भारतीय लांडगा ‘असुरक्षित’
‘आययूसीएन’च्या लाल यादीत समावेश ः राज्यात फक्त ४०० शिल्लक
भारतात फक्त ३ हजार लांडगे; महाराष्ट्रात अंदाजे ४०० उरले

भारतीय लांडगा ‘असुरक्षित’ ‘आययूसीएन’च्या लाल यादीत समावेश ः राज्यात फक्त ४०० शिल्लक भारतात फक्त ३ हजार लांडगे; महाराष्ट्रात अंदाजे ४०० उरले

Published on

पुणे, ता. १३ : भारतात मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या भारतीय लांडग्याला आता ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर’च्या (आययूसीएन) लाल यादीत ‘व्हल्नरेबल’ म्हणजेच ‘असुरक्षित’ श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. लांडग्यांच्या अस्तित्वाची ही गंभीर स्थिती पहिल्यांदाच जागतिक स्तरावर औपचारिकपणे नोंदवण्यात आली आहे.
भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. बिलाल हबीब आणि डॉ. शाहीर खान यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संशोधनातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतात सुमारे तीन हजार तर, पाकिस्तानसह मिळून केवळ ३,३१० लांडगे उरले आहेत. विशेष म्हणजे, महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान हे त्यांचे प्रमुख अधिवास असले तरी, महाराष्ट्रात त्यांची संख्या केवळ ४०० इतकीच उरल्याचा अंदाज आहे.
राज्यातील ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य परिसरात २००७ ते २०२३ दरम्यान लांडग्यांची संख्या तब्बल ४१ टक्क्यांनी घटली आहे. शहरीकरण, शेती विस्तार आणि गवताळ प्रदेशांचा नाश यामुळे लांडगे मानव-वन्यजीव संघर्षाच्या कचाट्यात सापडत आहेत. सासवड परिसरातील अभ्यासात लांडगा-कुत्रा संकरित प्रजातींची उपस्थिती आढळली असून, त्यामुळे त्यांच्या शुद्ध वंशावर आणि आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
याविषयी ग्रासलॅण्ड ट्रस्टचे संस्थापक मिहीर गोडबोले म्हणाले, ‘‘महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरातमध्ये लांडग्यांची संख्या मोठी आहे, तर आंध्रप्रदेश आणि उत्तर कर्नाटकातही काही प्रमाणात लांडगे आढळतात. मध्य महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर परिसरात सुमारे १४ प्रजनन स्थळे ओळखली गेली आहेत. त्यामुळे ही क्षेत्रे संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. पुणे जिल्हा हा या प्राण्यांच्या अधिवासाचा केंद्रबिंदू आहे. लांडग्यांची सुमारे ७० ते ८० टक्के संख्या राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यांच्या बाहेर आहेत. त्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र संवर्धन धोरणाची गरज आहे. ज्या भागांमध्ये लांडगे आढळतात, त्या भागात इको-टुरिझम निर्माण करून संवर्धनाचे काम स्थानिक लोकांच्या माध्यमातून करणे आवश्यक आहे. या प्राण्याची संख्या अधिक असलेला प्रदेश हा बहुतेकरुन सपाटीचा असल्याने तेथील विकास कामांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. अन्यतः येणाऱ्या पाच ते दहा वर्षात हा प्राणी नष्ट होण्याची शक्यता आहे.’’
-------------------
‘‘भारतीय लांडग्यांच्या संवर्धनाच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. यापूर्वी भारतीय लांडग्यांना ‘लिस्ट कन्सर्न’ श्रेणीत स्थान देण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी आवश्यक आर्थिक मदतीत अडथळे निर्माण होत होते. मात्र, आता भारतीय लांडग्यांना स्वतंत्रपणे ‘रेड लिस्ट’मध्ये स्थान मिळाल्याने त्यांच्या अस्तित्वाची गंभीर स्थिती जगासमोर आली आहे.’’
- मिहीर गोडबोले, संस्थापक, ग्रासलॅण्ड ट्रस्ट
---------------------
‘‘भारतीय लांडग्याचे अस्तित्व हे राज्यातील गवताळ परिसंस्थांवर अवलंबून आहे. पुणे, सासवड आणि मराठवाडा परिसरातील गवताळ प्रदेशांचे पुनरुज्जीवन, स्थानिक लोकांचा सहभाग आणि प्रभावी संरक्षणात्मक उपाययोजना राबविणे अत्यावश्यक आहे. अधिवास टिकवणे, स्थानिक समुदायांचा सहभाग आणि प्रभावी कायदे या त्रिसूत्रीवरच या प्रजातीचे भविष्य अवलंबून आहे.’’
- डॉ. अपर्णा कलावटे, शास्त्रज्ञ, भारतीय प्राणी सर्वेक्षण, पुणे
--------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com