उपचार न करताच डिस्चार्जची घाई बिबवेवाडीतील कामगार विमा रुग्णालयात रूग्णाची हेळसांड
पुणे, ता. १३ : ‘‘आई थोडी चालली तरी तिला दम लागतोय व छातीत वेदना होतात. खासगी हृदयरोगतज्ज्ञाला दाखविल्यावर त्याने हृदयाचा त्रास असल्याचे सांगून ॲंजिओग्राफी करायला सांगितले. पैसे नसल्याने बिबवेवाडीतील कामगार विमा रुग्णालयात घेऊन आलो. येथे चार दिवसांपासून विना तपासण्या भरती करून ठेवलंय. त्रासही कमी होत नाही अन उपचारही होत नाही. तक्रार केल्यावर डॉक्टर म्हणतात, ‘घरी जा’. घरी गेल्यावर आईला काही झाल्यास रुग्णालय जबाबदारी घेणार का?’’ महापालिकेतील कंत्राटी सफाईसेवेचे काम करणारे संदीप केदारे हा प्रश्न विचारत होते.
केंद्रीय आरोग्य विभागाच्या अखत्यारित असलेल्या बिबवेवाडीतील कामगार विमा रुग्णालयातील रुग्णांची हेळसांड होणारे केदारे हे एकच नव्हे तर अशी शेकडो उदाहरणे आहेत. कामगारांच्या कष्टाची दर महिन्याची ठराविक विमा रक्कम तर कपात होते पण त्याबदल्यात त्यांना किमान दर्जाच्या आरोग्य सुविधाही मिळत तर नाहीच, वाट्याला येतो तो मनस्ताप. तक्रार केली तर ससून रुग्णालयाचा रस्ता धरायला सांगितले जाते. तेथेही पुढे तीच हेळसांड वाट्याला येते.
वास्तविक पाहता जे उपचार या रुग्णालयात होत नाहीत, त्यासाठी रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संलग्न असलेल्या खासगी रुग्णालयाचे पत्र देणे अपेक्षित असते. ते पत्र दिल्यास योजनेतून मोफत उपचार होतात. मात्र, त्याऐवजी एकतर घरी जायला सांगितले जाते किंवा ससूनमध्ये पाठवले जाते.
राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत (इएसआयसी) बिबवेवाडी येथील या रुग्णालयात खाटांची संख्या १२० आहे. परंतु, सुविधा मात्र गोळ्या औषधांच्या व्यतिरिक्त फार काही मिळत नाहीत. दुसऱ्या रुग्णाचे नातेवाईक सूरज कांबळे म्हणाले, ‘‘माझ्या वडिलांचे दोन्ही मूत्रपिंड निकामी झाले आहेत. त्यांना सतत उलट्या व्हायच्या. उपचारासाठी येथे भरती केले. डायलिसिस करण्याऐवजी गोळ्या देण्याच्या पलीकडे उपचार होत नाहीत. पाच दिवसांनी डिस्चार्ज दिला. मी महापालिकेत कंत्राटी चालक आहे. १४ हजाराच्या पगारात उपचार कोठे करू, हा प्रश्न पडला आहे.’’
क्षयरोगाचा रुग्ण जनरल वॉर्डमध्ये
क्षयरोग झालेल्या रुग्णाला इतर रुग्णांपासून दूर असलेल्या स्वतंत्र कक्षात भरती करण्याऐवजी त्यांना इतर रुग्णांच्यासोबत भरती केले असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. त्यामुळे, इतर रुग्णांनाही क्षयरोग होईल, याबाबतही रुग्णालयाला काळजी नाही. अखेर नातेवाईक त्यांना खासगी रुग्णालयात घेऊन गेले.
याबाबत रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभिमन्यू पांडा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
...............
‘‘रुग्णांवर उपचार करायला हे रुग्णालय सक्षम नाही. येथे तज्ज्ञ डॉक्टरही नाहीत. अशावेळी उच्च उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना शहरातील संलग्न असलेल्या खासगी रुग्णालयात त्यांना ‘पी–वन’ फॉर्म भरून व संदर्भ देऊन पाठवणे गरजेचे असते. तर त्यांच्यावर खासगीत मोफत उपचार होतात. मात्र, त्याऐवजी येथील डॉक्टर केवळ भरती करून घेतात. रुग्ण गंभीर झाला किंवा नातेवाइकांनी तक्रार केली तर मग खासगीमध्ये न पाठवता, ससूनला जायला तोंडी सांगतात. त्यामुळे गेल्या दोन महिन्यात येथे ३० ते ३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याबाबत केंद्रीय मंत्रालयाला तक्रारीचा मेल केला आहे.
– शरद भाकरे, अध्यक्ष, कामगार हितरक्षक संघ, महाराष्ट्र
फोटो ः 59794
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.