सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ

सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ

Published on

पुणे, ता. १५ : दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा आणि बसस्थानके गजबजलेली असताना चोरटे संधी साधून दागिने लांबवत आहेत. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि बसमधील प्रवासी हे चोरट्यांचे सोपे लक्ष्य ठरत आहेत. बाणेर, बालेवाडी, शिवाजीनगर आणि अलंकार परिसरात सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या. पोलिसांनी अशा चोरट्यांना आवर घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

बाणेरमध्ये सोनसाखळी लांबविली
बाणेर परिसरात ‘आम्ही पोलिस आहोत’ अशी बतावणी करून दोन चोरट्यांनी एका ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची दोन लाख ९० हजार रुपयांची सोनसाखळी लांबवली. मंगळवारी (ता. १४) सकाळी फिरायला गेलेल्या ज्येष्ठाला पॅनकार्ड क्लब रस्त्यावर चोरट्यांनी अडवले. परिसरात चोरी वाढल्याचे सांगून पोलिस असल्याचा बनाव केला. त्यानंतर बोलण्यात गुंतवून सोनसाखळी काढून कागदात गुंडाळून ठेवण्याचा बहाणा करत ती लांबवली आणि चोरटे दुचाकीवरून पसार झाले. घटनेनंतर बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

बालेवाडीत मंगळसूत्र हिसकावले
म्हाळुंगे बालेवाडीतील यशोदा चौकाजवळ मंगळवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास चोरट्यांनी एका ३१ वर्षीय महिलेचे ९० हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावले. महिला दुचाकीवरून जात असताना चोरट्यांनी पाठलाग करून त्यांची दुचाकी अडवली. त्यानंतर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार झाले. याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. तपास सहाय्यक निरीक्षक कैलास दाबेराव करीत आहेत.

शिवाजीनगरमध्ये तरुणाला लुटले
शिवाजीनगरमधील मंगला टॉकीजसमोर १४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दोन चोरट्यांनी एका तरुणाची ४० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावली. तरुण दुचाकीवरून जात असताना चोरट्यांनी त्याला अडवले आणि गळ्यातील साखळी हिसकावून नेली. याबाबत पिंपळे गुरव येथील २९ वर्षीय तरुणाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अजित बडे करीत आहेत.

‘पीएमपी’मध्ये दागिने लंपास
धायरीतील एका ६५ वर्षीय ज्येष्ठ महिलेची ५० हजार रुपयांची सोन्याची बांगडी पीएमपी बसमधून लंपास झाली. ही घटना डीएसके विश्‍व-पौड फाटा ते कोथरूड मार्गावरील बस प्रवासादरम्यान घडली. याप्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून, पोलिस तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com