सोने, बांधकाम क्षेत्रात ‘लक्ष्मीची पावले’
पुणे, ता. १९ ः सराफ व्यावसायिक आणि बांधकाम क्षेत्रासाठी यंदाची दिवाळी सुवर्णकाळ ठरली. त्यामुळे बाजारपेठेला यंदा नवसंजीवनी मिळाली. तेजी असतानाही वाढलेली खरेदी आणि ग्राहकांचा उदंड प्रचंड प्रतिसाद यामुळे दोन्ही क्षेत्रात विक्रमी उलाढाल झाली.
सोन्याचे भाव विक्रमी पातळीवर गेले तरी ग्राहकांनी परंपरेप्रमाणे खरेदीचा मुहूर्त साधला, तर दुसऱ्या बाजूला बांधकाम क्षेत्राने विक्री, प्रकल्प बुकिंग आणि सरकारचा पाठिंबा आणि विविध योजनांमुळे भरारी घेतली. या दोन्ही क्षेत्रांतील उत्साहामुळे बाजारपेठेला नवचैतन्य मिळाले असून, तज्ज्ञांच्या मते पुढील काही महिन्यांत अर्थव्यवस्थेवर याचा सकारात्मक परिणाम दिसणार आहे.
सोने-चांदी बाजारात ‘सुवर्ण’ दिवाळी
धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर पुण्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मोठ्या किमतीची सोने-चांदी खरेदी झाली. सोन्याचा भाव १० ग्रॅममागे एक लाख ती हजार रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला आले. तरीही ग्राहकांच्या खरेदीत कोणतीही घट झाली नाही. शहरातील सराफ बाजारांमध्ये दिवाळीत ग्राहकांची मोठी गर्दी होती. भाव वाढले असले तरी शुभमुहूर्त साधण्याची परंपरा ग्राहकांनी कायम ठेवली. हलके वजनाचे दागिने, सोन्याची नाणी आणि चांदीच्या वस्तूंना मोठी मागणी होती. यंदा ऑनलाइन खरेदीतदेखील मोठी वाढ झाली असून, गुंतवणुकीसाठी सोन्याच्या बिस्किटांची मागणी विशेष दिसून आली. महिलांमध्ये आधुनिक डिझाईनचे नेकलेस, कानातले आणि तरुण वर्गात चेन व ब्रेसलेट लोकप्रिय ठरले.
बांधकाम क्षेत्रात आनंदाची दिवाळी
बांधकाम क्षेत्रातही यंदा दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला. यंदा घर विक्रीत मागील वर्षाच्या तुलनेत चांगली वाढ झाली. शहराच्या मध्यभागासह उपनगरांत सुरू झालेल्या प्रकल्पांमध्ये चांगले बुकिंग झाले. आकर्षक ऑफर्स, स्टॅम्प ड्यूटी सवलत आणि फर्निचरचे पॅकेजेसमुळे ग्राहकांना घर खरेदीचा उत्तम मुहूर्त साधता आला. विशेष म्हणजे व्याजदर स्थिर असल्याने आणि सणाचा काळ लाभदायक असल्याने ग्राहकांनी निर्णय पुढे ढकलला नाही. त्यामुळे विक्रीत विक्रमी वाढ झाली. बांधकाम साहित्य बाजारातही चैतन्य निर्माण झाले असून सिमेंट, लोखंड, टाइल्स आणि पेंटच्या ऑर्डरमध्ये मोठी वाढ नोंदवली गेली आहे.
अर्थव्यवस्थेत नवसंजीवनी, बाजारात आत्मविश्वास
सोने आणि बांधकाम क्षेत्र ही दोन्ही क्षेत्रे शहराच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची आहेत. यंदा या दोन्ही क्षेत्रातील वाढीमुळे केवळ व्यापारी नव्हे तर गुंतवणूकदार आणि ग्राहक वर्गातही आत्मविश्वास निर्माण झाला आहे. सोने-चांदी आणि बांधकाम क्षेत्रातील तेजीमुळे रोजगार, उत्पादन आणि गुंतवणुकीच्या संधींमध्ये मोठी वाढ होईल. या उत्साहाचा परिणाम वर्षाअखेरीस सर्व उद्योग क्षेत्रांवर सकारात्मक दिसेल.
क्षेत्रात नवीन प्रकल्पांचा आरंभ
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर शहरातील अनेक बांधकाम व्यावसायिकांनी नवीन गृहप्रकल्पांचा आरंभ केला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात निवासी तसेच व्यावसायिक प्रकल्पांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. सणाच्या काळात सुरू झालेल्या या प्रकल्पांमुळे घरखरेदीदारांमध्ये उत्साह निर्माण झाला असून, विकसक संघटनांच्या मते पुढील तिमाहीत विक्रीत आणखी वाढ अपेक्षित आहे.
सराफ बाजारात नवीन शोरूम्सची भर
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रमुख सराफ व्यावसायिकांनी नवीन शोरूम्स सुरू केली आहेत. लक्ष्मी रस्ता, औंध आणि वाकड परिसरात सुरू झालेल्या या अत्याधुनिक शोरूम्समध्ये पारंपरिक ते आधुनिक डिझाFनपर्यंत विविध दागिने उपलब्ध आहेत. शुभमुहूर्त साधून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विशेष सवलती व ऑफर्स जाहीर करण्यात आल्या असून, उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
मी धनत्रयोदशीला सोन्याचे छोटे ब्रेसलेट घेतले. दिवाळी ऑफरमुळे जुन्या सोन्याचे एक्स्चेंज रेट चांगले मिळाले आणि त्यावर सवलतही मिळाली. भाव जरी वाढले असले तरी ऑफरचा फायदा घेऊन परंपरा
पूर्ण करता आली.
- प्राजक्ता देशमुख, दागिन्यांची खरेदी केलेली तरुणी
मी दिवाळीच्या ऑफरमध्ये माझ्या पहिल्याच सदनिकेचे बुकिंग केले. बिल्डरकडून स्टॅम्प ड्यूटी माफ आणि फर्निचरवर खास सवलत मिळाली. इतक्या काळात अशी संधी मिळाली नव्हती, त्यामुळे ऑफरचा फायदा घेत घराचे स्वप्न पूर्ण झाले.
- अमोल जाधव, सदनिकेचे बुकिंग केलेले व्यावसायिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.