धूम्रपानामुळे मणका होतोय खिळखिळा!
विषारी घटकांचा परिणाम ः पन्नाशीच्या आतच वाढतेय पाठदुखीचे प्रमाण

धूम्रपानामुळे मणका होतोय खिळखिळा! विषारी घटकांचा परिणाम ः पन्नाशीच्या आतच वाढतेय पाठदुखीचे प्रमाण

Published on

पुणे, ता. १५ : धूम्रपानाचा फुप्फुसांवर होणारा घातक परिणाम सर्वश्रुत आहेच; मात्र त्याचबरोबर त्याचा थेट दुष्परिणाम पाठीच्या मण्याक्यावरदेखील होत असल्याचे वैद्यकीय संशोधनाअंती स्पष्ट झाले आहे. धूम्रपानातील निकोटिन आणि इतर विषारी घटकांमुळे मणक्याच्या चकत्यांमध्ये दोष निर्माण होतात. त्यामुळे मणक्याच्या रचनेत बदल होऊन, पाठदुखी आणि त्याचे विकार वाढतात, असा इशारा मणकाविकारतज्ज्ञ डॉ. अमोल रेगे यांनी दिला.
आज अनेक रुग्ण वयाच्या ३० ते ५०च्या आत मणक्याच्या गंभीर विकारांच्या उपचारांसाठी येतात. पूर्वी असे विकार सहसा वयाच्या साठीनंतर दिसत असत, पण आता पन्नाशीच्या आतच पाठदुखीचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे दिसते. यामागे आधुनिक जीवनशैलीतील अनेक चुकीच्या सवयी कारणीभूत आहेत. दीर्घकाळ बसून काम करणे, व्यायामाचा अभाव, चुकीच्‍या पद्धतीची झोप आणि वाढती स्थूलता या सर्वांचा एकत्रित परिणाम मणक्याच्या आरोग्यावर होत आहे, असेही मणका विकार तज्‍ज्ञ सांगतात.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील मणकाविकारतज्ज्ञ डॉ. अमोल रेगे म्‍हणाले, ‘‘धूम्रपानातील विषारी घटक रक्तात मिसळतात. हे विषारी घटक रक्तप्रवाहातून हाडे आणि मणक्याच्या चकत्यांपर्यंत पोचतात. त्यातून तेथील पेशींची मोठी हानी होते. त्याचा थेट परिणाम मणक्याच्या आरोग्यावर होऊ लागतो. तसेच, मणक्याची मजबुती कमी होते, त्यातून तीव्र पाठदुखी किंवा नसांवर ताण येतो. धूम्रपानामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. मणक्याचे आरोग्य जपायचे असेल, तर धूम्रपानाचा त्याग, नियमित व्यायाम आणि संतुलित वजन हे तीन घटक अंगीकारणे आवश्यक आहे. आपला कणा मजबूत राहिला, तरच आयुष्याची उभारी टिकते.’’

मणक्याच्या शस्त्रक्रिया सुरक्षित
आधुनिक वैद्यकशास्त्रात मणक्यावरील आजारांच्या उपचारपद्धतींमध्ये सातत्याने प्रगती होत असून, ‘युनिलॅटरल बायपोर्टल एंडोस्कोपिक’ (युबीई) हे अत्याधुनिक तंत्रज्ञान या क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. ‘यूबीई’ ही तंत्रप्रणाली म्हणजे सूक्ष्म छेदातून केली जाणारी एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया आहे. या प्रक्रियेत दोन लहान छिद्रांमधून कॅमेरा आणि विशेष साधनांच्या साहाय्याने मणक्यावरील अडथळा किंवा चकत्यांवरील दाब कमी केला जातो. या तंत्रज्ञानामुळे मणक्यावरील शस्त्रक्रिया आता अधिक सोप्या, सुरक्षित आणि वेदनारहित झाल्या आहेत. या पद्धतीत मोठ्या छेदाची गरज नसल्यामुळे रक्तस्राव कमी होतो, वेदना कमी जाणवतात आणि रुग्ण लवकर बरा होतो, रुग्णालयात कमी वेळ राहावे लागते आणि रुग्ण दैनंदिन कामे लवकर करू शकतो, बहुतांश रुग्ण दुसऱ्याच दिवशी चालू शकतात आणि घरी जाऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com