हजेरी घेण्यासाठी बसविण्यात आलेल्या यंत्रणेची निविदा संपल्याने गेल्या तीन महिन्यांपासून ‘आओ जाओ, घर तुम्हारा’ अशी अवस्था झाली आहे. सकाळी अधिकारी, कर्मचारी उशिरा येतात, जागा पाहणीच्या नावाखाली दुपारनंतर महापालिकेतून गायब असतात. क्षेत्रीय कार्यालयात तर नागरिकांना कर्मचारी सापडत नसल्याने कामे खोळंबली आहेत. ही अशी विदारक स्थिती असताना वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत.
पुणे महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांच्या कामाची वेळ ही सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याने, अधिकाऱ्याने यावेळेत कामावर यावे असा नियम आहे. जर कामासाठी म्हणून बाहेर जाणार असाल तर त्याची माहिती वरिष्ठांना दिली पाहिजे, कार्यालयात त्याची नोंद करून ठेवली पाहिजे. तसेच कामाची वेळ संपल्यानंतर कार्यालयातून बाहेर पडले पाहिजे. महापालिकेत कर्मचारी, अधिकारी यांची रोजची हजेरी घेण्यासाठी पूर्वी प्रत्येक विभागात वही होती, पण तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाल्यानंतर बायोमेट्रिक हजेरी घेण्यास सुरुवात झाली. त्यानंतर त्यात आणखी अद्ययावत यंत्रणा वापरून ‘आधार’ला ही प्रणाली जोडण्यात आली.
अशी आहे स्थिती
१) पुणे महापालिकेच्या विद्युत विभागाने नॅशनल इनफॉर्मेशन सेंटरसोबत (एनआयसी) करार करून ‘आधार’ला जोडलेली हजेरीची यंत्रणा महापालिका, क्षेत्रीय कार्यालय, सावरकर भवन अन्य कार्यालयाच्या ठिकाणी लावली होती
२) नंतर चेहरा स्कॅनकरून (फेस रीडिंग) हजेरी लावण्याची पद्धत गेले काही वर्षे सुरू होती
३) जून महिन्यात ‘एनआयसी’ने अचानक त्यांची सिस्टीम अपडेट केली, त्यामुळे महापालिकेच्या १०० मशिन कालबाह्य झाल्या
४) मशिन अपडेट करून देण्यासाठी वेळ लागणार असल्याने महापालिकेने मुदतवाढीसाठी वेळ मागितली, पण त्यास नकार देण्यात आला
५) त्यामुळे विद्युत विभागाने ‘जेम’ पोर्टलवरून नवीन निविदा काढताना त्यात पाच वर्षांसाठी देखभाल दुरुस्तीची निविदा काढली, पण ती त्यावर स्वीकारण्यात आली नाही
६) या सर्व प्रशासकीय प्रक्रियेत अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही
७) दोन महिन्यांपूर्वी उशिरा येणाऱ्या सुमारे ८०० जणांवर कारवाई केली होती, पण त्यानंतरही सुधारणा झालेली नाही
साडेदहानंतर कामाला सुरुवात
सकाळी ९.४५ ही कामावर येण्याची वेळ असली तरी महापालिका भवनात सकाळी १०.३० नंतरच कार्यालयात काम सुरू होते. बहुतांश कर्मचारी हे १० ते १.१५ च्या दरम्यान येतात. आल्यानंतर काही जण चहा घेण्यासाठी खाली जातात. काही जण इकडे-तिकडे गप्पा मारल्यानंतर कामाला सुरुवात करतात. तसेच विभाग प्रमुख वेळेत आले तर कर्मचारी व अन्य अधिकारी जागेवर बसून राहतात अशी अवस्था आहे.
विभागांमध्ये समन्वय नाही
कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रणेत विद्युत विभाग, सामान्य प्रशासन विभाग आणि आयटी विभाग यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. विद्युत विभागाकडून निविदा काढल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगाराची खाते, त्यासोबत जोडणे आवश्यक होते. पण हे काम या तिन्ही विभागांनी आत्तापर्यंत केले नाही. त्यामुळे हजेरी लागली, उशीर झाला तरी पूर्ण पगार बेशिस्त कर्मचाऱ्यांना मिळत होता. तसेच हजेरीची पद्धत कडक होऊ नये यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची लॉबी कार्यरत आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये योग्य अंमलबजावणी
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांची हजेरी आणि पगाराचे खाते एकमेकांशी लिंक आहेत. गेल्या चार वर्षांपासून तेथे या पद्धतीने काम सुरू असल्याने बऱ्यापैकी शिस्तीत काम सुरू आहे. पण पिंपरी-चिंचवडप्रमाणे पारदर्शकपणे काम पुणे महापालिकेत पार पडले नाही. शहरात शेकडोंच्या संख्येने आयटी कंपन्या आहेत, तज्ज्ञ
असले तरी पुणे महापालिकेला त्याचा
वापर शहराच्या भल्यासाठी करता आलेला नाही हे यानिमित्ताने स्पष्ट होते.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियंत्रणच नाही
पुणे महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्त. प्रत्येकाकडे विविध विभाग वाटून दिले आहेत. यामध्ये कर्मचारी, अधिकारी आले आहेत की नाही, वेळेवर येणारे किती कर्मचारी आहेत? उशीर का होत आहे यावरही नियंत्रण आवश्यक आहे. या अधिकाऱ्यांनी अचानक एखाद्या विभागाला भेट देऊन कामकाज कसे सुरू आहे याची पाहणी करणे आवश्यक आहे. पण या पद्धतीने कामकाज होत नाही. हे अधिकार केवळ स्वतःचे कार्यालय, आयुक्त कार्यालय किंवा बैठकीच्या खोलीत जातात. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वचक प्रशासनावर नाही.
प्रत्यक्ष पाहणीतून पोलखोल
सकाळी ९.३० - ‘साम’ टीव्हीची प्रतिनिधी पुणे महापालिकेत दाखल
सकाळी ९.४५ - कर्मचारी महापालिकेत दाखल होण्यास सुरुवात
सकाळी १०.०० - महापालिकेतील बहुतांश कार्यालयात शुकशुकाट
सकाळी १०.१५ - बहुतांश सर्व विभाग प्रमुखांच्या कार्यालयातील लाइट, एसी सुरू पण विभाग प्रमुख महापालिकेच्या बाहेर
सकाळी १०.३० - मोजके विभागप्रमुख कार्यालयात दाखल
सकाळी १०.४५ - काही अधिकारी आले, काहींनी काम सुरू केले
पुणे महापालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळेत येणे अनिवार्य आहे. आज उशिरा आलेल्या सर्व विभागप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे. जर योग्य उत्तर दिले नही तर त्यांच्यावर उशिरा आल्याने कारवाई केली जाईल. तसेच रोजची हजेरी घेण्यासाठी अद्ययावत यंत्रणा लवकरात लवकर सुरू केली जाईल.
- नवलकिशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.