सकाळ मनी दिवाळी अंक - परिचय
सकाळ माध्यम समूहाच्यावतीने दिवाळी अंकातून यंदाही वाचकांसाठी
वेगळा साहित्य फराळ उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘ॲग्रोवन’, ‘सकाळ
साप्ताहिक’, ‘सकाळ मनी,’ ‘अवतरण’ असे दर्जेदार दिवाळी अंक प्रकाशित करण्यात आले
आहेत. अभ्यासपूर्ण व वैविध्यपूर्ण लेखांचा यामध्ये समावेश आहे. त्याचबरोबर कथा, कवितांनी साहित्यिक रूची जपली आहे. मान्यवरांच्या मुलाखतींनी या अंकाची उंची वाढलेली आहे. याशिवाय समाजातील वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केला आहे. युद्धापासून साहित्यापर्यंत व निसर्गापासून शेतीपर्यंत आणि गुंतवणुकीपासून अर्थकारणापर्यंत अशा विविध प्रकाराच्या मजकुराची मेजवानी या दिवाळी अंकांतून वाचायला मळेल. मनोरंजनापासून ते ज्ञानाच्या कक्षा रूंदावण्यासाठी या अंकांचा निश्चितच उपयोग होईल. त्यामुळे ‘सकाळ’च्या साहित्य फराळाचा आनंद वाचकांना मनमुराद मिळेल, यात काही शंका नाही.
‘सकाळ मनी’ः ‘अर्थ’पूर्ण फराळाची मेजवानी
------------------------------
अर्थ-उद्योग-गुंतवणूक या विषयाला वाहिलेला ‘सकाळ मनी’चा यंदाचा दिवाळी अंक अर्थविश्वातील ताज्या आणि चर्चेतील विषयांची तपशीलवार दखल घेणारा आहे. अर्थ आणि गुंतवणूक क्षेत्रातील मान्यवरांचे लेख आणि नामवंतांच्या मुलाखतींनी सजलेला हा अंक वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरताना दिसतो. ‘स्वप्न विकसित भारताचे...’ या मुखपृष्ठकथेवर सीए भरत फाटक, भूषण ओक, डॉ. अपूर्वा जोशी आणि मयूर जोशी यांचे विश्लेषणात्मक लेख वाचनीय आहेत. याशिवाय ‘डोनाल्ड ट्र्म्प यांचा बडगा अन् विवेकी तोडगा’ हा प्रा. प्रदीप आपटे यांचा, ‘चलनांचा राजा डॉलर’वरील विक्रम अवसरीकर यांचा, तर नेहा लिमये यांचा उच्च शिक्षणासाठी परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सूचक-संदेशपर संवादात्मक लेख जागतिक चिंतन-ऊहापोह करणारा आहे. ‘जीएसटी’तील सुधारणांनंतरही ‘निर्दोष जीएसटी’ हे अद्यापही मृगजळ असल्याचे कटूसत्य मांडणारा राहुल रेणावीकर यांचा लेख विचार करण्यासारखा आहे. जागतिक अस्थिरतेमुळे सोने-चांदीच्या भावाची विक्रमी वाटचाल, शेअर बाजारात काय होणार, ‘सेन्सेक्स’चे भविष्यकालीन उद्दिष्ट काय असेल, यावर भूषण महाजन आणि डॉ. किरण जाधव यांचे विश्लेषण गुंतवणूकदारांसाठी मोलाचे आहे. प्रख्यात पत्रकार सुचेता दलाल, प्रख्यात युट्युबर रचना रानडे, किरांग गांधी, डॉ. दिलीप सातभाई, चकोर गांधी, उज्ज्वल मराठे, नंदिनी वैद्य, प्रमोद पुराणिक, विद्याधर अनास्कर, प्रसाद भागवत, अभिजित कोळपकर, सुधीर भगत, सुनील टाकळकर, रोहित गायकवाड आदींचे लेख अंकाला वेगळ्या उंचीवर नेतात. ‘जमिनीबरोबरच पैशाची सुपीकताही जोपासा,’ असा संदेश शेतकरीवर्गाला देणारा लेख महत्त्वपूर्ण ठरतो. विविध मान्यवरांच्या मुलाखती हे या अंकाचे मोठे वैशिष्ट्य आहे. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. निळकंठ रथ यांची दीर्घकाळानंतर घेतली गेलेली मुलाखत अर्थव्यवस्थेतील विविध पैलूंवर प्रकाश टाकते. याशिवाय नीलेश शहा, नवनीत मुनोत, सुनील रोहोकले, प्रसन्न पाठक, प्रिया देशमुख, ललिता नटराज, मिलिंद काळे यांच्या खास ‘सकाळ मनी’साठी घेतल्या गेलेल्या मुलाखतींमुळे अंकाचा दर्जा उंचावला आहे. एकूणच मुखपृष्ठापासून विषयांच्या आणि लेखकांच्या निवडीपर्यंत उत्तम दर्जा राखलेला हा अंक ‘चुकवू नये’ असाच आहे.
