पारपत्र तपासणीच्या प्रक्रिया आणखी कडक पोलिसांचे धोरण ः अपूर्ण कागदपत्रे असल्यास अर्ज नाकारणार
पुणे, ता. १५ : बनावट कागदपत्राद्वारे पारपत्र मिळवत कुख्यात गुंड परदेशात पळून गेल्यानंतर पोलिस विभागाने पारपत्रासाठी कागदपत्रांच्या तपासणी प्रक्रियेत अधिक काटेकोरपणा आणला आहे. कागदपत्रांतील किरकोळ त्रुटी दुर्लक्षित केल्या जात असल्याचे काही प्रकार घडले आहेत. मात्र, आता प्रत्येक तपशील अचूक व संपूर्ण असणे आवश्यक केले आहे. अर्जदाराकडून निवासाचा पुरावा, ओळखपत्र, शैक्षणिक व रोजगारासंबंधी कागदपत्रांची पूर्ण पूर्तता न केल्यास अर्ज थेट नाकारला जात आहे.
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे पारपत्र मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. असे प्रकार टाळण्यासाठी चौकशी अधिक कठोर करण्यात आली आहे. यापूर्वी काही ठिकाणी संपर्क किंवा गैरमार्गातून प्रक्रिया सोपी केली जात असल्याची चर्चा होती. मात्र आता हे प्रकार लक्षणीयरीत्या थंडावले आहेत. प्रत्येक अर्जाचे स्वतंत्र रेकॉर्डिंग, तपासणी अधिकारी व वरिष्ठांचा दुहेरी अहवाल आणि डिजिटल छायाचित्र पडताळणी अशी प्रणाली लागू करण्यात आली आहे. अर्जदाराने दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष भेट घेऊन चौकशी केली जात आहे. अर्जदार त्या ठिकाणी प्रत्यक्ष वास्तव्यास आहे का, शेजारी व स्थानिक पोलिस ठाण्याचे रेकॉर्ड त्याच्याशी जुळतात का, याची सविस्तर खात्री केली जाते. अनेक वेळा अर्जदार अनुपस्थित असल्याने अर्ज नाकारला जात आहे.
अन्यथा कायदेशीर कारवाई
पारपत्र हे एक महत्त्वाचे ओळखपत्र आहे. त्यामुळे त्याची पडताळणी ही केवळ औपचारिकता नसून सुरक्षा विषयक जबाबदारी आहे. नागरिकांनी अचूक माहिती द्यावी आणि खोटी कागदपत्रे सादर करू नयेत, अन्यथा त्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. अर्जदाराने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी नमूद केले.
अशी असते तपासणीची प्रक्रिया ः
पारपत्रासाठी अर्ज आल्यानंतर स्थानिक पोलिस ठाण्यात अर्जाची प्रत येते. तपास अधिकारी अर्जदाराच्या पत्त्यावर प्रत्यक्ष भेट देतो. तो अर्जदाराची उपस्थिती, ओळखपत्र, शेजाऱ्यांची साक्ष आणि पूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड तपासतो. आवश्यकतेनुसार भाडेकरू किंवा घरमालकाची खात्री केली जाते. तपास पूर्ण झाल्यानंतर अधिकारी अहवाल तयार करून वरिष्ठांना सादर करतो. हा अहवाल सकारात्मक असल्यास पारपत्र कार्यालयाला माहिती पाठवली जाते, अन्यथा अर्ज फेटाळला जातो. संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाइन ट्रॅकिंग प्रणालीत समाविष्ट आहे.
‘‘पारपत्राचा अर्ज तपासणीला आल्यानंतर त्यातील कागदपत्रांची अगदी बारकाईने तपासणी केली जात आहे. प्रक्रिया आणि कागदपत्रांत कोणतीही त्रुटी राहू नयेत, अशा सूचना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. त्यानुसार काटेकोरपणे कामकाज करण्यात येत आहे.
-संदीप भाजीभाकरे, पोलिस उपायुक्त विशेष शाखा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.