संरक्षण उत्पादनक्षमता वाढविणार राजनाथसिंह यांचे प्रतिपादन ः २०२९ पर्यंत तीन लाख कोटींपर्यंत नेणार
पुणे, ता. १६ : ‘‘ऑपरेशन सिंदूर हे देशाच्या आत्मनिर्भरतेचे प्रतीक होते. लष्कराने भारतात तयार झालेल्या शस्त्रास्त्रांचा उपयोग करीत धैर्य आणि संयमाने पराक्रम गाजविला. गेल्या १० वर्षात देशाची संरक्षण साहित्य निर्मिती ४६ हजार कोटींवरून एक लाख ५० हजार कोटींपर्यंत पोचवली आहे. यामध्ये खासगी क्षेत्राचे सुमारे ३३ हजार कोटींचे योगदान आहे. २०२९ पर्यंत आपली उत्पादनक्षमता तीन लाख कोटींपर्यंत नेण्याचे तर संरक्षण साहित्य निर्यात ५० लाख कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. ते साध्य करण्यासाठी ‘कौशल्य विकास’ अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते,’’ असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी केले.
‘सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी’च्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. राजनाथसिंह म्हणाले, ‘‘विकसित भारताच्या दिशेने जात असताना ‘स्कील इंडिया, ‘स्टार्ट अप इंडिया’ आणि ‘मेक इन इंडिया’वर अधिक भर देण्यात येत आहे. केंद्र सरकारने कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले आहे. ‘प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने’अंतर्गत एक कोटी ६३ लाख उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. ‘जनशिक्षा संस्थां’च्या माध्यमातून ग्रामीण, आदिवासी आणि दुर्लक्षित घटकातील ३० लाखांपेक्षा अधिक उमेदवारांना शिलाई, भरतकाम, हस्तकला, फळ प्रक्रिया आणि आरोग्य सेवा सहायकाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तर ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने’अंतर्गत देशातील पारंपरिक कारागिरांना सक्षम करण्यात येत असून २२ लाख कारागिरांना व्यवसायाची आधुनिक साधने प्रदान करण्यात आली आहेत. यामुळे देशात कौशल्य विकासाला अनुकूल वातावरण तयार झाले आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘भारताची युवाशक्ती ही जगातील सर्वात मोठी ताकद आहे. त्याला जर कौशल्याची जोड मिळाली, तर भारताला विकसित राष्ट्र होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. स्वातंत्र्यानंतर आपल्याला शस्त्रास्त्रांसाठी इतर देशांवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र, गेल्या दहा वर्षांत ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेअंतर्गत आपण शस्त्रनिर्मितीत मोठी झेप घेतली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे त्याचे जिवंत उदाहरण आहे.’’
‘‘वसुधैव कुटुंबकम्’ हा विचार जगाला देणारा भारत एकमेव देश आहे. येथे धर्म आणि जातीच्या आधारावर कधीच भेदभाव केला जात नाही. मात्र, पाकिस्तानने घडवलेल्या दहशतवादी हल्ल्यांत निरपराध नागरिकांना धर्म विचारून मारले गेले. त्याला प्रत्युत्तर देताना ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताने धर्म नव्हे, तर दुष्कर्मावर आधारित न्याय दिला. हाच दृष्टिकोन भारताला इतर देशांपासून वेगळा ठरवतो.’’ असेही राजनाथसिंह म्हणाले.
कृत्रिम बुद्धिमत्तेकडे सकारात्मकतेने पहा
‘‘काम करण्याची, विचार करण्याची आणि शिक्षण घेण्याची पद्धतीही या तंत्रज्ञानामुळे बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी काही संभ्रम आहेत, पण मी त्याकडे आशावादी दृष्टीने पाहतो. प्रत्येक नवे तंत्रज्ञान हे मानवाच्या प्रगतीसाठीच असते. आपण त्याचा वापर कसा करतो, हे महत्त्वाचे असते. माणसामध्ये असलेली संवेदना आणि निर्णयक्षमता कोणत्याही तंत्रज्ञानात येऊ शकत नाही. त्यामुळे हे म्हणणे चुकीचे ठरेल की तंत्रज्ञान माणसाची जागा घेत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेकडे स्पर्धा म्हणून नव्हे, तर सकारात्मक आणि सहकार्यपूर्ण दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे,’’ असे राजनाथसिंह यांनी नमूद केले.
------------------------------
फोटो ः 60528
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.