पानेः २४४, किंमत २०० रुपये.
फोटो ः ६१२२९)
-----------------------------
ॲग्रोवन दिवाळी अंक
----------------------------------------------
सुखाच्या शेतीचा शोध
--------------------
सुखाची शेती या मध्यवर्ती संकल्पनेभोवती यंदाचा ॲग्रोवनचा दिवाळी अंक गुंफला आहे. टोकाच्या हवामान बदलाच्या संकटाचा सातत्याने सामना करावा लागणाऱ्या शेतकऱ्यांपुढे यापुढच्या काळात तग धरून कसे राहायचे, याचे आव्हान उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर निसर्गाशी जुळवून घेत, संसाधनांचा सजग वापर करत, खर्च-परताव्याचे गणित साधत, हव्यासाऐवजी काळ्या आईचे ऋण फेडत, फायदेशीर पण सातत्य टिकवून ठेवणाऱ्या शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब राज्यातल्या कानाकोपऱ्यातील शेतकरी करत आहेत. कमीत कमी जोखीम, कमीत कमी नुकसान, कमीत कमी मनस्ताप आणि निसर्गासोबत आनंददायी जगणं ही या शाश्वत
शेतीची चतुःसूत्री आहे. अशी शेती करणारे महारूद्र मंगनाळे, मिलिंद ऊर्फ आबाजी पाटील, राजेंद्र भट, डॉ. श्रीकांत गोरे या अवलियांचे अनुभव आणि राज्यभरातल्या २१ शेतकऱ्यांच्या सुखकथा व जोडीला आदिवासी शेतकऱ्यांच्या आगळ्या संस्कृतीचा धांडोळा घेतला आहे. तसेच मुक्तक व श्रुती जोशी आणि राहुल व संपदा कुळकर्णी या हौशी शेतकरी दाम्पत्यांचे प्रयोग मुळातून वाचण्यासारखे आहेत. सुखाचा शोध या विभागात प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांनी निसर्गवेड्या थोरोच्या जीवनतत्त्वज्ञानाची ओळख करून दिली आहे. विख्यात अर्थतज्ज्ञ प्रा. नीरज हातेकर यांचा ‘जरांगे पाटील आणि अर्थशास्त्राचा भूगोल’ हा चिकित्सक लेख या अंकाचे खास वैशिष्ट्य आहे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त स्वतंत्र विभाग आहे. त्यामध्ये केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, शिखर बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्या मुलाखती, तसेच सुनील पवार, शेखर गायकवाड, अरुण नरके, प्रदीप आपटे, प्रमोद कर्नाड, प्रसाद सेवेकरी, डॉ. सुरेश कुलकर्णी, डॉ. विशाल गायकवाड यांचे विचारप्रवर्तक लेख आणि प्राथमिक कृषी सहकारी संस्थांच्या (पॅक्स) केस स्टडीज यांचा समावेश आहे. याशिवाय ललित लेख, कविता, व्यंगचित्रे अशी भरगच्च मेजवानी आहे.
