पुण्यात संस्कृती आणि तंत्रज्ञानाचा संगम ‘सिम्बायोसिस’च्या पदवीदान समारंभात राजनाथ सिंह यांचे गौरवोद्गार
पुणे, ता. १६ : ‘‘महाराष्ट्र हे ‘देशाची सांस्कृतिक राजधानी’ म्हणून ओळखले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यापासून ते लोकमान्य टिळकांच्या पूर्ण स्वराज्याच्या प्रवासाचा साक्षीदार असलेल्या या राज्यात पुणे शहर हे सांस्कृतिक चेतना, शिक्षण आणि राष्ट्रवादाचे प्रमुख केंद्र राहिले आहे. पुणे हे संरक्षण क्षेत्रातील आस्थापनांसाठीही प्रसिद्ध आहे. हे शहर जितके सांस्कृतिक आणि परंपरांनी समृद्ध आहे, तितकेच आधुनिक तंत्रज्ञानातही आघाडीवर आहे. त्यामुळे पुणे हे ‘संस्कृती आणि तंत्रज्ञानाचा संगम’ आहे, असे म्हणता येईल,’’ असे गौरवोद्गार संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी केले.
‘सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी’च्या सहाव्या पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राजनाथसिंह बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, प्र-कुलगुरू डॉ. स्वाती मुजुमदार, संजीवनी मुजुमदार, सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या प्र-कुलगुरू डॉ. विद्या येरवडेकर आदी उपस्थित होते. यावेळी ‘स्कूल ऑफ डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजी’चे उद्घाटन करण्यात आले.
राजनाथसिंह म्हणाले, ‘‘आज जग वेगाने बदलत असून, प्रत्येक क्षणाला नवा विचार, नवी व्यवस्था, नवे तंत्रज्ञान समोर येत आहे. अशा अनिश्चित जगात कौशल्य विकासाच्या माध्यमातून समर्थ भारताची उभारणी होणार आहे. आजच्या युगात केवळ ज्ञान उपयुक्त नसून, त्याचे उपयोजन करण्याची कला अवगत असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे शिकलेल्या बाबींना जीवनात कसे आणावे, हे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे हेच आजच्या शिक्षणाचे उद्दिष्ट असायला हवे. सिम्बायोसिस विद्यापीठदेखील या दिशेने काम करत असून, नोकरी मिळविण्यासाठी नाही तर नोकरी देण्याची क्षमता निर्माण करणारे शिक्षण येथे देण्यात येत आहे.’’
राज्याला संरक्षण तंत्रज्ञानाचे हब बनविणार
फडणवीस म्हणाले, ‘‘देशाला विकसित करायचे असल्यास तरुणाईला कौशल्य प्रदान करून, त्यांना कुशल मनुष्यबळात रूपांतरित करण्याची गरज आहे. देश संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात सातत्याने पुढे जात असताना राज्याला संरक्षण तंत्रज्ञानाचे हब बनविण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. राज्याने या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. येत्या काळात या क्षेत्रातील गुंतवणूक, उत्पादन आणि मनुष्यबळ निर्मिती राज्यात होईल. ‘सिम्बायोसिस’ने शिक्षणासोबत मूल्यांवर भर दिला असल्याने या क्षेत्रासाठी आंतरराष्ट्रीय स्तराच्या पायाभूत सुविधा उभ्या केल्या. युवकांच्या आशा-आकांक्षाना बळ देणारी व्यवस्था विद्यापीठात उभी केली. विद्यापीठाचे कौशल्य विकासाचे हे मॉडेल देशासाठी मार्गदर्शक ठरत आहे.’’
कुलपती डॉ. मुजुमदार म्हणाले, ‘‘देशातील तरुणाईला देशाच्या विकासाशी जोडण्यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण देणे आवश्यक असून, त्यासाठी कौशल्य विकास शिक्षणाला चालना देण्याची गरज आहे. स्नातकांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ रोजगाराचा विचार न करता जगाच्या कल्याणासाठी ज्ञानाचा उपयोग करावा. शिक्षणासोबत मूल्यांची जपणूक करावी.’’
‘‘राज्यातील कौशल्य विकासाचे हे पहिले विद्यापीठ असून, गेल्या दोन वर्षांपासून विद्यापीठाला नॅशनल युनिव्हर्सिटी रँकिंग फ्रेमवर्कचे पहिले मानांकन मिळाले आहे,’’ असे प्र- कुलगुरू डॉ. मुजुमदार यांनी सांगितले.
यावेळी संरक्षणमंत्री सिंह आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते एक हजार ५३२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. दोन विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. दोन विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर पुरस्कार आणि एका विद्यार्थिनीला कुशल पुरस्कार प्रदान करण्यात आला.
-----------------
फोटो ः 60521, 60522, 60523
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.