नागरिक बनले वाहतूक पोलिसांचे सहकारी

नागरिक बनले वाहतूक पोलिसांचे सहकारी

Published on

अनिल सावळे : सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. १५ : शहरात वाहतुकीच्या शिस्तीचे नियम पाळण्याऐवजी वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणावर नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. नागरिकांनी पुणे पोलिसांच्या पुणे ट्रॅफिक (पीटीपी) ॲपद्वारे १३ जून ते १२ ऑक्टोबर या पाच महिन्यांच्या कालावधीत तब्बल ७२ हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली. त्यामध्ये सर्वाधिक ‘विरुद्ध दिशेने वाहन चालवणे’ आणि ‘पदपथावर पार्किंग’ करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात वाढत्या अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी नागरिकांसाठी ‘पुणे ट्रॅफिक ॲप’ उपलब्ध करून दिले आहे. या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकाचे छायाचित्र काढून ते ॲपवर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या चार महिन्यांत नागरिकांकडून ‘पीटीपी’ ॲपवर एकूण ७२ हजार २६५ जणांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याची नोंद झाली. यापैकी ५२ हजार ९९३ प्रकरणांमध्ये दंडात्मक कारवाई करण्यात आली. १८ हजार ४७८ प्रकरणे नाकारण्यात आली आहेत. तर काही प्रकरणे प्रक्रियेत आहेत.

सर्वाधिक नियमाचे उल्लंघन
१) विरुद्ध दिशेने वाहन चालवणे ः विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या चालकांमुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत. वाहतूक शाखेच्या ‘पीटीपी’ ॲपच्या माध्यमातून नागरिकांनी सर्वाधिक म्हणजे विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या १७ हजार २३३ चालकांची छायाचित्रे काढून ॲपवर नोंदवली. त्यापैकी १२ हजार ३८९ चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

२) पदपथावर वाहन पार्किंग, कॉर्नर पार्किंग ः पदपथावर वाहने पार्किंग करण्याचे प्रमाण अधिक असून, १७ हजार ७४२ प्रकरणे ‘पीटीपी’ ॲपवर नोंदवली गेली. त्यापैकी १३ हजार २५ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पदपथावर वाहनांच्या पार्किंगमुळे पादचाऱ्यांसाठी असलेला मार्गच अडवण्यात येत असल्याचे या कारवाईतून दिसून येत आहे. ‘कॉर्नर पार्किंग’मुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होत असून, अशा स्वरूपाची १२ हजार ९१५ प्रकरणे समोर आली. त्यापैकी ९ हजार ४९२ चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

ॲपवर नोंदवलेली प्रकरणे
- डबल पार्किंग - ६,६२६
- फॅन्सी नंबर प्लेट - ६,०२७
- ट्रिपल सीट - ४,३८०
- मोबाईलवर बोलत वाहन चालवणे - २,३१६
- टिंटेड ग्लास वापरणे - २,०९६
- पदपथावरून वाहन चालवणे - १,८८१
- रेड झोनमध्ये अवजड वाहन - १,०४९

कोणी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास नागरिकांना ‘पीटीपी’ ॲपवर छायाचित्र काढून माहिती पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. या ॲपच्या माध्यमातून नागरिकांनाच एकप्रकारे कारवाईचा अधिकार मिळाला आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, पदपथावर पार्किंग आणि वाहन चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्या चालकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.
- हिंमत जाधव, पोलिस उपायुक्त, पुणे शहर वाहतूक शाखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com