पाने ः ३१८, किंमत ः २०० रुपये
--------------------------------------------------------
साप्ताहिक सकाळ
साहित्याची दर्जेदार मेजवानी
-----------------------
वाचनप्रेमींसाठी कलानुभूतीची सुंदर पर्वणी म्हणजे ‘साप्ताहिक सकाळ’चा दिवाळी अंक. मराठी साहित्यविश्वात मोलाची भर घालणारे लेख, कथा, कविता आणि मुलाखती या अंकात सामावल्या आहेत. बाळ फोंडके यांचा ‘सांग दर्पणा’ हा लेख नार्सिसिझमविषयी रंजक माहिती देतो. आशुतोष जावडेकर यांच्या ‘फेअरवेल मीनाताई’ या लेखातून लेखिका मीना प्रभू यांना वाहिलेली शब्दांजली वाचकांना नक्की भावूक करते. रोहन नामजोशींच्या ‘जेनझीकरण’ या लेखातून जेन झीच्या विश्वात डोकावता येतं. तन्मय कानिटकर यांच्या ‘लग्नातली लोकशाही अन् लोकशाहीतलं लग्न’ या लेखातून लग्नसंस्थेचे अतिशय वेगळे पैलू आपल्यासमोर येतात. इरावती बारसोडे यांनी आर्थर कॉनन डॉयलला लिहिलेल्या पत्रातून गुप्तहेरांच्या दुनियेची सफर होते. आपल्याला कवी, गीतकार आणि पटकथाकार म्हणून माहीत असणारे गुरू ठाकूर या अंकातून एक कथालेखक आणि चित्रकार म्हणूनही भेटतात. यासोबतच लक्ष्मीकांत देशमुख, योगिनी वेंगुर्लेकर, शिरीन म्हाडेश्वर, गौतम पंगू यांच्या कथा मनाला स्पर्शून जातात. प्रसिद्ध गुजराती लेखक ध्रुव भट्ट आणि ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक-शहा यांच्या खास मुलाखतींमधून त्यांच्या विचारविश्वाचा वेध घेतला आहे. वैभव जोशी, संदीप खरे, प्रवीण दवणे, प्रथमेश किशोर पाठक, मृणालिनी कानिटकर-जोशी, राधिका परांजपे-खाडिलकर यांच्यासह आणखीही बऱ्याच कवींनी गुंफलेले शब्द जणू दिवाळी अंकाची उंची वाढवली आहे. या साहित्यिक मेजवानीच्या सोबतीला निखळ मनोरंजन करणारी आलोक आणि निखिल विद्यासागर यांची हास्यचित्रे आहेत.
--------
पाने ः २७६, किंमत ः २०० रुपये
अवतरण
युद्धाच्या अंतरंगाची ओळख
युद्ध आणि शांती हा ‘अवतरण’ दिवाळी अंकाचा विशेषांक आहे. युद्ध, त्याचे जगावर होणारे सामाजिक आणि आर्थिक परिणाम, जवानांच्या कुटुंबीयांची मानसिकता, युद्धामध्ये ‘एआय’ची भूमिका, युद्धाचे बदलते स्वरूप, रुपेरी पडद्यावरील युद्ध आदी विविध ॲंगलने हा युद्धाचा विषय हाताळण्यात आला आहे. ‘युद्ध वर्दीच्या आतलं आणि बाहेरचं’ या विषयावर मेजर (निवृत्त) मोहिनी गर्गे- कुलकर्णी यांनी भाष्य केलं आहे. भारताच्या भूराजनीतीत फासे आव्हानांचे याचा वेध दिवाकर देशपांडे यांनी घेतला आहे. शांतता हवीय तर मग युद्धासाठी तयार रहा, हा राहुल गडपाले यांचा लेख अभ्यासपूर्ण आहे. पहलगाम ते आॅपरेशन सिंदूर यावर तिलक देवेशर यांनी प्रकाशझोत टाकला आहे. सहनशीलतेची ‘सीमा’ यावर जतीन देसाई यांनी लिहिले आहे. रुपेरी पडद्यावरील ‘रणसंग्रम’ कसा असतो, याची धनंजय कुलकर्णी यांनी ओळख करू दिली आहे. इतिहास जिवंत करणाऱ्या वॉर टुरिझमची सफर झेलम चौबळ यांनी घडवली आहे. अमेरिका तुपाशी, जग उपाशी यावर डॉ. मालिनी नायर यांनी वेध घेतला आहे. खऱ्या बातम्या हीच देशभक्ती यावर राजदीप सरदेसाई यांनी लिहिले आहे. युद्धाची किंमत चुकवणाऱ्या कांगोतील माणसांवर निळू दामले यांनी प्रकाशझोत टाकला आहे. रणभूमीवरील भारतीय युद्धशक्तीची ओळखही या अंकात करून देण्यात आली आहे. युद्धबंदीसाठी जागतिक सहकार्य याचा ऊहापोह डॉ. अमिताभ सिंग यांनी केला आहे.
युद्ध आणि संघर्षाच्या कठीण परिस्थितीत वृत्तसंकलन कसे केले जाते, युद्धाची धुमश्चक्री सुरू असताना पत्रकारितेची मूल्ये कशी जपली जपावी, यासंदर्भात ज्येष्ठ युद्ध पत्रकार आॅईस्टिन बोगेश यांची विशेष मुलाखत या अंकात आहे.
पाने ः २९०, किंमत ः २०० रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

