गजबजलेल्या बाजारपेठेत खरेदीचा उत्साह
सोन्या-चांदीची विक्रमी उलाढाल ः कपडे, मिठाई, फटाके खरेदीसाठी गर्दी

गजबजलेल्या बाजारपेठेत खरेदीचा उत्साह सोन्या-चांदीची विक्रमी उलाढाल ः कपडे, मिठाई, फटाके खरेदीसाठी गर्दी

Published on

पुणे, ता. १९ ः दिवाळीच्या निमित्ताने पुणेकरांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. शहरातील लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, मंडई, बोहरी आळी आणि रविवार पेठ यासह परिसरातील बाजारपेठामध्ये खरेदीदारांची मोठी गर्दी होत आहे. कपडे, मिठाई, फटाके, सजावटीच्या वस्तू आणि भेटवस्तू यांची मोठी खरेदी सुरू असून, सराफ बाजारातही सोन्या-चांदीची विक्रमी उलाढाल होत आहे.
कपड्यांच्या दुकानांमध्ये पारंपरिक साड्या, कुर्ते आणि मुलांसाठी नवे फॅशन ट्रेंड लोकप्रिय ठरत आहेत. मिठाईच्या दुकानांमध्ये रांगा लागल्या असून, ग्राहक ‘घरच्यांसाठी काहीतरी खास’ घेण्याच्या तयारीत आहेत. शहरातील प्रमुख मॉल आणि ब्रँडेड शोरूममध्येही ‘दिवाळी ऑफर्स’मुळे खरेदीचा उत्साह अधिक वाढला आहे. ग्रामीण भागातून आलेले खरेदीदार शहरात दिवाळीचा आनंद अनुभवत आहेत.

फटाका विक्रीही जोरात
फटाक्यांच्या विक्रीला यंदा अपूर्व प्रतिसाद मिळत आहे. शहराच्या मध्यभागासह कात्रज, वडगाव, खडकी, वाकड आणि पिंपरी-चिंचवड परिसरात उभारलेल्या फटाका बाजारात नागरिकांची मोठी गर्दी दिसत आहे. अनेक ठिकाणी लोक रांगा लावून फटाके खरेदी करत आहेत. मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील लोक फुलबाज्या, अनार, चकरी, रॉकेट आणि नवीन एलईडी फटाक्यांची खरेदी करताना दिसत आहेत. फटाका व्यापाऱ्यांच्या मते, यंदा पर्यावरणपूरक फटाक्यांची मागणी सर्वाधिक आहे. ‘आम्ही पर्यावरणपूरक आणि कमी धूर निर्माण करणारे फटाकेच विक्रीस ठेवले आहेत, असे फटाका विक्रेते रमेश भोसले यांनी सांगितले.

इमारतींना आकर्षक विद्युत रोषणाई ः
दिवाळीच्या स्वागतासाठी पुण्यातील प्रमुख इमारती, कार्यालये आणि हौसिंग सोसायट्या आकर्षक रोषणाईने उजळल्या आहेत. डीपी रोड, सेनापती बापट रोड आणि कोथरूड भागात इमारतींवर रंगीबेरंगी एलईडी लाईट्स लावण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी थीम आधारित सजावटही पहायला मिळत आहे. रात्री शहर उजळून निघाले असून, नागरिक फोटोसेशन आणि सेल्फी काढताना दिसत आहेत.

आकाश कंदीलांनी उजळले रस्ते ः
शहरात यंदा देखील आकाशकंदील आणि विजांच्या माळांनी रस्त्यांची शोभा वाढवली आहे. प्रत्येक गल्लीमध्ये वेगवेगळ्या रंगांचे आकाशकंदील लावले असून, काही ठिकाणी नागरिकांनी स्वतः बनवलेले कंदील लावले आहेत. रात्री रस्त्यांवर चालताना दिवाळीचा खरा उत्सव अनुभवायला मिळतो. मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण या सजावटीचा आनंद घेत आहेत.


किल्ले बनविण्याची स्पर्धा
किल्ले बनविण्याची स्पर्धा ही चिमुकल्यांसाठी आकर्षणाचा मुख्य भाग ठरते. शहरातील अनेक शाळा, सोसायट्या आणि बालगटांनी यंदाही विविध थीमवर किल्ले उभारून बालसैनिकांचा उत्साह गगनाला भिडला आहे. काही ठिकाणी ‘प्रतापगड’, ‘सिंहगड’, ‘राजगड’ तर काही ठिकाणी ‘स्वराज्य किल्ला’ अशा कल्पक नावांनी किल्ले साकारले आहेत. माती, थर्माकोल, गवत, कागद आणि जुन्या वस्तूंचा वापर करून बनविलेल्या या किल्ल्यांमधून मुलांची सर्जनशीलता आणि ऐतिहासिक जाण दिसून येते. स्पर्धेसाठी पालक आणि शिक्षकांनीही मोठी साथ दिली आहे. काही सोसायट्यांनी किल्ला स्पर्धेबरोबरच पारंपरिक पोशाख स्पर्धा आणि ऐतिहासिक गोष्टी सांगण्याचे उपक्रमही घेतले आहेत. त्यामुळे परिसरात दिवाळीचा सांस्कृतिक उत्साह अधिक रंगतदार झाला आहे.

चोपड्यांची खरेदी वाढली ः
तुळशीबाग, लक्ष्मी रस्ता, मंडई आणि शनिवार पेठेतील अनेक दुकाने सध्या चोपड्यांच्या खरेदीसाठी गजबजली आहेत. काही ठिकाणी हाताने रंगवलेल्या चोपड्याही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येक वर्षी दिवाळीत आम्ही कुटुंबासोबत चोपड्या खरेदी करत असतो. ही परंपरा कायम ठेवण्यासाठी यंदाही नवीन चोपड्या घेतल्या, असे राजेश कुलकर्णी या ग्राहकाने सांगितले.
फोटो ः १६३९७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com