खासगी बसचालकांची मनमानी

खासगी बसचालकांची मनमानी

Published on

पुणे, ता. १५ ः सणासुदीच्या तोंडावर पुणेकरांचा गावी जाण्याचा मार्ग खासगी बसचालकांनी केलेल्या दरवाढीमुळे खडतर झाला आहे. रेल्वे आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी महामंडळ) विशेष गाड्यांचे आरक्षण संपल्याने, शहरातून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. मागणी वाढताच, खासगी ‘ट्रॅव्हल्स’च्या तिकिटांच्या दरात तीन ते चारपट वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे.
प्रमुख मार्गांवरील भाडे गगनाला भिडले आहेत. उदाहरणार्थ, पुणे ते नागपूर या मार्गावर एरवी साधारण एक हजार ५०० रुपये असलेले खासगी प्रवासी भाडे वाढून आता थेट तीन हजार ५०० रुपये झाले आहे. त्याचप्रमाणे, पुणे ते अकोला जाण्यासाठी प्रवाशांना आता एक हजार रुपयांऐवजी दोन हजार ५०० रुपये मोजावे लागत आहेत. परराज्यातील खासगी प्रवासी भांड्यांच्याही दरात वाढ झाली आहे. अहमदाबादसाठी प्रवास भाडे आता दोन हजार ८०० रुपये झाले आहे. तर इंदूसाठी तब्बल चार हजार रुपयांपर्यंत दर पोहोचले आहेत. याशिवाय, कोल्हापूर, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांसाठीही प्रवासी भाडे सरासरी एक हजार २०० रुपयांच्या घरात गेले आहे.
सणासुदीच्या दिवसांत शहरातून गावी जाणाऱ्यांची गर्दी असली तरी, परतीच्या प्रवासात बसला अतिशय अल्प प्रतिसाद मिळतो. परतीचा प्रवास तोट्यात जात असल्याने नाइलाजाने भाडेवाढ करावी लागत असल्याचे काही खासगी बस व्यावसायिकांनी सांगितले. तसेच, ऑल इंडिया परमीट ही नवीन नियमावली लागू झाल्याने आणि व्यवसायात आलेल्या बहुराष्ट्रीय ऑनलाइन कंपन्यांमुळे जास्त दराने तिकीट विक्री केली जात आहे. एसटी महामंडळाच्या दरांच्या तुलनेत खासगी प्रवास भाडे तीन ते चार पटीने वाढल्याने प्रवासी हवालदिल झाले आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी आणि प्रवाशांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने तातडीने पाऊल उचलावीत, अशी प्रवाशांची मागणी आहे.

दिवाळीच्या दिवसांमध्येच प्रवाशांचा जोर असतो. पण उर्वरित महिनाभर प्रवाशांचा फारसा प्रतिसाद नसतो. अनेकदा बस ग्रामीण भागातून रिकाम्याच धावत असल्याने ही दरवाढ करावी लागते. काही बहुराष्ट्रीय व इतर राज्यातील कंपन्यांकडून ही दरवाढ केली जाते. राज्यातले खासगी वाहतूकदार मात्र राज्य सरकारने दिलेल्या नियमावलीचा पालन करून दरवाढ करतात.
- बाबा शिंदे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटना

सणासुदीच्या काळात गावी जाणे ही प्रत्येकाची गरज असते, पण एवढ्या दरवाढीने प्रवास करणे परवडत नाही. खासगी बसवाल्यांनी मनमानी सुरू केली आहे. प्रशासनाने यावर लक्ष केंद्रित करत प्रवाशांना न्याय द्यावा.
- साधना सावंत, प्रवासी

रेल्वे आणि एसटीचे आरक्षण मिळत नाही, म्हणून खासगी बस हा एकमेव पर्याय उरतो. पण आता त्याचे भाडे एवढे वाढले आहे की कुटुंबासोबत गावी जाणेही कठीण झाले आहे. प्रवाशांना काही पर्याय नसल्याने त्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला जात आहे.
- संदीप जाधव, प्रवासी

रेल्वेही फुल्ल
एसटी, खासगी बस यासह रेल्वेचे आरक्षणदेखील फूल झाले आहे. पुण्याहून उत्तर भारतात दिल्ली, राजस्थान, गुजराथ, तसेच पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, हैदराबादला धावणाऱ्या रेल्वेचे आरक्षण संपले आहे. त्याचबरोबर पुण्याहून कोल्हापूर, मुंबई, सोलापूर, यासह विदर्भात जाणाऱ्या रेल्वेदेखील फूल झाल्या आहेत.

मार्ग एसटीचे दर (रुपये) एरवीचे खासगी बसचे दर (रुपये) दिवाळीमुळे दरवाढ (रुपये)
पुणे ते नागपूर १,२०० १,५०० ३,५००
पुणे ते अकोला ९०० १,१५० २,५००
पुणे ते कोल्हापूर ४५० ६५० १,२००
पुणे ते सोलापूर ४०० ५५० १,२००

पुणे ते गोवा (पणजी) १,००० १,३०० ३,०००
पुणे ते छत्रपती संभाजीनगर ६५० ८०० १,२००
पुणे ते अमरावती ९०० १५०० ३०००

वरील दर हे सर्वसाधारण असून वाहनाच्या प्रकारानुसार ते बदलतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com